वेदांचे स्वरुप

 

वेद हे अपौरुषेय आहेत. अर्थात त्याचा जनक मनुष्य नाही. सृष्टी रचनेच्या अनादी काळ आधीपासून असलेल्या आदिशक्तिच्या निद्रितावस्थेतील श्वासोच्छासाच्या लयीतून बाहेर पडलेला नाद म्हणजेच ‘वेद’ होत.

आदिशक्तीने ब्रम्हदेवाला सोपवलेल्या सृष्टी निर्मितीच्या कार्याकरीता ब्रम्हदेवाने १२००० वर्षे प्रणवाची तपश्चर्या करुन वेदांच्या आधारे सृष्टीची निर्मिती केली.अशा या वेदांचे जतन अनादी काळापासून गुरुकुल परंपरेने, मौखिक पध्दतीने मानव करत आला आहे.

वेद हे पूर्णज्ञान स्वरुपी असून त्याच्या प्रत्येक अक्षराच्या भावार्थात दडलेल्या ज्ञानाचे आजच्या प्रगत विज्ञानालाही आकलन झालेले नाही. वेद हेच सृष्टीचा व सृष्टीवरील जीवांचा आधार आहेत. परंतु आजच्या विज्ञानाच्या पलीकडे ज्ञानाचे अस्तित्व नाही असे म्हणता येणार नाही. जसे की जगविख्यात भौतिक शास्त्रज्ञ स्टिफन हॉकींग्ज यांनी ब्रह्मांडाच्या उत्पत्तीचा मांडलेला वैज्ञानिक सिध्दांत हा वेदांमध्ये नासदीय सूक्तामधे (ऋगवेद १०/१२९-२) अनादी काळापासून आधीच अस्तित्वात आहे. वेदांच्या या अनाकलनीय ज्ञानामुळे समाजामध्ये वेदांना सर्व सामान्य धार्मिक ग्रंथाचा दर्जा दिला गेला. खरे तर यावर संशोधन होणे अत्यंत गरजेचे आहे.