वैदिक शिक्षण

 

वेद प्रचार प्रसार कार्याचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे वैदिक पाठशाळा आहे. ह्या संस्थे मार्फत हे कार्य प्रह्लाद आश्रम चतुर्वेद पाठशाळे अंतर्गत सुरु आहे. वेद हे सार्वभौम ज्ञान आहे. वेद तत्वांमुळे माणूस बुद्धिमान, कर्तृत्ववान, दातृत्ववान होतो. त्याची कार्यक्षमता वाढते. सर्व प्रकारच्या सुख सोयींचा त्याला लाभ होऊ शकतो. तो दिर्घायुषी होउन उत्तम तर्‍हेचे जीवन जगू शकतो. ही वेदांची शिकवणूक येथून सांगीतली जाते.

वैदिक शिक्षणाच्या अंतर्गत चतुर्वेदांचे, म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद व अथर्ववेद ह्याचे अध्ययन तसेच उपनिषद, पुराण यांच्यातून निर्माण होणारे पूजा-विधाने ज्यानां सर्व सामान्यपणे याज्ञिकी असे संबोधल्या जाते त्याचेही येथुन प्रशिक्षण दिल्या जाते. आजपर्यंत येथून जवळ जवळ १५० विद्यार्थी असे प्रशिक्षण घेउन बाहेर पडले आहेत.

ॐ शिक्षण संस्थे तर्फे प्रह्लाद आश्रम चर्तुर्वेद पाठशाळा या नावाने वैदिक पाठशाळा अकोला येथे सुरु असुन इथुन पूर्णत: निःशुल्क वैदिक प्रशिक्षण देण्यात येते. ह्या सर्व कार्याला नाथपंथाचे परंपरागत आशीर्वाद प्राप्त झाले आहेत. या शिक्षणासाठी गुरुकुल पध्द्तीने विद्यार्थ्यांस ७ ते १२ वर्षांपर्यंत आश्रमातच येथील नीतिनियमांना अनुसरुन रहावे लागते. साधारणत: वयाच्या सहाव्या ते नवव्या वर्षी आश्रमात प्रवेश घेता येतो. शिक्षण काळात विद्यार्थ्याचा अन्न, वस्त्र, शिक्षण साहित्य, औषध पाणी इत्यादी सर्व खर्च आश्रमातर्फेच केला जातो. म्हणजे येथून विद्या दान, अन्न दान, वस्त्र दान, व आरोग्य दान नियमित पणे होते.

येथून देण्यात येणार्‍या प्रशिक्षणा अंतर्गत वेदांच्या परिपाठासोबतच विद्यार्थ्यांना वैदिक तत्वांचा प्रत्यक्ष जीवनात कसा वापर करावा, तसेच वेद, उपनिषद, व पुरणातील प्रयोग कसे सिद्ध करावेत हे प्रात्यक्षिकासह शिकविले जाते.