आन्हीक

नाथ पंथीय गुरुच्या पूजेचा प्रकार हा काही वेगळाच आहे. साधारणतःपूजा म्हटली की देवाच्या निरनिराळ्या मूर्तींची पूजा होत असतांना आपण पाहतो.

नाथपंथाची कार्य पद्दती ही सूर्य, ग्रह, नक्षत्र, तारांगण यांच्या भ्रमणावर आधारीत आहे. म्हणजेच ब्रह्मांडाच्या सद्य थितींच्या अस्तंगत रहायचे. ब्रम्हांडात पंचमहाभूत, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश यांना अनन्य-साधारण महत्व आहे. या प्रत्येक तत्वाचा मानवी जीवनाशी खोलवर संबंध असतो.

सदगुरु व्यंकटनाथमहाराज नित्य नियमाने रोज सकाळी व संध्याकाळी आन्हिक करायचे. आन्हिक म्हणजे पूजा. त्यांच्या परंपरे प्रमाणे चालत आलेल्या पुजेत चौरंगाच्या समोरील भागात दोन्हीही कोपर्‍यात तेलाच्या समया असायच्या, त्या दोन समयांच्या बाजुला दोन तुपाचे निरांजन असत. या दोन तुपाच्या दिव्याच्या मध्यभागी कापूर आरतीची योजना केलेली असे. चौरंगाच्या मध्यभागी देवतांच्या आसनासाठी व्यवस्था असे पण कोणत्याही देवतेची मुर्ती या चौरंगावर नसे. देवता म्हणजे घड्याळासारखी दिसणारी मुळ नवग्रहाची पौची. येथे ब्रम्हांडाचं मुळ स्वरुप हे नवग्रहांच्या पौचीवरुन व्यक्त केला जाते.

गुरू महाराज सोवळं नेसायचे आणि आन्हीकाला सुरवात करायचे. आन्हीकापुर्वी रामानंदी लावायची. पौचीवर अभिषेक होत असे. पौचीवर होणारा अभिषेक हा पंथाचे दैवत दत्त, रुद्र, अथर्वशिर्ष, शाबरी देवी, व निरनिराळे कवच काही विशिष्ठ देवतांचे स्तोत्र, मंत्र आदींचा होत असे. महाराज आन्हीक मोठ्याने करीत नसत. बराच वेळा तर ते दार लावून एकान्तात आन्हीक करीत असत.

आन्हीक चालू असतांना गंध उगाळून तयार ठेवायचं, ठेवलेत्या गंध गोळीवर मंत्रांचे संस्कार व्हायचे. त्या गंधगोळीचा उपयोग कोणत्याही व्यक्तीवर, त्याच्या व्यक्तीमत्वात वा योगांत बदल करण्यासाठी वापर केला जायचा. शिवाय गुरूच्या इच्छेनुसार त्याचा पाहिजे त्या कारणासाठी वापर केला जायचा. या गंधगोळीचे अनुभव अनेक शिष्यांनी, भक्तांनी घेतले आहेत.

ह्याच परंपरागत पूजा पद्धती प्रमाणे ‘आन्हिक’ नरेन्द्र नाथ महाराज आजदेखील करीत आहेत. या आन्हिकाचा परीणाम वातावरणावर, सभोवतालच्या माणसांवर बराच मोठा होत असतो. पुजेच्यावेळी मनुष्याच्या केवळ शारीरीक उपस्थिती मुळे देखिल त्याच्यातले दोष, विकार हळू हळू कमी होवू लागतात ही आज वरची प्रचीती आहे. आन्हीकातील गंध गोळीचा उपयोग नरेन्द्र नाथ महाराज आजदेखील कोणत्याही व्यक्तीवर, त्याच्या व्यक्तीमत्वात वा योगांत बदल करण्यासाठी वा असाध्य गोष्टी साध्य करणासाठी करतात. या गंधगोळीचे अनुभव त्यांच्या अनेक शिष्यांनी, भक्तांनी घेतले आहेत.

या आन्हिकाच्या वेळी सर्व देव, सर्व शक्ती सांकेतीक रूपाने उपस्थित असतात. पूजेसाठी केलेले गंध व त्याच्या गोळ्या म्हणजे एक प्रकारची दिव्य शक्तीच आहे, अशी अनुभुती शिष्य घेत असतात. पूजेच्या कालावधीत, गुरूमहाराज, सुक्ष्म रुपाने जणू ब्रम्हांडातून फिरुन येतात अशी अनुभुती शिष्यांना येते. पूजेच्या वेळी झालेत्या तीर्थाचा उपयोग हा देखील विलक्षण परिणाम करणारा असतो.

हल्लीच्या भाषेत बोलायचे झाले तर पुजेच्या वेळी बसलेली प्रत्येक व्यक्तीची अंतर्बाह्य तपासणी आध्यात्मिक सामर्थ्याच्या माध्यमातून, त्याच्या नकळतच होते. त्याच्यामध्ये असलेत्या दोषांचे ज्ञान गुरूंना ताबडतोबच होते. गुरुंची संकल्पीत पूजा झाल्या नंतर शिष्य त्यांची पाद्य पुजा करतात आणि सांप्रदायिक पद्धती प्रमाणे गुरुंची आरती, कर्पुर आरती, प्रार्थना आदी भाग सामूहीकरीत्या करतात. गुरू स्वतः तीर्थ व प्रसाद वितरण करतात व त्यांच्या इच्छेनुरुप त्यांना हवं ते अघटीत कार्य देखील अशा वेळेला सहजतेने करतात.

या दैनंदिन पुजेमध्ये सूर्य ही मुख्य देवता असते व त्याच्या अस्तंगत बाकीच्या देवता असतात. नाथपंथा मध्ये सूर्याला अनन्य साधारण महत्व दिले आहे. जगाच्या पाठीवर सर्वजण ज्याच्या अस्तित्वाचं व गुणांचे दर्शन घेऊन अनुभुती घेतातात अश्या स्वरुपाची सूर्यनारायण ही एकमेव देवता आहे.

सृष्टी मधील सगळे जीव व प्राणी यांचा सूर्य हा आत्मा आहे. सूर्य आपल्याला रोजच पूर्वेकडून उगवताना दिसतो, परंतु पूर्व हा ठोकळ मानाने म्हणण्याचा प्रघात आहे. शास्त्रीय दृष्ट्या जर पाहिलं तर पृथ्वीच्या भ्रमण गतीनुसार सूर्य हा एका टोका पासून दुसर्‍या टोका पर्यंत कणाकणाने पुढे पुढे सरकताना दिसतो.

ज्या वेळी सूर्य आपला प्रवास पुर्व-उत्तर टोका कडून पश्चिम-दक्षिण टोका कडे करतो त्यावेळेस त्याला दक्षिणायन म्हणतात व ज्या वेळेला तो पुर्व-दक्षिण टोका पासून पश्चिम-उत्तर टोका पर्यंत जातो त्या वेळेस त्याला उत्तरायण असे म्हणतात. सूर्य १४ किंवा १५ जानेवारी म्हणजे मकर संक्रांतीपासून तो पुर्व-दक्षिण टोका पासून एकेक कण पुढे सरकत सरकत पुर्वेची पूर्ण दिशा ओलांडून तो पुर्व-उत्तर टोकाला येतो याला मकर संक्रमण असे म्हणतात. तो १६ जूलै रोजी उत्तर टोका पर्यंत पोहोचतो. १६ जुलैला त्याची भ्रमण गती फिरुन तो पुर्व-दक्षिण टोका कडे संक्रमीत होतो. अशा प्रकारे १६ जुलैला होणार्‍या सूर्य संक्रमणाला कर्क संक्रमण म्हणतात.

या दोन्ही टोकाच्या संक्रमणाला सूर्य उपासनेमध्ये तसेच नाथपंथा मध्ये विशेष महत्व आहे. नाथपंथाच्या परिपाठा प्रमाणे ह्या दोन्हीही संक्रमणांना सूर्य संक्रमण हवन करण्याचा प्रघात आहे आणि या सूर्य संक्रमणाच्या हवनातून होणार्‍या विभूतीचा उपयोग हे नाथ पंथीय लोक आपली मंत्र साधना शक्ती शस्त्र अस्त्र विभूती आदी गोष्टींना विशेष उजाळा देऊन त्याचा उपयोग मानवी जीवनाच्या दैनंदिन जीवनासाठी आणि लोक कल्याणासाठी करतात.

नाथ पंथीयांनी पंथीय तत्त्वांचा अंमल स्वतःपुरता मर्यादित ठेवला असला तरी त्याचा फायदा वा उपयोग हा जनसामान्यांसाठीच करतात. या व्यतिरिक्त अनेक विविध प्रकारची विशिष्ठ हवने होतात. सर्व हवनांचा मूळ उद्देश हा जनहित व जन कत्याण हाच असतो.

mrMarathi