Aug 092015
 

श्री नरेंद्रनाथ महाराजांचे अमृत वचन सारांश रुपाने येथे कथन केले आहे …

“गुरु देह नाही,
गुरु ग्रंथ नाही,
गुरु नाही जादु, चमत्कारं काही,
शिवोहम् शिवोहम् ध्वनि अंन्तरात,
भजावे गुरु व्यंकटेशास नित्य”

अर्थात गुरु तत्त्व हे गुरुच्या शरीरा पासून वेगळे असते. शरीरास सर्व भौतिक नियम लागु असतात परंतु गुरु मात्र त्या सर्वांपासून अलिप्त असतो.

ह्या संदर्भात महाराजांनी एक महाभारतर कालीन कथा सांगितली;

एकदा दुर्वास ऋषी आपल्या एक हजार शिष्यानसमवेत फिरत होते. दुर्वास ऋषी हे अंगाने अगदी किडकिडीत होते परंतु त्यांचे एक हजार शिष्य जेवढे जेवायचे तेवढे त्यांना एका वेळेस लागायचे. अश्या या दूर्वास ऋषींच्या मनात द्वारकेला जाऊन श्री कृष्णाला भेटावे असे आले.

झाल! त्यांनी आपल्या एका शिष्याला बोलावले व सांगीतले जा! हा समोर दिसतो तो समुद्र पार करून द्वारकेस जा व श्री कृष्णाला माझा निरोप दे.

तो शिष्य घाबरुन राडायला लागला व म्हणाला मला पोहोता येत नाही, मी एवढा मोठा समुद्र कसा पार करू, दुर्वासांनी सांगितले “जा!…समुद्राच्या पाण्यात जा व आपल्या ओंजळीत पाणी घेऊन म्हण “माझ्या गुरुने जन्मा पासून अन्नाचा एक कणही जर खाल्ला नसेल तर मला जायला मार्ग दे!” नाहीतर नको.

शिष्याच्या मनात आले, आपले गुरु आपल्यावर रागवले आहेत व शिक्षा देत आहेत. नाहीतर ज्यांना आपण रोज एक हजार माणसांइतके खातांना पाहतो, त्यांनी काहीच खाल्ले नाही असे कसे म्हणता येईल? नक्कीच समुद्र आपल्याला मार्ग देणार नाही. पण काय करता, नाही गेलो तर श्राप मिळाल्या पेक्षा नाशिबाची परीक्षा पाहूया.

गुरुंनी सांगीतल्या प्रमाणे त्या शिष्याने केले, तर काय आश्चर्य. समुद्र मधोमध दुभांगला व शिष्यास वाट करून दिली. तो पळत पळतच द्वारकेस गेला कारण त्याला अजुनही भिती वाटत होती.

तिकडे श्री कृष्णाने त्या शिष्याचे आगत स्वागत करून पूजा केली व त्यानेही सांगितले की असाच परत दुर्वासांकडे जा व माझा निरोप सांग!

झाले तो शिष्य परत रडूलागला व त्याने घडलेला वृतांत कथन करून श्रीकृष्णाची विनवणी केली की मला पोहता येत नाही तरी मला आता येथेच राहण्याची परवानगी द्यावी.

हे ऐकून श्रीकृष्ण हसु लागले व त्यांनी आपल्या मुलास बोलावून सांगितले की जा! ह्या दुर्वासांच्या शिष्याला समुद्रपार जाण्याचा मार्ग करून दे.

मुलास म्हणाले समुद्रास म्हण की माझे वडील जर आजन्म ब्रम्हचारी असतील तर मार्ग दे नाहीतर देऊ नकोस.

त्या शिष्यास परत एकदा संभ्रम पडला… श्रीकृष्णाला मुलगा आहे, मग तो ब्रम्हचारी कसा? परंतु अनुभावने शहाणा झाल्याने तो निमुटपणे श्री कृष्णाच्या मुलाबरोबर समुद्रा पर्यंत गेला. तेथे श्रीकृष्णाच्या मुलाने “माझे वडील आजन्म ब्रम्हचारी असतील तर मार्ग दे” असे म्हणताच परत समुद्र दुभंगला व दुर्वासांचा शिष्य धावत धावत गुरुं जवळ परत आला.

हे सांगून नरेंद्रनाथ म्हणाले गुरु जे बोलताना दिसतात, करताना दिसतात त्या पेक्षा ते वेगळे असतात. गुरु हा देह नाही याची साक्षच या गोष्टीतुन मीळते.

अध्यात्मामधे मंत्र, तंत्र, तसेच जादू, चमत्कार ह्यांना काहिच वाव नसतो. परंतु साधना योगाभ्यास व गुरुशि समरसता या गोष्टीमुळे काही चमत्कार घडल्या सारखे वाटते. प्रत्यक्षात या गोष्टी वैज्ञानिक तत्वांमुळे घडतात परंतु त्या सर्व सामान्य लोकांना माहीत नसल्याने लोक त्यांना चमत्कार समजु लागतात. अश्या अलौकिक गोष्टींचा आधार सद्गुरु लोकांना भुलवण्यासाठी कधीच करत नाहीत कारण गुरुतत्व हे सहजरीत्या ईश्र्वराशि जोडलेले असते व ते थेट कार्य करत असते.साधना करा आणी अनुभूती घ्या एवढे म्हणता येईल.

गुरुच्या सवयी, आवडी-निवडी असणे म्हणजे तो खोटा होय असा साधारण समज असतो. पण शरीर आले की शरीरधर्म ही आलाच, व शरीरभोग ही आलेच. परंतु शब्दछल करुन गैरसमज पसरविणारे एक विसरतात की गुरु म्हणजे केवळ आत्मा होय. आत्मास कोणतेही बंधन नसते, तसेच तो नेहेमीच शुद्ध व निर्लेप असतो.

अध्यात्मासाठी गुरुशी समरसता हीच सर्वात महत्वाची असते. या संदर्भात महाराजांनी मारुती चे उदाहरण दिले. ते म्हणाले एकदा सितामाईंनी प्रसन्न होऊन आपला मोत्याचा कंठा हनुमंताला भेट दिला. भर सभेतच हनुमंताने त्यातील प्रत्येक मोती दाताने फोडून पाहिला व फेकून दिला. झाले! सीतामाई नाराज झाल्या ते पाहून श्री रामांनी हनुमंतास विचारले अरे असे काय करतोस? सीतामाईंनी दिलेल्या ह्या कंठयाची तुला काहीच कींमत नाही का? श्री रामांचा हा प्रश्न ऐकून हनुमंत समजले व म्हणाले ज्यात माझे गुरु, माझे राम नाहीत ती गोष्ठ मला नको. हे ऐकून सीतामाईनी सहजच विचारले अरे मोत्यांमधे राम कुठून येणार, पण तुझ्यात तरी राम आहे का?

हे ऐकून हनुमंतानी आपली छाती फाडून आत विराजमान श्री राम व सीतामाई यांचे दर्शन सर्वांना घडवले. ही समरसता हीच सर्व श्रेष्ठ अध्यात्म होय.

असे असलेतरी बुद्धिवादी माणसे बुद्धिचा दुरुपयोग करुन स्वतःची व इतरांचीही फसवणूक करत असतात. सततच बुद्धि भेद करुन स्वतःचा अहंकार सुखउ पाहातात. परंतु असे करण्याने अशी माणसे कधीच कोणत्याच विषयात पुर्णतः एकरूप होत नाहीत व म्हणूनच त्याना आत्मीक आनंद ही मिळत नाही.

नरेंद्रनाथ महाराज म्हणाले ‘intelligence dominates your conscius’ असे करण्यापेक्षा दररोज न चुकता गुरुंने सांगीतलेली उपासना करावी. त्यात टाळाटाळ करू नये. जसे आपण जेवण-खाण, झोप सोडत नाही तसेच उपासनाही सोडुनये. ह्यातुनच गुरुची ओढ लागून स्थिरता येते व स्वानंदचा अनुभव येऊ लागतो.
—————–***—————