श्रीगुरुगीता सांगते की गुरुभक्ती हा मुक्तीचा महामार्ग आहे. याबाबत *स्कंदपुराणात* ईश्वर–पार्वती संवाद येतो, जो गुरुगीता या नावाने प्रसिद्ध आहे. त्यात पार्वतीने भगवान शंकरांना प्रश्न विचारला होता आणि उत्तरादाखल भगवान शंकरांनी तिला गुरुमाहात्म्य सांगितले. गुरुभक्ती कशी करावी हे शंकरांनी सविस्तर स्पष्ट केले आहे.
रम्य कैलास शिखरावर, पार्वतीने भगवान शंकरांना भक्तिभावाने नमस्कार करून विचारले— “गुरूचा महिमा काय? गुरुभक्ती कशी करावी?” या प्रसंगी पार्वती ही *साधक*, आणि भगवान शंकर हे *परात्पर गुरु* आहेत.
भगवान शंकर म्हणाले— “तिन्ही लोकांत दुर्लभ असे गुरुतत्त्व तुला सांगतो. श्रीगुरूच सदैव ब्रह्म आहे; गुरुशिवाय दुसरे ब्रह्म नाही. हे त्रिवार सत्य आहे.”
वेद, शास्त्रे, पुराणे, तीर्थयात्रा, दान–धर्म, तप—काहीही केले तरी गुरुतत्त्व नसल्यास साधक संसारबंधनातून मुक्त होत नाही. ज्ञानस्वरूप आत्म्याहून श्रीगुरू भिन्न नाहीत. आपल्या गुरूविषयी पूज्यबुद्धी आणि श्रद्धा असली की गुरुभक्ताचे इतर सर्व कर्तव्य संपते.
श्रीगुरुचरणतीर्थ धारण केल्यास सर्व तीर्थस्नानाचे पुण्य मिळते. ते सर्व पापांचा नाश करते, अज्ञानाचा नाश करते, आणि साधकाला संसारसागरातून पार करते.
साधकाने गुरुचरणतीर्थ प्राशन करून गुरु आज्ञापालन हेच उच्छिष्ट भोजन मानावे, गुरुमंत्राचा जप करावा आणि श्रीगुरुमूर्तीचे ध्यान करावे.
गुरुचे निवासस्थान हेच काशीक्षेत्र, गुरुचरणतीर्थ हीच गंगा, आणि गुरु हेच श्रीविश्वेश्वर.
गुरुच्या मुखातून मिळणारी विद्या गुरुभक्तीशिवाय प्राप्त होत नाही. आपले सर्वस्व गुरूला समर्पण करावे. गुरुकृपा हीच परमेश्वरप्राप्तीचे साधन आहे.
गुरू व्यक्ती नसून सर्वशक्तिमान तत्व आहे. गुरुचरण हे शिवशक्तीमय आहेत.
शंकर म्हणतात— “शिव रुष्ट झाला तर गुरु तारतो; पण गुरु रुष्ट झाला तर संपूर्ण ब्रह्मांडात त्राता नाही.”
गुरुसेवा आणि गुरुभक्ती याहून श्रेष्ठ दुसरे तप नाही.
श्रीगुरुगीतेच्या जपामुळे साधकाला— - दीर्घायुष्य - आरोग्य - ऐश्वर्य - संतती - आणि सर्व इच्छांची पूर्तता
मिळते, असे शास्त्र सांगते.
गुरुगीता ही कामधेनू, कल्पवृक्ष, आणि चिंतामणी आहे. एका गुरुगीतेच्या उपासनेने सर्व देवतांची उपासना होते.
भगवान दत्तात्रेयांनीही गुरुचरित्राच्या ४९व्या अध्यायात गुरुगीतेची हीच महती सांगितली आहे. म्हणून गुरुगीतेची पार्श्वभूमी प्रत्येकाने जाणून घ्यावी.
भगवान शंकर पार्वतीला म्हणतात— “जीवनात गुरु लाभला नाही तर जीवन व्यर्थ; गुरु केल्याशिवाय, गुरुसेवा केल्याशिवाय, आणि गुरुचरणांचे वंदन केल्याशिवाय आयुष्य सार्थक होत नाही.”
सांब सांगे भवानीसी। कैलासी स्थित होउनी। सद्गुरुमहिमा ऐके। कोणा जो नच वर्णवे ॥ १ ॥ गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू। गुरुर्देव महेश्वर। गुरु हाचि परब्रह्म। वंदू त्या गुरुराजया ॥ २ ॥ अज्ञानांधाचिया नेत्री। ज्ञानांजन ही घालूनी। उघडिले नयन हे ज्याने। वंदू त्या गुरुराजया ॥ ३॥ अखंड मंडलाकारी। व्यापिला जो चराचरी। दाविले तत्पदा ज्याने। वंदू त्या गुरुराजया ॥ ४ ॥ स्थावरी जंगमी आहे। नाही रिक्त चराचर। दाविले तत्पदा ज्याने, वंदू त्या गुरुराजया ॥ ५ ॥ चिन्मयी व्यापिला सर्व। त्रैलोकी सचराचरी। असि पदा दाविले ज्याने। वंदू त्या गुरुराजया ॥ ६ ॥ सर्व श्रुति रत्नेही। लोळती पदपंकजी। वेदांत गर्भ सूर्याला। वंदू त्या गुरुराजया ॥ ७ ॥ जयाच्या स्मरण योगाने। ज्ञान उत्पन्न होतसे। सर्व संपत्तीचा मेरु। वंदू त्या गुरुराजया ॥ ८ ॥ शांत शाश्वत चैतन्य। गगनातीत निरंजन। बिंदुनाद कालातीत। वंदू त्या गुरुराजया ॥ ९ ॥ स्वामी जो ज्ञान शक्तीचा। तत्वाला भूषवी बहू। भृक्तीमुक्तीचाही दाता। वंदू त्या गुरुराजया ॥ १० ॥ माझा नाथ जगन्नाथ। गुरु माझा जगद्गुरु | माझा आत्मचि भृतात्मा। वंदू त्या गुरुराजया ॥ ११ ॥ ध्यानाचे मूल श्रीनाथ। पूजेला सद्गुरुपद। मंत्र हे सद्गुरु आज्ञा। मुक्ती ही सद्गुरुकृपा ॥ १२ ॥ गुरु आदि अनादीही। सद्गुरु श्रेष्ठ दैवत। गुरुहुनी अधिक ना काही। वंदू त्या गुरुराजया ॥ १३ ॥ पदाच्या तीर्थस्नानाने। सप्त सिंधू मिळे फळ। जलबिंदू पदाग्रीचा। अल्पही लाभ दुर्लभ ॥ १४ ॥ गुरु हेची जगत् सारे। ब्रह्मा विष्णू महेश्वर। गुरूविना श्रेष्ठ ना कोणी। वंदू त्या गुरुराजया ॥ १५ ॥ नेति नेति, श्रुती बोले। ऐसा जो वंद्य सद्गुरु। मनाने तेवि वाचेने। घ्यावा गावा सदोदित ॥ १६ ॥ तत्कृपा दृष्टिने ब्रह्मा। विष्णू मी प्राप्त होतसे। सेवेने लाभते जीवा। शक्ती अद्भूत केवळ ॥ १७ ॥ सद्गुरु भक्तीने मुक्ती। ज्ञानावांचुनिही मिळे। सद्गुरु नाहि सामान्य। गुरुमार्गीही शिष्य तो ॥ १८ ॥ कळेना गुरुसेवेचा ॥ मार्ग मानव योनिला। तेवि किन्नर गंधर्व। पितरां अमरादिका ॥ १९ ॥ असो ते देव गंधर्व। किंवा किंकर यक्षही। नाही मुक्ती तया जे कां। गुरुसेवा परांङगमुख ॥ २० ॥ पार्वती ऐक गे आता। आनंदप्रद ध्यान ते। सर्व सौख्यांसि जे देई। भक्तिमुक्तीही आदरे ॥ २१ ॥ निराकारी निराभासी। नित्य शुद्ध निरंजन। नित्यबोध चिदानंद। गुरुब्रह्म नमः सदा ॥ २२ ॥ ॥ श्लोक ॥ हृदयकमली शोभे कर्णिका कोमलांगी। बसवी गुरुवरा या आसनी मध्यभागी ॥ विधुसम चमके हे गोजिरे ध्यान ध्याता। पुरविल गुरुराणा चित्सुखादी अभिष्टा ॥ २३ ॥॥ अनुष्टुप ॥ उत्पत्ति स्थिति संहारी। निधनादिक पंचही ॥ तत्वे शाश्वत ज्यामध्ये। वंदू तो शिव प्रत्यही ॥ २४ ॥ ऐशा श्रीगुरूते ध्याता। ज्ञान भेटे तया बळे ॥ तत् कृपाप्रसादाने। मुक्तिही सत्वरी मिळे ॥ २५ ॥ गुरुने दाविल्या मार्गी। चित्तशुद्धी करी सदा ॥ अनित्य जे दृष्टीला भासे। तयाचा मोह सोड तू ॥ २६ ॥ सद्गुरु महिमा ऐसा। ऐकोनीही निरंतर ॥ निंदिती निरयी जाती। यावच्चंद्र दिवाकरौ ॥ २७ ॥ श्रृतिचे स्मृतिचे ज्ञान। लाभे सद्गुरु सेवेने ॥ सर्व सौख्यनिधी आहे। सद्गुरु पदपंकज ॥ २८ ॥ नित्य ब्रह्म निराकारी। निर्गुणी पाहि सद्गुरु ॥ पुर्णानंदी निराभासी। ज्योतीज्योतीत तो असे ॥ २९ ॥ सद्गुरुच्या कृपायोगे। आत्मारामही लाभतो ॥ ह्याच सद्गुरु मार्गाने। आत्माज्ञानीही साधक ॥ ३० ॥ आब्रह्मस्तम्भ पर्यंत। परमात्म स्वरुप ते ॥ स्थावरी जंगमी तैसे। वंदू तो विश्वरूपक ॥ ३१ ॥ वंदी त्या सच्चिदानंदा। भेदातीता गुरूवरा ॥ नित्य पूर्णा निराकारा। निर्गुणा आत्मसंस्थिता ॥ ३२ ॥ परात्परतरा ध्यावे। जो नित्यानंदकारक। हृदयाकाशी वसे तोची। शुद्ध फटिक सम्यक ॥ ३३ ॥ स्फटिकी दर्पणी जैसे। प्रतिमेचे रुप दिसते ॥ चिन्मयादर्शही भासे। सोहं रुप शुभंकर ॥ ३४ ॥ अंगुष्ठमात्र पुरूषाते। ध्याता चिन्मय अंतरी ॥ तयाचे स्फूरणे येई। सर्व सामर्थ्य पार्वती ॥ ३५ ॥ अगोदर आगमही। नामरुपही ज्या नसे ॥ शब्द जाणिजे आत्मा। स्वयं भुगिरिजे सदा ॥ ३६॥ जैसे कुंभक कर्पूर। उष्णशीत स्वभावता ॥ तैसे ब्रह्म हे जाण। स्वाभाविक भवानि गे ॥ ३७॥ सर्वव्यापि असे मीच भावना दृढ ही करी ॥ कीटापासूनिया भृंग। तेवि साधक होतसे ॥ ३८ ॥ ध्याता होई स्वये ब्रह्म। गुरुध्यान करोनिया ॥ सर्वस्वी मुक्त तो होतो। नाही संशय यात गे ॥ ३९ ॥ गीर्वाणी गुरूगीतेसी। देऊनी रूप प्राकृत ॥ सद्गुरू व्यंकटनाथा। अर्पी मी नाथसुत सदा ॥ ४० ॥
गुरुगीतेची ही महती स्वतः भगवान दत्तात्रेयांनी गुरु म्हणून गुरुचरित्राच्या 49 व्या अध्यायात सांगितली आहे.
प्रत्यक्ष गुरुगीताही भगवान शंकराने पार्वतीला सांगितली आहे.
ही पार्श्वभूमीप्रत्येकाने समजून घ्यावी पूर्णपणे लक्षातघ्यावी आणि आपल्याला हे सर्व भगवान शंकर सांगत आहेत आणि गुरूगीतेचा दाखला भगवान दत्तात्रेय गुरू म्हणून देतआहेत हे समजल्यावरच गुरुदेव गुरुगीतेची महती कळेल. जीवनात जन्म सार्थक होण्यासाठी गुरुची नितांत आवश्यकता आहे. जीवन संपण्यापूर्वी, गुरु केल्या शिवाय, गुरुसेवा केल्याशिवाय गुरूंचे चरण वंदन केल्याशिवाय राहूच नयेअसे भगवान शंकर पार्वतीला सांगता आहेत आणि हेच भगवान दत्तात्रेय गुरु म्हणून गुरुची महती गुरुचरित्राच्या 49 व्या अध्यायात आवर्जून सांगत आहेत. .