अनुक्रमणिका

मृत संजीवन

विप्रस्त्रीचा शोक आणि दत्त अवताराचे आगमन

गुरुचरित्र अध्याय ३२ मध्ये वर्णन आले आहे की मागच्या अध्यायात ती विप्रस्त्री अनेक प्रकारांनी दुःख प्रलाप करीत असताना तिथे एक साधू आला. त्याच्या सर्वांगावर भस्म लागलेले होते, हातात त्रिशूल आणि रुद्राक्षांच्या माळा होत्या. तिच्याजवळ येऊन तो साधू म्हणाला की, का रडतेस तू? माणसाच्या नशिबात जे लिहिले ते होतच असते. पूर्वजन्मी केलेल्या कर्माच्या अनुषंगानेच हे घडत असते. त्यामुळे व्यर्थ शोक करू नकोस; या भूलोकावर सगळेच जण आले तसे जाणारच आहेत. हा साधू दुसरे तिसरे कोणी नसून प्रत्यक्ष गुरु भगवान दत्तात्रेयच होते. साधूरूपाने स्वामींनी तिची समजूत काढण्याचा व तिला जीवनधर्माचे ज्ञान देण्याचा प्रयत्न केला. जीवनात सत्कर्म केल्याशिवाय गती नाही. काम, क्रोध, मद, मोह, मत्सर यांनी जीव ग्रस्त झाला तर सद्य व पुढील जन्म दोन्ही दुःखीकष्टी होतात. ब्रह्मांडाच्या नियमानुसार जीवाचा उद्धार होणारच आहे, परंतु सत्कर्म आणि गुरुसेवा केल्याशिवाय तो झपाट्याने होत नाही.

सहगमनाचा धर्म आणि विधवापदाची शिकवण

पंचत्व पावलेल्या त्या विप्राच्या पत्नीला स्वामी महाराजांनी पातिव्रतेचा आचार सांगितला आणि सहगमनाचे फलही सांगितले. तथापि, सर्व स्त्रियांनी सहगमन करावे असा याचा अर्थ नव्हे. कोणत्या परिस्थितीत सहगमन निषिद्ध आहे ते गुरुंनी स्पष्ट केले. देवगुरु बृहस्पतींना ऋषींनी विचारले असता त्यांनी सांगितले की, स्त्री गरोदर असेल, स्तनपान करणारे बालक असेल किंवा पती देशांतरी निधन पावला असेल तर सहगमन पाप आहे. अशा स्त्रीने विधवापणीचा धर्म—केशवपन, एकभुक्त, साधेपणा—हे आचरण करावे. तीर्थयात्रा, व्रत, दान इत्यादी गुरु अथवा विष्णूच्या साक्षीनेच करावीत. पळस पत्रावळीवर भोजन, हेमंत ऋतूमध्ये वस्त्रदान, गोदान, पाणपोई, दीपदान अशी कर्मे फलप्रद मानली आहेत. आत्मा वै पुत्र—या श्रुतीनुसार पुत्राची आज्ञा घेऊन वागावे. तरुण वयात विधवेला समाजात धोके संभवतात म्हणून ही बंधने सांगितली आहेत.

स्वामींनी हे सर्व त्या विप्रपत्नीला सांगून तिच्या डोक्यावर वरद हस्त ठेवला. क्षणात तिचा शोक दुरावला, विवेक जागृत झाला. ती म्हणाली की, “देवा, मी दूरून आले. आता तुम्हीच माझे मायबाप. विधवापणाचे आचार कठीण आहेत. लोकनिंदा होईल. त्यापेक्षा सहगमनातच मला सुख वाटते. मला आशिर्वाद द्या.” स्वामी स्नेहाने म्हणाले, “बाळे, तुला जे सोपे वाटते ते कर.”

गुरुंचा वरदहस्त आणि मृतदेहास पुनर्जिवन

स्वामी म्हणाले, “तू सहगमनाची तयारी कर व पुढे आमच्या दर्शनाला ये.” संगमावर अखंड रुद्रसूक्ताचा अभिषेक चालू होता. तिने दुरूनच स्वामींना नमस्कार केला. तेव्हा श्रीगुरूंनी तिला “अष्टपुत्रा सौभाग्यवती भव” असा आशिर्वाद दिला. लोक म्हणाले की तिचा पती निवर्तला आहे आणि तिने सहगमनाची तयारी केली आहे. मग असा आशिर्वाद? यावर गुरु म्हणाले, “मी बोललो ते बोललो; आता महादेवाची इच्छा.” कारण लयाचे कार्य महादेवाकडे असल्याने त्यांची संमती आवश्यक होती. तरीही गुरु आपला आशीर्वाद फलद्रूप करण्यास सज्ज झाले.

ते म्हणाले, “ते प्रेत आणा.” प्रेत संगमावर आणले. गुरुंनी रुद्रसूक्त तीर्थाने स्नान करण्यास सांगितले. त्यानंतर स्वामींनी कृपादृष्टी टाकताच त्यात प्राण परत आले. स्त्री व पुरुष दोघांनीही श्रीगुरूंची स्तुती केली. तेव्हा गुरु म्हणाले, “भक्त रक्षणासाठी त्या विप्राच्या पुढील जन्मातील तीस वर्षे आम्ही ईश्वराकडून उसनी घेतली आणि त्याला दिली. पुढील जन्मातील आयुष्य कमी करून या जन्मात प्राप्त करणे हे केवळ सद्गुरूच करू शकतात. पंचमहाभूतांवर त्यांचे प्रभुत्व असते. ब्रह्मांडनायक तेच आहेत. देवांनाही असा व्यवहार शक्य नाही. जन्म–मृत्यूच्या फेर्‍यात हस्तक्षेप करण्याचे सामर्थ्य केवळ गुरुंकडेच आहे.”

हे पाहून जनसमुदाय जयघोष करू लागला— अनंत कोटी ब्रह्मांडनायक, राजाधिराज योगीराज भगवान दत्तात्रेय स्वामी महाराज की जय!