नोव्हेंबर 1992ची गोष्ट आहे. एकदा महाराजांनी नरेंद्रला पत्र पाठवून देवगावला बोलावून घेतले. पत्र पाहताच निघून ये असे लिहिले होते. ही गोष्ट खरं तर त्यांच्याच वाणीतून तुम्ही ऐका. महाराजांचे पत्र आले म्हणून देवगावला महाराजाच्या दर्शनासाठी मी गेलो. शांत वेळ मिळाल्यावर ते आणि मी दोघेच होतो. सभा मंडपाच्या वरच्या माडीवर देवा समोर महाराज खाली जमिनीवरच बसले होते. त्यांना नमस्कार करून मीही तेथेच त्यांचे जवळ समोर बसलो. त्यांनी माझ्याकडे निरखून पाहिले आणि अचानक अकस्मात मला चक्रावून टाकणारा एक प्रश्न विचारला. बाळ, मी समाधी घेऊ का? प्रश्न विचारून ते माझेकडे पाहतच राहिले. प्रश्न ऐकून, मी पार गोंधळून गेलो होतो. अशा प्रश्नाची कुठलीही कल्पना नव्हती सदगुरूशी आपण कसे बोलावे याबद्दल पूर्ण माझा गोंधळ उडाला होता. काहीच सुचत नव्हते व कळतही नव्हते. काय करावे काय नाही, या गोंधळातच मी राहिलो. तेवढ्यात त्यांनी पुन्हा तोच प्रश्न विचारला. मी शरणागती पत्करली. त्यांचे पायावर डोके ठेवले. माझे कान धरले आणि म्हणालो, महाराज मला क्षमा करा, मला त्यातील काहीच समजत नाही. क्षमा करा. त्यावर ते म्हणाले तुला समजत नाही हे तुझ्यापरी खरे आहे, पण मी कोणाला काय विचारावे हे मला समजत नाही असे तुला वाटते का? मी पुन्हा त्यांच्या पायावर डोके ठेवून वंदन केले व म्हणालो महाराज मला क्षमा करा मला खरेच काही सांगता येत नाही. त्यावर ते म्हणाले, माझ्याकडे निरखून पहा. माझ्या डोळ्यात डोळे घालून पहा व प्रश्नाचे उत्तर दे. प्रश्नाचे उत्तर घेतल्याशिवाय गुरू आपल्याला सोडणार नाही, येथून आपल्याला कोठेही पळून जाता येत नाही, अशी परिस्थिती होती. गुरूंसमोरच बसलेलो आहोत तेव्हा महाराज सांगतील तसे करीत राहावे, असा विचार करून त्यांच्या आज्ञेचे पालन केले व त्यांच्या डोळ्यांकडे पाहत बसलो. तोंडून काहीही शब्द निघत नव्हते. त्यावर ते म्हणाले प्रश्नाचे उत्तर तुला द्यावेच लागेल. पुष्कळ टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला. परंतु महाराजांना उत्तर देणे भाग आहे त्याशिवाय गत्यंतर नाही हे लक्ष्यात आले होते. प्रश्नाचे हो किंवा नाही हे उत्तर देणे फारच कठीण होते. त्यांचेच स्मरण करून त्यांच्या पायावर डोके ठेवून नमस्कार केला आणि अत्यंत खोल आवाजात त्यांना म्हटले, महाराज खरेच मला काहीच समजत नाही. पण तुम्ही सांगितले तसे केल्यावर हेच म्हणावेसे वाटत की आपल्या कार्याचा भार पार पाडता पाडता, आपले शरीर पार झिजून गेले आहे. नित्य योगीक क्रिया करायला लागणार शारीरिक बळ खूप कमी पडत आहे. ह्या सर्वांचा आपल्याला खूप त्रास होताना दिसत आहे. एकंदरीत विचार करता आपल्या प्रश्नाचे उत्तर द्यायचे म्हणून म्हणणे भाग पडते की आता वेळ आलेली आहे आणि आपण समाधी घेणे हेच योग्य वाटते. तरी पुन्हा क्षमा मागतो मी असे सांगणे योग्य नाही हेच मला वाटते, आपण मला क्षमा करावी. त्यावर ते लगेचच बोलले तू योग्य तेच सांगितले आहे व ते बरोबर आहे. तू काही काळजी करू नको. सांगितलेली उपासना साधना करीत राहा. आमची समाधी यथायोग्य चांगल्या तर्हेने होईल यासाठी सांगतो ते अनुष्ठान तू सुरु कर. मी पुन्हा पायावर डोके ठेवून क्षमा याचना केली आणि म्हटले महाराज मला खरच काही समजत नाही माझ्या बोलण्यावर कुठलेही व कोणतेही निर्णय घेऊ नका. त्यावर ते म्हणाले तुला एवढ्यासाठीच बोलावले होते तू आता परत जा आणि उद्यापासून सांगितलेले अनुष्ठान सुरु कर. पूर्वी ज्यावेळी महाराजांच्या जीवनावर अत्यंत कठीण प्रसंग आला होता त्यावेळी मीच त्यांना विचारले होते की डॉक्टर्स सांगतात तो तुमच्यावरचा कठीण प्रसंग टाळण्यासाठी काय करू. त्यावर त्यांनी सांगितलेला उपाय केल्यावर ते तीन वर्ष कोणताही त्रास न होता राहिले होते. आज त्यांनी अशी परीक्षा घेतली. जे काही आहे ती त्यांचीच योजना आहे. महाराजांची परवानगी घेऊन मी अकोल्याला आलो.
पुन्हा 15 दिवसांनी परत महाराजांचे पत्र आले. मी लगेचच देवगावला गेलो महाराज म्हणाले का रे बाळ तू आम्हाला कबूल केले होते व सांगितल्याप्रमाणे तू अनुष्ठानाला सुरुवातदेखील केली नाही. त्यावर मी म्हणालो महाराज अभिमन्यूसारखी माझी गत झाली आहे. हे कारण मला माहिती आहे, परंतु माघारी येऊन बाहेर पडणं हे मला माहीत नाही. त्यामुळे मी काय करावे मला कळतच नाही. ते म्हणाले, आमच्या निर्णयात कोणताही बदल होणार नाही. ते सर्व आम्ही पाहून घेऊ. तू काहीही काळजी करू नकोस. सर्व काही आपोआप घडवून येईल. तसे तुला काहीच करण्याची गरज नाही. सर्व काही आम्हीच करीत आहोत. तू निमित्तमात्र आहेस. पुढे पुढे जात राहा आता येथून गेल्यावर लगेचच अनुष्ठानाला सुरुवात कर.
महाराज म्हणाले, तू काहीही काळजी करू नको, कोणालाभिऊ नको, आमचं कार्य करीत रहा. तुला ज्या वेळेला प्रकर्षाने वाटेल की आम्ही प्रत्यक्षपणे उभे राहावे त्यावेळी तू पाट मांड आणि हाक मार, आम्ही सदेह तिथे उभे राहून तुला पाहिजे ते साहाय्य करू. तू आमचं गुरुकार्य मनापासून करशील अशी आमच्या पायावर हात ठेवून शपथ घे. तसे केल्यावर त्यांनी आशीर्वाद दिले.
देवगावहून निघण्यापूर्वी ते म्हणाले, बाळ आमच्याकडून आता काहीच होत नाही. पौचीची देखील पूजा होत नाही. पौची म्हणजे नवग्रह असलेली सोन्याची डबी. तिच्यावरून महाराजांना ग्रहस्थिती, वेळ आणि वातावरणातील घडामोडी कळत. ती त्यांनी कधीच कोणाला दिली नव्हती. नरेंद्रने विचारले की मी ती अकोल्याला घेऊन जाऊ का. आईची परवानगी घेऊन महाराजांनी ती द्यायला कबूल केले. नित्यनियमाने पूजा सुरू केली. चार-पाच दिवसांनी महाराजांचे व्याही आणि धाकटे पुत्र आले आणि पौची परत मागितली. नरेंद्रने ती परत दिली परंतु म्हणाले यातील तेज येथेच राहील.
महाराजांनी सांगितले चार महिन्यांनी घटना घडेल. तू तुझ्याच घरी असशील. आणि तसेच झाले. पद्माकर चोरघडेचा फोन आला की महाराजांची प्रकृती अत्यवस्थ आहे. नरेंद्र म्हणाला मला सर्व माहिती आहे. महाशिवरात्रीला महाराजांनी दुपारी 12 ला कार्यअवतार संपवला.
समाधीच्या 18 वर्षे आधीच महाराजांनी नरेंद्रला आणि लीला जोशींना होणाऱ्या परिणामांबद्दल सांगितले होते आणि मानसिकता तयार केली होती. त्यामुळे कोणताही विपरीत परिणाम झाला नाही.
प्राप्त परिस्थितीत कर्म करीत राहावे, परिस्थितीला दोष देऊ नये. दासबोध, ज्ञानेश्वरी, तुकाराम, भागवत नित्य वाचावे. गुरूंच्या निवासस्थानी वर्षातून दोनदा जावे. मारुती, राम, कृष्ण यांच्या उपासनेने गुण लाभतात. जपतप, साधना, अनुष्ठानाने कर्म सतेज होते. ग्रहणकाळात उपासना करणे अत्यावश्यक आहे. भोजन, आहार, विहार, निद्रा यांच्यावर नियंत्रण असावे. जीवनामध्ये तीर्थयात्रा व सिद्धस्थळी उपासना करावी. अन्नदान करावे. शुद्ध भावनेने जीवन जगावे.
लेखमालेत वर्णन केलेल्या गुरुचरित्रातील अनुभूती मी प्रत्यक्ष घेतल्या आहेत. गुरु म्हणाले होते “किती उशीर केला रे.” सर्व ब्रह्मांडावर त्यांची सत्ता, स्थित्यंतर करण्याचे सामर्थ्य, जीवावर सत्ता, हे अनेकांनी अनुभवले. 1975 सालीच त्यांनी 1993ची समाधी सांगितली होती. जीवनाचे रहस्य, कर्म बदलणे, विभूतीचा उपयोग, मंत्रतंत्र, वेदमंत्रांचे महात्म्य, देवतेकडून गुणधर्म घ्यायचे तत्त्व, हे सर्व त्यांनी नरेंद्रला शिकवले. मच्छिंद्रनाथांपासून चालत आलेली अखंड परंपरा ते पंधरावे नाथ होते.