अनुक्रमणिका

गहनिनाथ

मच्छिंद्रनाथांनी सर्व देवदेवतांकडून गोरक्षनाथांना कृपा आशीर्वाद घडवून दिले. नरशा, कालिका, म्हमदा, महिषासुर, ढोटिंग, वेताळ, मारूती, श्रीरामचंद्र यांचे प्रत्यक्ष दर्शन घडविले. प्रभू रामचंद्राने तर गोरक्षाला सरळ आपल्या मांडीवर घेतले आणि यशवंत हो, कीर्तिवंत हो, पंथाचे उद्देश व कार्य सफलतेने पार पडो असे आशीर्वाद दिले.

अष्टभैरव, मातृका, गणपती व सूर्य यांनी तर पृथ्वीवर उतरून त्याला प्रत्यक्ष आशीर्वाद दिले. प्रभू रामचंद्र, सूर्यनारायण, बावन्न वीर, इंद्रवरूण, ऐशनी, गणगंधर्व आदी सर्वांनीच प्रत्यक्षपणे आशीर्वाद दिले व गोरक्षास तपानुष्ठान करण्यास सांगावे अशी विनंती मच्छिंद्रनाथांना केली. तपानुष्ठानाने मंत्र, तंत्र, यंत्र, अस्त्रे आदींना तपसिद्धी मिळून त्याची सामर्थ्यसत्ता वाढेल असे सांगितले.

एक दिवस गोरक्षनाथ संजीवनी मंत्राचे अनुष्ठान करीत बसला होता. त्याच्या जवळ मच्छिंद्रनाथ नव्हते; गोरक्ष एकटाच होता. त्यावेळी काही मुले खेळत खेळत त्याच्या जवळ आली. गोरक्षाचे काय अनुष्ठान चालले आहे हे बाहेरच्या कुणालाही कळत नव्हते. ती मुले मातीची खेळणी करण्यांत दंग होती.

बरेच प्रयत्न करूनही गाडी तयार करताना त्यांना जमत नव्हते. म्हणून त्यांनी गोरक्षाला मातीची गाडी करून देण्यासाठी विनविले. गोरक्षाने ताबडतोब मान्य केले व मातीची गाडी करू लागला. खेळणे करीत असताना त्याचे मंत्रपठण सुरूच होते.

गाडी पूर्ण होताच मुलांनी त्याला पुन्हा म्हटले की, “याला एक गाडिवान तयार करून द्या.” गोरक्षाने लगेच मातीचा पुतळा बनवायला घेतला. मंत्राचे पुरश्चरण सुरूच होते. परिणामतः पुतळा तयार होताच त्यात जीव आला आणि तो एक जीवंत लहान मुलगा बनला.

जसा गोरक्ष हा अयोनी संबंधातून जन्माला आला तसाच हा मुलगाही मातीच्या पुतळ्यातून — अयोनी संबंधातूनच — जन्माला आला. हा मुलगा आईविना वडिलांविना केवळ संजीवनी मंत्राच्या प्रभावातून जन्मला.

त्याचे नाव करभंजननाथ किंवा गहिनीनाथ. नाथपंथामध्ये महत्त्वाची भूमिका वठवून, नाथपंथाचे फार मोठे कार्य गहिनीनाथांनी केले.

करभंजन नारायण उर्फ गहिनीनाथ

नवनारायणांनी आपला कार्य-अवतार संपवून, यापूर्वी नाथपंथाचे सर्व सामर्थ्य, शिस्त, कार्यपद्धती व हेतू हे गहिनीनाथांमार्फत निवृत्तीनाथांपर्यंत सोपवले. निवृत्तीनाथ हे कुटुंब व्यवस्थेतून आलेले पहिले नाथ होते. यापूर्वीचे सर्व नाथ अयोनी संबंधातून अवतरले होते.

अयोनी संबंधातून प्रगट झालेल्या सर्व नाथांनी आपल्या सर्व शक्ती, साधना, सामर्थ्य, देवतांनी दिलेले वचन आणि वामशक्तींची वचने, स्वतः निर्माण केलेले काव्य-मंत्र हे सर्व गहिनीनाथांकडे सोपविले आणि गोरक्षनाथांच्या योजनेप्रमाणे गहिनीनाथांनी ते सर्व निवृत्तीनाथांकडे सोपविले.

अशा प्रकारे तोच नाथपंथ — त्याच उद्देशाने, सामर्थ्याने व योजनेप्रमाणे — पुढे कार्य करू लागला. आजही हा पंथ अखंड गुरुपरंपरेने त्याच पद्धतीने, सामर्थ्याने, उद्देशाने व शिस्तीने कार्य करीत आहे.

गहिनीनाथांचे स्वभाव व जीवन वैशिष्ट्ये

सत्य, त्रेता, द्वापार आणि कली अशी चार युगे आहेत. या युगामध्ये भगवंताचे वेगवेगळे रंग, नामे आणि आकृती असतात. तसेच वेगवेगळ्या विधींनी त्यांची पूजा केली जाते.

सत्ययुग भगवंत शुभ्रवर्णाचे, जटाधारी, वल्कलधारी असतात. माणसे शांत, समदर्शी, इंद्रियसंयमी आणि तपश्चर्येने देवाची आराधना करणारी असतात.

त्रेतायुग भगवंत लालवर्णाचे, सुवर्णकेशी, वेदप्रणीत यज्ञस्वरूप. लोक वेदाध्ययन-अध्यापन करणारे व यज्ञांनी भगवंताची पूजा करणारे.

द्वापरयुग भगवंत सावळे, पितांबरधारी, शंख-चक्र-गदाधारी. लोक वैदिक व तांत्रिक विधीने पूजा करणारे.

कलियुग भगवंत कृष्णवर्ण, इंद्रनीलप्रभेचे. श्रेष्ठ पुरुष नामसंकीर्तनरूप यज्ञांनी त्यांची पूजा करतात.

कलियुगात नामसंकीर्तनानेच मनोरथ पूर्ण होतात, म्हणून या युगाला योग्यतम मानले जाते. संसारचक्रात फिरणाऱ्या मनुष्याला भगवन्नामापेक्षा अधिक लाभ नाही.

सत्य, त्रेता व द्वापर युगातील लोकांना देखील असे वाटते की, आपला जन्म कलियुगात व्हावा, कारण या युगात भगवत्परायण भक्त जन्माला येतात.

जो कर्तृत्वाचा अहंकार सोडून, शरणागतभावाने भगवंताला वंदन करतो तो सर्व ऋणातून मुक्त होतो. जो भक्त भगवंताच्या चरणांचे अनन्य भजन करतो, त्याच्याकडून चुकून पाप घडले तरी श्रीहरी ते धुऊन टाकतात.

अशा उच्च, गूढ व सारगर्भ विचारांचे गहिनीनाथ म्हणजेच करभंजन नारायण होते.

अशा तेजस्वी व्यक्तिमत्त्वाचे, अतुलनीय सामर्थ्याचे कृपाछत्र या पंथाला लाभले आहे. आजही भाविक त्यांची अनुभूती घेऊन आपले जीवन कृतार्थ करीत आहेत.

कलियुगातील लोकांच्या आत्मोन्नतीसाठी, त्यांच्या जीवनाचा उद्धार व्हावा म्हणून नाथांनी असा उपदेश दिला आहे.