जालिंदरनाथास घोड्याच्या लिदीत पुरल्यामुळे कानिफाला अनावर राग आला होता. आत्ताच याचे भस्म करून टाकावे, असे त्याच्या मनांत आले; परंतु त्याने संयम बाळगला व शांत राहिला. तो राज्याच्या सीमेवर आल्यावर त्याने गोपीचंदाला निरोप पाठवला.
कानिफाचा लवाजमा पाहून राजा खूपच प्रभावित झाला होता. जालंदरनाथांपेक्षा हा गुरु माझ्या योग्यतेचा आहे. हाच माझा गुरु असावा, असे त्याच्या मनात आले. गोपीचंदराजा कानिफाच्या जवळ आल्यावर मोठ्या आदबीने त्यांचे भव्य स्वागत करून त्यांच्या पाया पडला. त्यामुळे कानिफ जरा शांत झाला; परंतु मनातला राग स्वस्थ बसू देत नव्हता.
तरी कानिफाने गोपीचंदराजाला जवळ बसून घेतले व म्हणाला, राजा तुझ्याकडून एक अक्षम्य अपराध घडला आहे. तुझ्या आईची पुण्याई व माझ्या गुरुंची, जालिंदरनाथांची, तुझ्यावर कृपा म्हणून तुझे प्राण वाचले; अन्यथा तुझे प्राण कोणीच वाचवू शकला नसते. त्यांनी तुला तेथेच भस्मसात करून टाकले असते. हे ऐकून राजा घाबरूनच गेला.
राजाने क्षमायाचना केली व विनवणी करून म्हणाला की, मला आपले संरक्षण व अनुग्रह द्यावा. राजा त्याला आपल्या राज्यात घेऊन गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी गोपीचंद राजा नाथांच्या शिबिरात गेला व त्यांच्या पाया पडला.
तेव्हा कानिफाने राजाला विचारले, ‘‘तू जालिंदरनाथांना कोणत्या जागी पुरले ते मला दाखव.’’ मग राजाने लगेच ती जागा दाखविली. नाथाने आपल्या एका शिष्याला त्याच्या बरोबर पाठविले. त्या शिष्यास ते ठिकाण दाखवून राजा परत आल्यावर कानिफनाथाने राजाला विचारले, ‘‘आता जालिंदरनाथांना बाहेर कसे काढायचे ते सांग.’’
त्या काळांत शंका-कुशंकें शिवाय, विश्वास ठेऊन व्यवहार होत असत. विशेषतः बैरागी, साधू, संत व महात्मे यांच्या वर विश्वास होता. आता जनमानसामध्ये कली एवढा भिनला आहे की सहजतेने विश्वास कोणावरही ठेवला जात नाही.
नाथपंथाच्या सामर्थ्याचे जे वर्णन या ग्रंथातून केले आहे, त्या प्रकारच्या सामर्थ्यावर त्या काळात विश्वास होता. आता काळाच्या ओघांत ती परिस्थिती राहिली नाही. वातावरणातील बदलामुळे आजच्या काळात या सर्व गोष्टी अतिरंजित वाटतात.
आज साधूंच्या अंगवस्त्रांवरूनच त्यांच्या बद्दल साशंकतेचे विचार प्राबल्याने येतात. आजकालचे साधूदेखील भगवी वस्त्रे केवळ स्वार्थप्रेरित हेतूंनी घालतात. आपल्याला मान्यता मिळविण्यासाठी ते पाहिजे ते करतात.
गोपीचंद कानिफनाथांना म्हणाला, ‘‘महाराज, जालिंदरनाथांना बाहेर कसे काढावे, याबाबतीत मला काहीच समजत नाही. मी सर्वस्वी तुम्हाला शरण आलो आहे. आपण जसे सांगाल तसे मी करेन.’’
गोपीचंदराजाचे असे दीनवाणी बोलणे ऐकून कानिफनाथ म्हणाले, ‘‘राजा, तुझे प्राण मी वाचवितो. मी तुला गुरुंच्या कोपापासून मुक्त करतो. त्यासाठी एक युक्ती सांगतो, त्याप्रमाणे तू कर. प्रथम तू तुझ्यासारखे सोने, रुपे, तांबे, पितळ व लोखंड असे पंचधातूंचे पाच पुतळे तयार करून आण.’’
धर्मग्रंथातून म्हटलेच आहे: ‘ईश्वरू होय जरी कोपिता | गुरु रक्षील परियेसा | परि गुरु कोपेल एखाद्यासी | कोणी न रक्षी तयासी’
येथे जालिंदरनाथांच्या कोपाला आवर घालणे अशक्य होते. केवळ त्यांच्या शिष्य कानिफनाथांनाच हे शक्य होते. कोणत्याही नाथांना हे करता आले असते; परंतु जालिंदरनाथांची परवानगी नसल्याने त्यांच्या इच्छेविरुद्ध कोणी गेले नाही—हेच तर नाथपंथाचे वैशिष्ट्य.
हे ऐकून राजा खूपच घाबरला. त्याने ताबडतोब उत्तम सोनार, तांबट, लोहार इत्यादी कारागिरांना बोलावून आणले व आपल्या सारखे हुबेहुब पाच पुतळे तयार करण्यास सांगितले. कारागिरांनी सर्व कला पणाला लावून पुतळे तयार केले.
खोल खड्ड्यातील गुरुंशी संपर्क साधण्याची कला कानिफनाथांना माहीत होती.
चांगला दिवस पाहून सर्व पुतळे घेऊन कानिफनाथ, गुरु पुरले त्या ठिकाणी राजाला घेऊन गेले. स्वतः खोल खड्ड्याच्या काठावर बसले. गोपीचंद राजाला प्रथम सोन्याचा पुतळा ठेवायला सांगितले.
कानिफनाथ म्हणाले: ‘‘तु कुदळ घेऊन खणायला लाग. जालिंदर गुरु नाव विचारताच तू नाव सांगून वेगाने बाहेर ये व तुझा पुतळा आत ढकलून दे.’’
राजाने तसे केले. आतून आवाज आला: ‘‘खड्ड्यावर कोण घाव घालीत आहे? तुझे नाव काय?’’
राजा म्हणाला, ‘‘मी गोपीचंदराजा आहे.’’ जालिंदरनाथांचा क्रोध उफाळून आला: ‘‘गोपीचंद राजा होगा तो जल कर भस्म हो जायेगा!’’ सुवर्णपुतळा तत्क्षणी भस्म झाला.
उर्वरित पुतळ्यांनाही हेच घडले—जालिंदरनाथांच्या क्रोधाग्नीने सर्व पंचधातू जळून भस्म झाले.
कानिफनाथांच्या मार्गदर्शनाखाली राजा वाचला. शेवटी कानिफनाथांच्या आज्ञेवरून पुन्हा राजा खणू लागला. पुन्हा आवाज आला. दरम्यान जालिंदरनाथांनी विचार केला:
‘‘माझा क्रोध संपूर्ण बम्हांड जाळू शकतो—तरी गोपीचंद वाचला! याच्या पाठिशी ईश्वरी शक्ती आहे. हा मरत नाही. आता याला अमर करावे.’’
कानिफनाथांनी आपले व गोपीचंदराजाचे नाव सांगून विनवणी केली: ‘‘गुरुजी, आपण दर्शन द्यावे. गोपीचंदराजा आपल्याला बाहेर काढण्यासाठी खड्डा उकरत आहे.’’
जालिंदरनाथांनी उत्तर दिले: ‘‘राजा गोपीचंद अजूनपर्यंत जिवंत राहिला आहे तर तो आता अमर होऊन जगात राहील!’’
खड्डा जुना असल्याने उकरला जात नव्हता. शेवटी जालिंदरनाथ म्हणाले, ‘‘खणू नका.’’ त्या क्षणी त्यांनी शाक्रास्त्र जपून वज्रास्त्र काढले. माती हलकी झाली व जालिंदरनाथ स्वतः बाहेर प्रकट झाले.
गोपीचंदाने नाथांना लिदीत पुरले तेव्हा नाथांनी विरोध केला नव्हता; पण बाहेर काढताना गोपीचंदाचे प्राण पणाला लागले. केवळ कानिफनाथांमुळेच राजा वाचला— एवढेच नव्हे तर जालिंदरनाथांनी राजा गोपीचंदाला अमर केले.