व्यंकटनाथ महाराजांनी कार्याला सुरुवात केल्यानंतर त्यांचे शिष्य भक्त वार्षिक उत्सवानिमित्त देवगाव रंगारी येथे जात असत. एकदा अशाच एका उत्सवाला जवळजवळ १०० लोक जमले होते. त्या काळात हिंदू–मुसलमान वाद समाजात प्रकर्षाने वाढलेला होता आणि रझाकांच राज्य असल्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यात मुसलमानांच्या इच्छेनुसारच राज्यकारभार चालत असे. देवगाव रंगारी हे एक लहान खेडे होते. उत्सवासाठी सर्व लोक जमले असताना पोलीस स्टेशनवरून एक अधिकारी आणि एक पोलीस महाराजांकडे आले आणि म्हणाले की ‘‘जेवढे हिंदू आहेत त्यांना पकडून घेऊन जातो; इतक्या लोकांची जमावबंदी म्हणजे अराजकीय हेतू असावा.’’ त्यावर महाराज शांतपणे म्हणाले, ‘‘हे उत्सवानिमित्त आले आहेत; त्यांना हात लावू नका. जर तुम्हाला वाटत असेल की मी काही चुकीचे केले आहे तर मला घेऊन जा, पण यांना नका स्पर्श करू.’’ परंतु त्या अधिकाऱ्याच्या मनात दुष्ट हेतू होता. त्याने महाराजांना हातकड्या घातल्या. महाराजांनी शिष्यांना सांगितले, ‘‘शांत बसा, काहीही गडबड करू नका. आम्ही परत येऊ.’’ घराच्या खाली उतरल्यावर अधिकाऱ्याने सहकाऱ्यांना सांगितले की महाराजांना दोरीने बांधा आणि गावातून जीपच्या मागे ओढत पोलीस स्टेशनला घेऊन चला. गावात मुसलमान वस्ती जास्त असल्याने दहशत निर्माण व्हावी म्हणून हा प्रकार मुद्दाम करण्यात आला. सर्व गावकऱ्यांनी हे दृश्य पाहिले.
स्टेशनला पोहोचल्यावर अधिकाऱ्याला वाटले की त्याने मोठा पराक्रम केला आहे. महाराजांनी पुन्हा सांगितले, ‘‘आम्ही काहीही गुन्हा केलेला नाही. आम्हाला सोडा. तुमचंच भलं होईल.’’ पण अधिकारी अहंकाराने अंध झाला होता. त्याने महाराजांना पिंजऱ्यात ढकलले. शिवीगाळ संपताच महाराज शांतपणे म्हणाले, ‘‘दोन तासांच्या आत तुझी बायको मरेल. मग विचार कर आणि आम्हाला सोड; अन्यथा वाईट प्रसंग ओढवेल.’’ थोड्या वेळात घरून निरोप आला की अधिकाऱ्याची बायको अचानक आजारी पडली आहे; त्याने दुर्लक्ष केले. थोड्या वेळाने दुसरा निरोप आला—ती मेली. अधिकारी धावत घरी गेला; रक्ताची उलटी होऊन त्याची बायको मृत पडलेली. घाबरून तो पुन्हा स्टेशनवर आला तर तिथे संपूर्ण चौकी मुसलमान जमावाने भरलेली. ते सर्व म्हणाले, “वो फ़क़ीर है, हमारे अल्लाह जैसा है; उसे छोड़ दो, वरना हम सब मिलकर आपको मारेंगे.” दबाव वाढल्यावर अधिकाऱ्याने महाराजांना सोडले. तो म्हणाला, ‘‘तुम जावो… हम देखेंगे.’’ महाराज म्हणाले, ‘‘अल्लाह को याद करो.’’ जमावाने महाराजांना घरी आणले आणि त्यांच्या समोर बसून नमाज पडली.
गावकऱ्यांनी महाराजांना विचारले, ‘‘आता त्या अधिकाऱ्याचे काय होईल?’’ महाराज म्हणाले, ‘‘वरचे अधिकारी येऊन त्याला घेऊन जातील आणि त्याचा अत्यंत वाईट अंत होईल.’’ दोन दिवसांनी औरंगाबादचे दोन अधिकारी आले. त्यांनी चौकशी केली आणि ठरवले की जसा त्या अधिकाऱ्याने महाराजांना जीपला बांधून ओढले होते, तसाच त्याला दोरीने जीपला बांधून गावभर फिरवायचे. गावातील खडकाळ रस्त्यांवरून जीप धावली. पहिल्याच फेरीत दोरीने बांधलेला अधिकारी जमिनीवर पडला आणि दगडावर आपटत आपटत रक्तबंबाळ होऊन त्याचाच मृत्यू झाला. या अधिकाऱ्यांनी महाराजांची क्षमा मागितली आणि म्हणाले, “जब पता चला कि आप फ़क़ीर हो और मुसलमानों को आपपर अल्लाह जैसा भरोसा है, तब हमें जताया गया कि जैसे महाराजजी को जीप के पीछे दोर से बांधा था वैसे ही उसको दोर से बांधकर घुमाना.”
या घटनेनंतर गावातील सर्व मुसलमान महाराजांवर अधिक श्रद्धा ठेवू लागले. ते मशीद सोडून महाराजांच्या ओट्यावर बसून नमाज पडू लागले. महाराज म्हणाले, ‘‘असे करू नका; तुमच्या शिरस्त्यानुसार मशीदमध्ये नमाज म्हणा. आम्ही तिथे असल्याची साक्ष तुम्हाला मिळेल.’’ सर्वजण पुन्हा मशीदमध्ये नमाज पडू लागले. काही दिवसांनी एक मुसलमान पहाटे महाराजांकडे आला आणि म्हणाला, ‘‘माझ्या बायकोचा गळा सुजला आहे, तिला श्वास घेता येत नाही. कृपा करून तिला वाचवा.’’ महाराज टॉर्च घेऊन तिच्या घरी गेले. तपासल्यानंतर ते म्हणाले, ‘‘गरम पाण्याने चुळा भरा. सकाळी येऊन बरे करतो.’’ सकाळी महाराज लांब चांदीची तार घेऊन आले. त्यांच्या लक्षात आले होते की त्या बाईच्या घशात हाडाचा बारीक तुकडा अडकला आहे. त्यांनी तो तारेने काढताच ती बाई लगेच ठीक झाली. तो मुसलमान आनंदाने महाराजांच्या पाया पडला आणि म्हणू लागला, “ये तो अल्लाह है!”
एक योग्याच्या जीवनात असा प्रसंग यावा ही कल्पना करवत नाही; परंतु कलियुगात सत्तेचा दुरुपयोग आणि विकृत मनोवृत्ती सर्वत्र दिसते. नाथपंथीयांना त्रास दिला तर तो जीवाला घातक ठरतो.