नाथपंथ हा भगवान शंकर, भगवान विष्णू व भगवान दत्तात्रय यांनी स्थापन करून नाथपंथाची संपूर्ण योजना मच्छिंद्रनाथांवर सोपवली. ज्या वेळेला नाथ पंथाची स्थापना झाली त्यावेळेला पंथाची योजना अतिशय सुंदर झाली म्हणून भगवान शंकरांनी मच्छिंद्रनाथांना म्हटले की ‘‘मला पंथाच्या गुरु–शिष्य प्रणालीमध्ये कार्य करून गुरूंची सेवा करायची इच्छा आहे, म्हणून मी तुमच्या शिष्याच्या शिष्याचा दास होऊन निवृत्ती म्हणून कार्य करीन.’’ भगवान विष्णू लगेच म्हणाले की ‘‘मी ज्ञाननाथ म्हणून निवृत्तीचा दास होऊन कार्य करीन.’’ येथे एक गोष्ट लक्षात घ्यावी की ब्रह्मांड निर्मिती करणारे शंकर आणि विष्णू यांनी नाथपंथात परंपरेचे दास्यत्व स्वीकारले, यावरूनच या पंथाची महती लक्षात येते. अशा तर्हेने योजना झाल्यावर पंथ आपल्या शिस्तीने कार्य करीत होता. ज्या वेळी मच्छिंद्रनाथांनी मीननाथांना पंथातील विद्येची शिकवण द्यायचे ठरवले त्यावेळी इंद्रदेवाने कपटाने ती विद्या मिळवण्याचा प्रयत्न केला—ही पुढील कथा आहे.
एकदा चरपटीनाथांनी स्वर्गात जाऊन इंद्राचा गर्व उतरवला; पण ही गोष्ट इंद्राच्या मनात खोलवर रुजली होती. त्याने बृहस्पतीजवळ चरपटीनाथाबद्दल तक्रार करत म्हणाला, ‘‘तो वयाने लहान असला तरी तेजस्वी आहे; हरिहराच्या प्राणावर उठण्याइतकी शक्ती त्याच्यात आहे. त्याच्याकडे असलेली वाताकर्षण विद्या देव–दानवांजवळ नाही. त्यामुळे देव निर्बळ होतात. नाथपंथात ही विद्या कशी आली कळत नाही; पण ही विद्या आपल्याला मिळालीच पाहिजे, नाहीतर नाथांच्या घरी जाऊन त्यांचे दास्यत्व स्वीकारावे लागेल.’’ इंद्राचे हे बोलणे ऐकून ब्रह्मदेवाने कपटी युक्ती सुचवली. ‘‘सोमयागाचे निमित्त करून नाथांना इथे बोलावावे. ते आले की त्यांची उत्तम सेवा करावी आणि त्यांना प्रसन्न करून त्यांच्याकडून आपले इप्सित साधून घ्यावे.’’ बृहस्पतीचा हा मार्ग इंद्राला पटला; परंतु नाथांना कोण आणेल, याचा प्रश्न होता. बृहस्पती म्हणाला, ‘‘उपरिचरवसू हा मच्छिंद्रनाथांचा पिता आहे. तो नाथांना बोलावून आणेल.’’ मग इंद्राने मातलीला पाठवून उपरिचराला बोलावले व त्याला विमान देऊन नाथांना आणायला पाठवले.
उपरिचरवसू चौर्याऐंशी सिद्धांसह नवनाथांना सोमयागासाठी अमरावतीस घेऊन आला. सर्व नाथ आलेले पाहताच इंद्र नम्रपणे त्यांच्या पाया पडला. त्याने सर्वांना आदरपूर्वक घरी नेले, आसनावर बसवले आणि पूजा केली. सर्व देवताही तेथे उपस्थित होत्या. यथाविधी स्वागत करून इंद्राने सोमयज्ञाची कल्पना सांगितली. यज्ञस्थान कोणते असावे, म्हणून विचारल्यावर मच्छिंद्रनाथ आणि बृहस्पती यांनी सिंहलद्वीप योग्य असल्याचे निश्चित केले. तेथे दाट अरण्य, शीतल छाया आणि मुबलक पाणी असल्याने यज्ञासाठी उत्तम जागा मानली. इंद्राने तत्परतेने यज्ञाची तयारी केली. बृहस्पती मंत्र म्हणणार आणि नवनाथ कुंडात आहुती देणार, अशी योजना झाली. यज्ञस्थान किलोतळेच्या सीमेत होते, म्हणून मीननाथाची आठवण मच्छिंद्रनाथांना झाली आणि त्यांनी उपरिचरवसुला पाठवून मीननाथाला विद्याभ्यासात पारंगत केले.
यज्ञ सुरू झाला. बृहस्पतीने सुचविल्याप्रमाणे उपरिचरवसू यज्ञासाठी आसनावर बसला, तर इंद्र स्वतः सेवा करू लागला. जो थकत असे त्याचे पाय इंद्र चोळत असे. त्याची सेवा पाहून सर्व नाथ प्रसन्न झाले. त्या वेळी मच्छिंद्रनाथ मीननाथाला वाताकर्षण विद्या शिकवीत होते. इंद्राने मोराचे रूप घेऊन झाडावर बसून ही विद्या चोरून साध्य केली. ज्यासाठी इतका प्रयत्न चालू होता ती विद्या मिळताच तो अत्यानंदित झाला. यज्ञ एक वर्षभर चालू होता. यज्ञ सांगता झाल्यावर मच्छिंद्रनाथ अग्रपूजेला बसले. इंद्राने इतर नाथांचीही पूजा करून वस्त्रे–भूषणे दिली. नाथ कनकासनावर बसल्यावर इंद्र हात जोडून म्हणाला, ‘‘मी एक मोठा अन्याय केला. मीननाथाला विद्या शिकवत असताना ती मी चोरून शिकलो. तेव्हा आपण सर्वांनी वर देऊन ती फलद्रुप करावी.’’ त्याला वाटले की आता काही होणार नाही; पण झाले उलटे.
इंद्राचे हे बोलणे ऐकून सर्व नाथ एकदम रागावले. ते म्हणाले, ‘‘तू आम्हाला फसवून विद्या आत्मसात केलीस; ही विद्या तुला निष्फळ ठरेल.’’ हा भयंकर शाप ऐकून उपरिचरवसू आणि बृहस्पती विनवणी करू लागले की विद्या निष्फळ न ठरता फलद्रुप व्हावी. मग नाथांनी उःशाप दिला की ‘‘इंद्राने बारा वर्षे तपश्चर्या करावी आणि नाथपंथाचा अजिबात छळ करू नये; असे केले तरच ही विद्या फलद्रुप होईल.’’ सर्व नाथ आपल्या स्थानी परत गेले. इंद्राने सह्याद्री पर्वतावर बारा वर्षे तपश्चर्या केली. मंत्राच्या वेळी जे पाणी सोडत असे त्याचा प्रवाह बनून भीमरथीस जाऊन मिळाला, जो ‘इंद्रायणी’ नावाने प्रसिद्ध झाला. तपश्चर्या पूर्ण झाल्यावर इंद्र अमरावतीस परत गेला. अशा प्रकारे चोरून विद्या शिकण्याचा इंद्राचा प्रयत्न नाथांनी हाणून पाडला आणि देवांचा राजा असणाऱ्या इंद्रालाही शिक्षा दिली. नाथांनी इंद्राला ताकीद दिली की ‘‘नाथपंथाच्या मार्गात विघ्न आणू नकोस आणि सदैव पंथकार्याला सहकार्य कर.’’
नाथपंथाची जी विशेष घडण ब्रह्मांड निर्मात्यांनी केली त्यामुळे हा पंथ सर्व पंथांना गुरुस्थानी आहे. नाथपंथ आजही त्याच पद्धतीने कार्य करीत आहे व पंथाचे उद्देशही तेच आहेत. नाथपंथ हा विश्वकल्याणासाठी आणि मानवाच्या उद्धारासाठी आहे.