ज्ञानेश्वर महाराज रेडयाने वेद म्हंटले

ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनातील प्रसंग ज्या वेळेला भगवान श्रीकृष्णांनी नाथपंथाची योजना केली त्यावेळेस नारायणाचे नऊ पार्षद यांनी नवनाथ म्हणून कार्य करावे असे ठरले होते.

नाथपंथाची रचना, त्याचे उद्देश, गुरु शिष्य प्रणालीची शिष्य परंपरा, कलियुगाच्या विपरीत आणि भयंकर परिणामांना सौम्य करण्याच्या दृष्टीने स्थापन झालेला नाथपंथ हे लक्षात घेऊन भगवान शंकरांना आणि भगवान विष्णूला नाथ पंथांमध्ये अवतार घेऊन गुरूंची सेवा करावी आणि पंथ कार्यात सक्रिय भाग घ्यावा अशी तीव्र इच्छा निर्माण झाली.

या उद्देशाने भगवान शंकर म्हणाले होते की या पंथांमध्ये मी निवृत्तीनाथ म्हणून अवतार धारण करीन आणि भगवान विष्णू म्हणाले होते की मी ज्ञाननाथ म्हणून अवतार धारण करेन, गुरुंची सेवा करू आणि पंथ कार्य करू, असे ते दोघे म्हणाले.

या नाथ पंथाच्या योजनेनुसार ज्ञाननाथ म्हणजे साक्षात विष्णूचा अवतार होता. ज्यांनी नाथपंथाची योजना केली, जे उत्पत्तीपासून लयापर्यंत ब्रह्मांडामध्ये कार्य करणारे आहेत असे भगवान विष्णू होते.

महाराष्ट्रातील नामवंत संत— ज्यांनी फार मोठा इतिहास रचला आहे आणि नाथपंथाला ज्यांनी हठयोगाकडून वळवून विशेषेकरून भक्तिमार्गाची दिशा दिली ते म्हणजे श्री ज्ञानेश्वर महाराज होत. त्या काळच्या ब्रह्मवृंदांनी संन्यासाची पोरे म्हणून त्यांना समाजबाह्य केले होते. त्या काळात ब्राह्मण हे भूदेव म्हणून मानले जायचे.

ज्ञानवंत ब्राह्मणांकडून शुद्धिपत्रक प्राप्त करण्याच्या उद्देशाने निवृत्तीनाथ, ज्ञाननाथ आदी भावंडे भ्रमण करीत असताना पैठणला काही विद्वानांनी त्यांची कुचेष्टा करण्याच्या हेतूने रस्त्यावरून जाणाऱ्या एका माणसाला थांबविले. त्याच्या हाती एक रेडा होता.

ह्या रेड्याचे नाव काय,” असे त्या माणसाला विचारले. तो उत्तरला, “ज्ञानदेव.”

रेडा ज्ञानदेव आणि हा मुलगा देखील ज्ञानदेव. दोघेही एकच. मग रेड्याला मारले तर ज्ञानदेवाला लागायला पाहिजे, म्हणून ह्या विद्वानांनी सोट्याने त्या रेड्याला मारले, तेव्हा त्याचे व्रण ज्ञानदेवांच्या पाठीवर उमटले.

ज्ञानदेवांचे सामर्थ्य मान्य करण्याऐवजी ह्यांना कोणती तरी विद्या येत असेल असे समजून ते विद्वान म्हणाले, “तू ब्राह्मण आहेस, तुला वेद म्हणता येतात का?”

हो” म्हटल्यावर त्यांनी सांगितले की, “हा रेडाही ज्ञानदेव आहे. तुझा आणि ह्याचा आत्मा सारखाच आहे. मग ह्याच्या मुखातून वेद म्हणून दाखव बरं.”

ज्ञानदेवांनी त्या रेड्याला आपल्या जवळ बोलावून त्याला त्याच्या गत सात जन्मांची आठवण करून दिली व म्हणाले, “मागील जन्मी तू ब्राह्मण होतास. वैदिक होतास. तू नेहमी ऋग्वेद म्हणत असायचा. हे तुला आठवतं का?”

रेड्याने ‘हो’ म्हटल्यावर ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, “मग ह्या विद्वान लोकांना तुझ्या मुखातून वेद ऐकायचे आहेत, ते तू ह्यांना ऐकव.”

असे म्हणताच तो रेडा वेद म्हणू लागला. जसे वैदिक ब्राह्मण वेद म्हणतात अगदी तसेच वेद त्याने म्हटले. पशूला वाचा नसते, परंतु ज्ञानेश्वरांच्या प्रभावामुळे रेड्याने देखील माणसासारखे उच्चार करून वेद म्हणून दाखवले.

हे कथानक सर्वश्रुत आहे.

याही कथानकावरून हे स्पष्ट होत आहे की एक पशुजीव जो रेडा म्हणून जीवन जगत होता त्याच्या जीवाच्या जीवनाचा पूर्वेतिहास श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या लक्षात आला आणि ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्या मुखातून वेद म्हणवून घेतले. हे केवळ ज्ञानेश्वर महाराजच करू शकले.

रेड्याच्या जीवाचे पूर्वसंचित प्रारब्ध हे ज्ञाननाथांना माहित होते. ते सद्गुरू होते आणि अवतारी पुरुष होते. विष्णूचा अवतार होता.

त्यामुळे त्यांनी त्या जीवाच्या पूर्वसंचिताचा विचार करून ज्ञाननाथांनी त्या रेड्याला जमिनीवर सात रेघा काढून त्या ओलांडायला सांगितल्या. प्रत्येक रेघ ही त्याच्या प्रत्येक जन्माचे प्रतीक होते.

गेल्या सात जन्मांचा त्या जीवाचा प्रवास दाखवण्यासाठी ज्ञाननाथांनी या सात रेघा काढल्या होत्या. म्हणून या सातही रेघा ओलांडायला त्या रेड्याला सांगितले होते. प्रत्येक रेघ म्हणजे गेलेला जन्म या अर्थाने त्यांनी त्या रेघा काढल्या होत्या.

प्रत्येक रेघ ओलांडताना त्या जन्मात तो कोण होता हे रेडा सांगत होता. शेवटची रेघ ओलांडल्यावर ज्ञाननाथ म्हणाले, तू या जन्मी रेडा आहेस, परंतु मागल्या जन्मी तू वैदिक ब्राह्मण होता, वेद म्हणत होता, हे तुला आठवते का?

त्यावेळी त्याने हो म्हटले आणि ज्ञानेश्वरांनी त्या रेड्याला आज्ञा केली की तू आता वेद म्हणून दाखव.

बाह्य शरीर हे कोणत्याही जीव योनीचे असो, परंतु अंतरात्म्यावर जीवनातील सर्व घटनांचे लेखन असते.

मच्छिंद्रनाथांनी आरंभिलेल्या नाथपंथातील ज्ञाननाथ हा एक दुवा आहे. श्री ज्ञानेश्वर महाराजांचे हे चरित्र सर्वांनाच माहीत आहे.

म्हणजेच माणसाच्याच काय, पण प्रत्येक जीवाचा जीवनप्रवास हा अखंड असतो. जीव म्हणजे आत्मा. ज्या वेळी जीवाची गर्भस्थापना होते त्या वेळी हा बीजरूपी पिंड म्हणून प्रस्थापित होतो. जीव कोणत्या देहाचा आहे याचा पिंडावर काहीच परिणाम होत नाही.

जीवनात घडणाऱ्या घटनांवरून, त्या जीवाच्या त्या जीवनातील कर्मदोषामुळे जीवाचा जीवनप्रवास कसा बदलतो, त्या जीवाच्या पूर्वसंचिताचा त्याच्या जीवनावर कसा आणि काय प्रभाव पडतो, तसेच जीवनात घडणाऱ्या घटनांवरून कर्मदोष कसे समजू शकतात, हे रेड्याच्या निरनिराळ्या योनीतील जीवनावरून ज्ञानेश्वरांनी दाखवून दिले.

तसेच वाल्याच्या जीवनातील स्थित्यंतर नारद मुनींनी दाखवून दिले आणि गुरुचरित्रातील रजकाचे जीवन जाऊन तो म्लेच्छांचा राजा कसा झाला हे भगवान दत्तात्रेयांनी दाखवून दिले.

हे कर्मदोष माणसाला समजू शकणार नाहीत, परंतु रेड्याचे निरनिराळ्या योनीतील जीवन हे त्याच्या कर्मदोषामुळे घडले एवढे समजू शकेल.

धरपकड आणि मार या वाल्याच्या गुणांवरून नारद मुनींनी त्याचे कर्मदोष लक्षात घेऊन त्याला वाल्याचा वाल्मीकि ऋषी केला, हे समजू शकेल.

रजकाच्या मनातली मनोकामना त्याला साध्य करून देण्यासाठी भगवान दत्तात्रेयांनी त्याचे भाग्य बदलून त्याला म्लेच्छांच्या राज्यात राजा केला.

या सर्व उदाहरणावरून हे लक्षात घेणे आवश्यक आहे की स्वर्गोपभोग हा जीवनाचा उद्देश नसून ती कर्माची फळे आहेत. त्यात गुंतून राहण्याने आपण कर्मसंचिताचा ऱ्हास करून आपली पुढील जीवनातील उन्नती कमी करीत असतो.

गुरुशिवाय जीवाचा उद्धार नाही. आत्मा उन्नत होणार नाही. म्हणून प्रत्येक जन्मामध्ये आपण सत्कर्म करीत राहावे, गुरूंच्या सेवेत राहून त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे आपला जीवनक्रम ठेवावा.

जीवाच्या जीवनाचा उद्धार करणे, आत्मोन्नती करणे हाच प्रत्येकाच्या जीवनाचा मूळ हेतू ब्रह्मांड निर्मात्याने ठेवला आहे. हे समजून घेण्याचा प्रयत्न करावा.