निवृत्तीनाथ व गहिनिनाथांची भेट वाघाने घातली

निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान व मुक्ताई ही सर्व भावंडे एकदा त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी गेली होती. ते ब्रह्मगिरी पर्वतावरून भ्रमण करीत असताना दूर समोरून एक वाघ चवताळलेला, डरकाळ्या फोडीत ह्यांच्याच दिशेने येत होता.

घाबरून हे सर्व इतस्ततः पळू लागली. जसजसा तो वाघ जवळ आला, तसतशी ही सर्व भांवंडे पांगली. वाघ मागे व निवृत्ती पुढे असे ते जीवाच्या आकांताने धावत होते. मधेच एका ठिकाणी निवृत्ती थकून थांबला, तोच तो वाघ त्यांच्यासमोर आला, निवृत्तीला न्याहाळले व निमूटपणे त्याच्यासमोर बसला आणि आपला जबडा त्याच्या पायावर ठेवला, जणू त्याने त्यांना वंदनच केले.

हे पाहून निवृत्तीला देखील जाणवले की हा आपल्याला खायला आला नसून तो आपला मार्गदर्शक आहे. तेवढ्यात त्यांच्या कानावर एक सुमधूर नाद येऊ लागला. ह्या नादाने त्या दोघांचेही चित्त तिकडेच वेधले गेले व नकळत ते दोघेही त्या नादाच्या दिशेने जाऊ लागले. वाघ पुढे व निवृत्ती मागे असे ते चालू लागले.

होता होता तो वाघ एका गुहेच्या दाराशी थांबला. जणू तो निवृत्तीला खुणावून सांगत होता की तो नाद येथूनच येत आहे. निवृत्ती तेथे पोहोचताच त्या वाघाने पुन्हा आपला जबडा निवृत्तीच्या पायावर ठेवला, जणू तो निवृत्तीला नमस्कारच करीत होता.

निवृत्ती म्हणजे कुलकर्णी कुटुंबातील एक व्यक्ती हेच आपले ज्ञान. परंतु ज्या वाघाने निवृत्तीला तेथे नेले त्याला हे माहित होते की हा शंकराचा अवतार आहे. म्हणून त्याने निवृत्तीनाथांना नमस्कार केला. निवृत्तीने देखील प्रेमाने त्याच्या डोक्यावर हात ठेवला. त्या वाघाने लगेचच समोरच्या दरीत उडी मारली. त्याचवेळी आकाशातून आवाज झाला — अलख निरंजन. गोरक्षनाथ वाघाच्या स्वरूपात आले होते.

गुहेचे दार आपोआप उघडले गेले. ही सर्व घटना आपल्याला स्तिमीत करून जाते. अनेक प्रश्न आपल्याला पडतात. परंतु त्या जंगली वाघाला कां पडले नाहीत याचा विचार करणे आवश्यक आहे.

गुहेत जाताच गुहेचे दार आतून आपोआप बंद झाले. निवृत्तीला अंधुक अंधुक दिसू लागले. दूर एक चौथरा होता. त्यावर एक भव्य दिव्य, जटाधारी योगी बसलेला होता. त्याच्या दोन्ही बाजूला समया तेवत होत्या व एक निनाद, मधूर आवाज येत होता — ॐ श्री दत्तात्रेयाय नमः.

त्या योग्याने विचारले: “बाळ, तुझे नाव काय आहे?”

निवृत्ती म्हणताच त्यांना अतिशय आनंद झाला. योगी म्हणाले:

“माझे गुरू चैतन्य श्री गोरक्षनाथ सांगून गेले की, पुढे एके दिवशी *निवृत्ती* नावाचा मुलगा तुझ्यासमोर येईल. तो आला की तुझे हे सर्व ज्ञान त्याला दे. तो येत नाही तोपर्यंत तू येथेच बसला राहा. तो आल्यानंतर त्याला सर्वस्व दे आणि नंतरच समाधी घे. माझ्या गुरूंची आज्ञा म्हणून मी तुझी वाट पाहत येथेच बसलो आहे. तू आला आहेस, आता मी समाधी घेऊ शकतो, याचा मला खूप आनंद होत आहे.”

गहिनीनाथांची ही केवढी कठीण परीक्षा व तपःश्चर्या! सत्य, त्रेता व द्वापार युगापासून खूप दूर असलेल्या कलियुगात, त्यांनी केवळ गुरू आज्ञा व परमगुरू मच्छिंद्रनाथांच्या योजनेप्रमाणे निवृत्तीनाथांच्या भेटीची वाट पाहत ध्यानस्थ बसून राहिले.

नाथपंथाचे सर्व महात्म्य, सामर्थ्य, कार्यपद्धती व कार्यसिद्धता — ही सर्व गृहस्थाश्रम्याकडे सोपवायची जबाबदारी गहिनीनाथांवर होती.

निवृत्ती जवळजवळ आठ दिवस गहिनीनाथांच्या सहवासात राहिला. त्या योग्याने निवृत्तीला पंथाची दीक्षा देऊन निवृत्तीनाथ केले. आपल्या गुरूकडून मिळालेले सर्व ज्ञान, सर्व योगसामर्थ्य, पंथाची सर्व सिद्धता, देवादिकांच्या वचनांसह सर्व अस्त्र, शस्त्र, वल्कल — सर्वकाही देऊन टाकले.

निवृत्तीनाथांना तपश्चर्येस बसावे लागले नाही; पंथाची सर्व सिद्धता पूर्वनियोजितप्रमाणे त्यांना देण्यात आली. पंथ पुढे चालवण्याची व वाढविण्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली.

गुरू गहिनीनाथ समाधीधारण करण्यास तयार झाले. ज्या आसनावर ते बसले होते, त्याच आसनातून ते हवेत उंच उडू लागले व उडत उडत गुहेच्या बाहेर आले. निवृत्तीनाथ हे दृश्य पाहत राहिले.

गुहेच्या बाहेर हवेत नाचत, तेजस्वी रूपात, गहिनीनाथ अलख निरंजन – जय गोरक्षनाथ म्हणत अंतराळात विलीन झाले.

अशा प्रकारे गहिनीनाथांनी नाथपंथाची पूर्ण सिद्धता निवृत्तीनाथांकडे सोपवली. स्वामी मच्छिंद्रनाथांची हीच योजना होती — पंथाची अखंड परंपरा गृहस्थ जन्मातून पुढे नेणे.

नाथपंथाचा पुढील अध्याय अशा रीतीने सुरू झाला — हठयोगातून भक्तिभावाकडे, अवतारातून गृहस्थयोगीकडे, परंपरा अविचल राहून.

पंथाचा पुढील विकास

निवृत्तीनाथ म्हणजेच अवतार घेतलेले भगवान शंकर. नाथपंथाची पुढील वाटचाल पुन्हा त्यांच्या हाती आली.

नऊ नारायणांचा — म्हणजेच नऊ योगेश्वरांचा — हठयोगाचा पर्व संपले. गुरूपरंपरेने पंथाचीच सिद्धता पुढे नेण्याची जबाबदारी निवृत्तीनाथांवर आली.

पंथाचा मुख्य बदल:

हा बदल आदिनाथांनी — म्हणजेच स्वतः शंकराने — केला. म्हणूनच पंथाची परंपरा आजही तितकीच जिवंत, सामर्थ्यवान आणि कार्यक्षम आहे.