साधारणत: आपली अशी समजूत आहे की जे मानवाला शक्य नाही ते देवाला सहज शक्य आहे. योगी हे देखील या भूतलावरचे मानव आहेत. जन्मतः यांना योगिक क्रिया साध्य झालेल्या नसतात. त्यांना प्रयत्नांनी आणि सततच्या अभ्यासाने त्या साध्य कराव्या लागतात. साध्य झाल्या की आपण त्यांना सामान्य माणूस समजत नाही. योगी म्हणूनच वावरतात.
याचाच अर्थ सामान्य माणूस हा प्रयत्नांनी असामान्य होऊ शकतो. ज्या वेळेला आपण शिक्षकाकडून एखादी विद्या शिकतो आणि त्यानंतरच आपण त्यात पारंगत होतो, त्याच प्रमाणे आपण जर सद्गुरू जवळ राहून त्यांची सेवा करून, त्यांच्याकडून ज्ञान घेऊन, त्यांची कृपा संपादन केली तर आपण देखील असामान्य माणूस होऊ शकतो.
व्यंकटनाथ महाराज दहा–बारा वर्षाचे असतील. त्यांचे शिक्षण सातव्या इयत्तेचे झालेलं होतं. त्या वयात माधवनाथ महाराजांनी त्यांना सर्वांपासून दूर लोटून, सर्व पाशांपासून मुक्त करून ते हिमालयात पोहोचले होते. माधवनाथांच्या योजनेनुसार व्यंकटनाथ महाराजांना हिमालयात निरनिराळे साधू भेटत गेले आणि त्यांनी त्या दहा वर्षाच्या मुलाला निरनिराळ्या विद्यांमध्ये प्रवीण केले.
याच कालावधीत त्यांनी योगसाधना केली आणि ते योगविद्येत पारंगत झाले. योगाभ्यानंद ही पदवी त्यांना प्राप्त झाली. निरनिराळ्या योगिक क्रिया करून माणूस अचंबित होईल असे ते पारंगत झाले. योगिक विद्या ही सहजासहजी प्राप्त होऊ शकत नाही.
व्यंकटनाथ महाराज पंथकार्याला लागल्यावर त्यांचं वय अवघं बत्तीस वर्षांचं होतं. ते 32 वर्षांचे असताना माधवनाथांनी समाधी घेतली आणि गुरुकार्याचा भाग, नाथपंथाच्या कार्याचा भार त्यांच्यावर सोपवला. हे सर्व करण्यापूर्वी माधवनाथांनी व्यंकटनाथांना सर्व विद्यांमध्ये प्रवीण केले. त्यांच्या चित्तवृत्ती–प्रवृत्ती या कार्याला योग्य अशा करून घेतल्या.
त्यांच्या अनेक प्रकारच्या परीक्षा घेऊन, अनेक कठीण परीक्षा पार पाडून त्यांना नाथपरंपरेतले सिद्धनाथ केले. त्यांच्या परीक्षेचा एक प्रसंग सांगतो:
ज्या पाटावर आपण बसतो त्या पाटाला खालून अनेक खिळे ठोकले, आणि जिथे बसतो तिथे खिळ्यांचे टोक साधारण 2 इंच वर येतील असे पाट भरून खिळे ठोकले. त्या खिळ्यांच्या आसनावर व्यंकटनाथ महाराजांना पद्मासन घालून बराच वेळ बसण्यास सांगितले. त्याप्रमाणे ते त्या पाटावर प्रदीर्घ काळ पद्मासन घालून स्थिर आणि शांत मनाने समाधी लावून बसले.
इतिहासातील एक उदाहरण म्हणजे मच्छिंद्रनाथांनी एक लांब सुळा जमिनीत रोवला — जवळजवळ दहा–बारा फूट उंच — आणि त्या सूळ्याच्या बारीक टोकावर गोरक्षनाथांना पद्मासन घालून बसण्यास सांगितले. गोरक्षनाथ त्या सुळ्यावर पद्मासन घालून काही दिवस बसले. हे काल्पनिक नसून प्रत्यक्ष घडलेलं आहे.
आजच्या काळात पाटाला सर्वत्र खिळे ठोकून त्या खिळ्यांच्या टोकावर पद्मासन घालून बसणे ही त्या सारखंच परीक्षा होती. अशा अनेक तऱ्हेने व्यंकटनाथांची परीक्षा घेऊन त्यांना नाथपंथ कार्यास सिद्ध केले होते.
1936 साली माधवनाथांनी समाधी घेतली आणि व्यंकटनाथ महाराजांना गादीवर बसून कार्याची आज्ञा केली. त्यावेळी त्यांचे वय अवघे 32 वर्षांचे होते. व्यंकटनाथ महाराजांचा विवाहसुद्धा स्वतः माधवनाथांनी ठरवून लावून दिला होता. त्या काळात मुलीची पसंती मुलगा करीत नसे. वडीलधारी लोकच निर्णय घेत. मुलगा आणि मुलगी एकमेकांना अंतरपाठ काढल्यावरच पाहत असत.
माधवनाथांच्या सांगण्यावरून व्यंकटनाथ महाराजांनी त्यांच्या समाधीनंतर कार्याला सुरुवात केली.
व्यंकटनाथांचा मुलगा, बाबा उर्फ मंगलनाथ, हा बारा वर्षाचा असेल. त्यावेळी व्यंकटनाथ महाराज कार्यानिमित्त निरनिराळ्या गावाला जात असत. एकदा ते नागपूरच्या प्रवासाला रेल्वेने निघाले. रेल्वे स्टेशन लासूर होतं—देवगाव रंगारीपासून अंदाजे पाच किलोमीटर दूर.
तेथे जाऊन गाडी पकडावी लागे. ट्रेनने नांदगावला जाऊन, तेथून दुसऱ्या ट्रेनने नागपूरला जायचे. त्या काळात लासूरला एक ट्रेन गेली की दुसऱ्या दिवशीच येत असे. ट्रेन एक मिनिटच थांबत असे. देवगाव–लासूर रस्ता पायी किंवा बैलगाडीनेच जायचा.
1958 साली देखील नरेंद्रला लासूर ते देवगाव सामानासह पायीच जावे लागले होते.
एकदा व्यंकटनाथ महाराज नागपूरला जात होते. ते आपल्या पद्धतीनुसार स्वतःचा होल्डॉल हातात, सामानाची बॅग हातात घेऊन चालत होते. मुलगा बाबाही सोबत होता.
ते दोघे स्टेशनवर पोहोचले. पलीकडच्या प्लॅटफॉर्मवर जाणा-या गाडीची वाट पाहत, ते जिना चढून उतरत होते. स्टेशनवर पोहोचायला थोडा उशीर झाला. गाडी येऊन उभीच होती. हे प्लॅटफॉर्मवर पोहोचेपर्यंत गाडी सुटत होती आणि वेगही धरत होती.
व्यंकटनाथ महाराज सामान आणि मुलाला घेऊन धावत गाडी पकडण्यासाठी निघाले. प्लॅटफॉर्मचा शेवट आला तरी गाडी थांबली नव्हती—पूर्ण वेगात होती.
आता काय करावे हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला.
ही गाडी चुकली की कार्यक्रम मोडेल—अनेकांची नाराजी होईल. गाडी पकडलीच पाहिजे — हा त्यांचा निर्णय पक्का झाला.
सामान्य माणसाला ही गाडी पकडणे अशक्य होते.
अशा वेळी त्यांनी मोठ्याने म्हटले:
“संभालो! मै बाबा को फेंक रहा हूँ!”
असे म्हणून मुलाला गरगर फिरवले आणि फेकले. त्याचप्रमाणे सामानही फेकले.
आणि काय आश्चर्य —
ज्या फर्स्ट-क्लासच्या डब्यात त्यांना जायचे होते, त्याच डब्यात उघड्या दारात उभ्या असलेल्या व्यक्तीने मुलाला आणि सामानाला हवेतच झेलले!
काही क्षणांत व्यंकटनाथ महाराज स्वतःही उडी मारून गाडीत बसले.
हे केवळ काल्पनिक किंवा अलौकिक वाटेल, पण या योगीने हे वस्तुतः केले होते.
असा योगाभ्यास, असे योगी संपर्कात येणे, त्यांचे दर्शन, चरणस्पर्श—हे नशीब, पूर्वसंचित व गुरुकृपेनेच संभव.
महाराजांच्या योगक्रियेवर विश्वास बसणार नाही असे अनेक म्हणतील. परंतु ज्यांना त्यांचे दर्शन लाभले, सेवा करण्याचे भाग्य मिळाले, सान्निध्य मिळाले, अनुग्रह मिळाला—ते सर्वच लोक केवळ भाग्यवान.
त्यांच्या बरोबर प्रदीर्घकाळ राहून अध्यात्माचे धडे, पंथकार्याची शिकवण, कठीण प्रसंगांना तोंड देण्याचे धैर्य, भक्तिभाव वाढवण्याचे कौशल्य, कर्मसिद्धांत सांगण्याची कला, नाथपंथाचे महात्म्य—हे सर्व शिकण्याचा योग फक्त त्यांच्या इच्छेने आणि कृपेनेच मिळत असे.
त्यांनी ज्या उंचीवर कार्य सोडले होते, त्यापेक्षा खूप उंचीवर कार्य नेण्याचे भाग्य त्यांनी मला दिले—हे त्यांचे जन्मोजन्मीचे ऋण आहे असे मला वाटते.