व्यंकटनाथांनी एकाच जीवाला दोन भिन्न ठिकाणी उभे केले. वाटेल तेंव्हा, वाटेल तिथे, वाटेल ते रूप ते धारण करून उभे राहाणे हे भगवान दत्तात्रेय यांचे वैशिष्ट्य आहे. देह धारण करायचा म्हणजे पाच तत्वांचा देह निर्माण करायचा. हाडामासांचा, इंद्रियांचा, मन, बुद्धी सर्व शरीर—जे मातेच्या उदरातून जन्म घ्यायला नऊ महिने लावते—तो देह पाहिजे तेंव्हा, पाहिजे त्या क्षणाला, पाहिजे तिथे भगवान दत्तात्रेय निर्माण करू शकतात. तसेच तो देह ते पंचतत्वात तात्काळ विलीन करू शकतात.
मानवी देह धारण करायला निसर्गाची प्रक्रिया आणि वेळ मर्यादा आहे. त्याच प्रमाणे देहत्याग केल्यावर त्या देहाची विल्हेवाट लावण्यासाठी वेगळी प्रक्रिया आहे. दोन्ही प्रक्रियेत देहाच्या अस्तित्वाची साक्ष असते. परंतु भगवान दत्तात्रेय ज्यावेळी रूप धारण करतात त्यावेळेला रूप धारण करण्याचे कोणते चिन्ह दिसत नाही. त्याच प्रमाणे ज्या वेळेला ते आपला देह, आपले रूप पंचतत्वात विलीन करतात त्यावेळेलाही देहाच्या अस्तित्वाची कोणतीही खूण दिसत नाही. जसे मृत्यूनंतर अग्निसंस्कार केल्यावर अस्थी शिल्लक असतात. हीच परंपरा नाथ पंथामध्ये दिसून येते.
गोरक्षनाथांनी लहानपणी खेळता खेळता मातीचा पुतळा निर्माण केला आणि मनातून त्यांची शं मंत्रसाधना सुरू होती. परिणामतः त्या मातीच्या पुतळ्यातून करभंजन नारायणाने म्हणजे गहिनीनाथांनी अवतार धारण केला. मातीचा पुतळा सजीव झाला आणि तो आपले जीवनकार्य करू लागला. मानवी जन्मासाठी लागणारी कोणतीही नैसर्गिक प्रक्रिया नाही, गर्भधारणा नाही, की मानवी जन्मासाठी लागणाऱ्या मातेच्या उदराची गरज नाही. केवळ पंचतत्त्वाचे शरीर स्वेच्छेने धारण केले. हेच नाथपंथाचे वैशिष्ट्य आहे.
—
डॉक्टर रमेश कस्तुरे हे जळगाव जामोद तालुक्यातील पातुर्डा गावाला वैद्यकीय व्यवसाय करीत होते. पुढे ते पातुर्ड्याच्या रामचंद्र महाराजांच्या सेवेत राहिले आणि नंतर रामचंद्र महाराजांचे ते उत्तराधिकारी होऊन, त्यांच्याच गादीवर बसून त्यांनी त्यांचे गुरुकार्य केले.
डॉ. कस्तुरे म्हणाले, पातुर्ड्याला एक दिवस मी दवाखाना संपवून घरी गेलो तर घरी कळले की साधारणतः दोन-तीन तासापूर्वी देवगाव रंगारीचे व्यंकटनाथ महाराज घरी आले, त्यांनी आंघोळ केली, आन्हिक केले, जेवण केले आणि नुकतेच ते छकड्यात (छोट्या बैलगाडीत) बसून देवगावला जाण्यासाठी फाट्यावर गेले. डॉ. कस्तुरे त्यांचा मागोवा घेत फाट्यापर्यंत गेले. गावातल्या निरनिराळ्या लोकांनी महाराज नुकतेच येथून गेल्याचे सांगितले, पण कस्तुरे यांची आणि व्यंकटनाथ महाराजांची भेट झाली नाही.
ते आपल्या घरी येऊन गेले, आपली त्यांची भेट झाली नाही म्हणून कस्तुरे बसने देवगाव रंगारीला गेले. तेथे त्यांना कळाले की, महाराज १५ दिवसांपूर्वीच पुण्याला गेले आहेत आणि ते तेथेच आहेत. तेथून ते अजून आलेच नाहीत. त्यांची निराशा झाली आणि विस्मयही तेवढाच वाटला. महाराज आपल्या घरी येऊन गेले, स्नान, पूजा, जेवण करून गेले आणि लोकांना सांगितले की आम्ही देवगावला जातो; पण देवगावला ते गेलेच नाहीत.
खिन्न मनाने ते पातुर्ड्याला परत आले.
—
पुढे काही कालांतरानंतर डॉ. रमेश कस्तुरे काही जणांबरोबर शिर्डीला जाण्यासाठी बसने निघाले होते. त्यांची बस एका खेड्यात फेल झाली आणि तीन-चार तास तरी ही बस येथून जाणार नाही असे त्यांना सांगितले. कोणते खेडे आहे म्हणून पाहतात तर ते देवगाव रंगारी होते. देवगाव रंगारी म्हणताच व्यंकटनाथ महाराजांची त्यांना आठवण झाली, कारण ते त्यांचे राहते ठिकाण होते. आता निदान आपली जेवायची तरी सोय झाली म्हणून ते महाराजांच्या घरी गेले.
घराचे दार लोटलेले होते. दार ढकलताच आतून महाराज म्हणाले, “ये बाळ, डॉ. कस्तुरे. आलास का तू?” त्यांना आश्चर्य वाटले. ते म्हणाले, पूर्ण दार उघडून मी आत गेलोही नव्हतो तोच यांनी मला नावानिशी ओळखले आणि “ये” म्हणाले.
महाराजांनी विचारले, “बाळ, तू कुठून आलास?” ते म्हणाले, “मी अकोल्यावरून आलो.”
“अकोल्यावरून आलास? मग चौधरीचं कसं काय आहे?”
व्यवसायाने कस्तुरे हे डॉक्टर होते. “चौधरी” म्हणताच त्यांना अकोल्याचे डॉ. काकासाहेब चौधरी आठवले. आश्चर्याने त्यांनी म्हटले, “डॉ. काकासाहेब चौधरी येथे येतात काय?” त्यावर महाराज म्हणाले, “नाही रे बाळ, चौधरी.”
यांच्या काही लक्षात येईना, म्हणून महाराजांना विचारले, “कोणते चौधरी?” त्यावर महाराजांनी आपला उजवा हात उजव्या बाजूला सारला आणि म्हणाले, “अरे हा.”
महाराजांच्या उजव्या हाताला कोणीच बसलेले नव्हते; परंतु “अरे हा” असे म्हणता क्षणीच डॉ. कस्तुरेंना तेथे मीच बसलेलो असल्याचे दिसले.
ते उद्गारले, “बापूसाहेब चौधरी! यांना तर मी लहानपणापासून ओळखतो.”
त्यानंतर महाराजांनी त्यांना अर्धा मिनिट फक्त बोलण्यात गुंगवून ठेवले. तेवढ्यात त्यांनी ओळखलेला तो “चौधरी”—म्हणजे मी—खोलीतून बाहेर निघून गेलो. त्या चौधरीला गाठण्यासाठी डॉ. कस्तुरे वेगानेच खोलीच्या बाहेर पडले, पण घरभर हिंडूनदेखील त्यांना तो चौधरी दिसलाच नाही.
त्या वेळी मी अकोल्याला माझ्या घरी होतो, आणि त्याच वेळेला मला महाराजांनी डॉ. कस्तुरेंच्या समोर साक्षात उभे केले.
पुन्हा महाराजांजवळ येऊन त्यांनी लहानपणापासूनची असलेली ओळख सांगितली आणि महाराजांकडून माझ्या घरचा पत्ता घेऊन ते अकोल्याला मला भेटण्यासाठी घरी आले होते.
—
विज्ञान, योगसामर्थ्य आणि अध्यात्म हे सर्व सहज साध्य असू शकते, हे डॉ. कस्तुरेंनी प्रत्यक्ष अनुभवले होते. पंचतत्त्वावरच्या प्रभुत्त्वाने महाराजांनी मला साक्षात सजीव उभे केले, हे केवळ नाथपंथीच करू शकतात. नाथ परंपरेची उज्ज्वल परंपरा राखीत व्यंकटनाथ महाराजांचे कार्य कसे चालले आहे हे कस्तुरेंनी वर्णन करून सांगितले.
स्वतःच्या शरीरावर तर ताबा होताच; परंतु जे शरीर आपले नाही, आणि जे कुठेतरी सजीव वावरते आहे, ते शरीर व्यंकटनाथ महाराजांनी सहजतेने सर्वांसमोर उभे केले आणि काम होताच ते सहजतेने पंचतत्वात विलीन केले. जी ओळख फोटो दाखवूनही होऊ शकली असती, ती केवळ सद्गुरूंच्या इच्छेने आणि सहजतेने त्यांनी अशा प्रकारे दिली आणि सद्गुरूंचा महिमा दाखविला.
कथानकाच्या पहिल्या भागात व्यंकटनाथ महाराज, कस्तुरे यांच्या घरी आले, तिथे स्नान, पूजा, भोजन करून ते निघून गेले. याच वेळेला ते पुण्याला मोहगावकर यांच्या घरी होते. तेथेही प्रत्यक्षात हाच प्रकार झाला—स्वतःचा देह दोन ठिकाणी वावरताना दाखवला. त्याच प्रमाणे माझा देह अकोल्याला आणि देवगाव रंगारीला असल्याचे दाखवले.
यातून नाथपंथ परंपरेच आणि भगवान दत्तात्रेयांच्या गुणवैशिष्ट्यांचे दर्शन होतं. ही घटना याच काळातली आहे. अशा सद्गुरूंची अखंड परंपरा आजही सुरू आहे.
अध्यात्मिक जीवनातील भेटीगाठी या योगायोगानेच होतात. अशा योगेश्वरानंदांचा किंवा त्यांच्या अखंड परंपरेचा योग सहजतेने कसा येईल? शुद्ध अंतःकरण आणि प्रांजळ मन ठेवलं तर या गोष्टींची अनुभूती येऊ शकेल.