गुरुचरित्राच्या दुसऱ्या अध्यायामध्ये म्हटले आहे की — “ईश्वरू होय जरी कोपिता गुरु रक्षील परिएसा। परी गुरु कोपेल एखाद्यासी कोणी न रक्षे तयासी।”
याचा अर्थ — सद्गुरू केल्यानंतर *ब्रह्मा–विष्णू–महेश* कोणीही देव रागावला, तरी त्याचा कोप गुरु दूर करू शकतात. परंतु गुरू कोपले तर *कोणीही* शिष्याचे रक्षण करू शकत नाही. सद्गुरूंनी शिष्याला दिलेले हे किती महान अभय आहे!
देवाशी दुर्वर्तन झाले, चूक झाली, नैष्ठिक मार्ग ढळला — तरी सद्गुरू त्या विपरीत परिणामातून शिष्याला बाहेर काढू शकतात… परंतु यासाठी शिष्याने गुरूजवळ पूर्ण शरणागती पत्करणे आवश्यक आहे.
याचाच अर्थ — गुरू शिष्याच्या प्रारब्धातले योग बदलू शकतात, जीवन सुकर करू शकतात.
ब्रह्मर्षी नारदांनी जसा *वाल्या कोळीचे* जीवन बदलून टाकले, तसेच व्यंकटनाथ महाराजांनी माझ्या (नरेंद्रच्या) प्रारब्धाचा, पूर्वसंचिताचा विचार करूनच माझ्यामध्ये आमूलाग्र परिवर्तन घडवून मला सद्भक्त बनवायचे ठरवले होते.
म्हणूनच माझ्या *वागण्या, स्वभावाचा, विचारांचा, योगांचा* विचार न करता माझ्यात परिवर्तन व्हावे — यासाठी ते सतत प्रयत्नशील होते.
गहिनीनाथ आपल्या ज्ञानाचे स्थानांतरण करण्यासाठी निवृत्तीनाथांची वाट पाहत होते. जणू तशीच वाट माझी व्यंकटनाथ महाराज पाहात होते. जेव्हापासून मला *कार्याची आज्ञा* मिळाली, तेव्हापासून हे माझ्या जाणिवेत येऊ लागले.
अनेक घटनांच्या माध्यमातून त्यांनी मला घडविण्याचे योजले होते. विविध वेळा त्यांनी माझ्या पूर्वजन्मीची ओळख सूचित केली.
ते मला कोण आहे, काय आहे — हे सांगण्याचा प्रयत्न सहजतेने करीत होते. परंतु मी बौद्धिक भूमिकेला चिकटलेलो, सदैव *खरे काय? खोटे काय?* याच्या गोंधळात.
माझ्या या अवस्थेची त्यांना पूर्ण जाणीव होती.
ते मला कधी बुद्धीच्या कलाने धक्के देत, कधी सांभाळत, आणि कधी गहन ज्ञान देत.
ही सर्व गोष्ट *केवळ तेच* करू शकत होते.
महाराज नेहमी मला म्हणायचे:
“दगडाची मूर्ती घडविताना टाकीचे घाव घ्यावे लागतात. दगड तुटला तर दुसरा दगड घ्यावा लागतो. गुरूचे कार्य म्हणजे मूर्ती घडविणे.”
ते मला सर्वतोपरी घडविण्याचा प्रयत्न करीत होते. ही माझ्या पूर्वजन्मीचीच पुण्याई की असे गुरू लाभले आणि त्यांनी मला योग्य रीतीने घडवित राहिले.
मी कधी महाराजांना म्हणायचो:
“महाराज, माझ्या आजूबाजूचे लोक काही न करता मजेत आहेत. मीच का तुमच्या सान्निध्यात राहून त्रास सहन करतो?”
त्यावर ते शांतपणे म्हणत:
“जर त्रास वाटत असेल तर आम्हाला सोडून जा.”
पण त्यांना सोडून जाण्याची माझ्या मनाची तयारी नव्हती.
त्यांनी सांगितलेली साधना— *केली* की डोक्यात विचारांचा त्रास, *सोडली* की मन अस्थिर, अस्वस्थ. म्हणून साधना सतत चालूच राहिली.
ते ज्या ज्या घटनांनी मला घडवत गेले, त्यांचा उल्लेख पुढील लेखांमध्ये क्रमाने करीत आहे.