अनुक्रमणिका

व्यंकटनाथांची भजने साधूने लिहली

श्री समर्थ योगाभ्यानंद व्यंकटनाथ महाराज हे नागपूरला मुक्कामी होते. नागपूरला धरमपेठ झेंडा चौक येथे त्यांची जुनी गादी आहे. या भागातले सगळे लोक महाराजांच्या दर्शनाला आणि त्यांच्या माघारी त्यांच्या गादीच्या दर्शनाला नित्यनियमाने जात असत. महाराज गादीवर नसताना किंवा नागपूरला नसतानाही दर्शनार्थी महाराज गादीवर असल्याची अनुभूती घेत असत.

आज समाधी घेऊन २९ वर्ष झाले तरीही दर्शनार्थी गादीचे दर्शन घेतल्यावर महाराजांच्या अस्तित्वाची आणि सामर्थ्याची प्रचिती सतत घेत राहतात. गोपाळराव कोलते महाराजांचे शिष्य आणि अनुभूतींचा सागर असलेले उत्कृष्ट नावाजलेले लेखक, कवी आणि एका कॉलेजचे प्राचार्य होते. त्यांनी बरेच लिखाण केले आहे. त्यांची बरीच काव्ये प्रसिद्ध झाली एवढेच नाही तर ते प्रसिद्धीस पावली आहेत.

एकदा गोपाळच्या मनात आले की आपण महाराजांच्या लीला, सामर्थ्य आणि शिकवण लक्षात घेऊन त्यांच्यावर भक्तिगीते लिहावीत. यापूर्वीही त्यांच्या भक्तिगीते आणि विविध विषयांवरील पुस्तके बरीच प्रसिद्ध झाली होती. ती वाचकांना फार आवडत होती, जणू त्यांची सिद्ध लेखणीच आहे असे त्यांच्या चाहत्यांना वाटायचे. महाराजांच्या आलेल्या अनुभूतीवरून आपण चांगली भक्तिगीते लिहू शकू असा त्यांना आत्मविश्वास होता.

महाराजांची परवानगी आणि लिखाणातील अडथळा

एकदा गोपाळराव महाराजांच्या दर्शनाला गेले. त्यांनी महाराजांना विनंती केली की, ‘‘महाराज, मी निरनिराळ्या विषयांवर काव्य केले आहे, पुस्तके लिहिली आहेत आणि त्याला लोकांची चांगली मान्यताही मिळाली आहे. माझ्या मनात इच्छा निर्माण झाली की तुमच्या सामर्थ्य, कार्य आणि शिकवणुकीवर आधारित भक्तिगीते लिहावीत. आपली अनुमति असेल तर मी सुरुवात करतो.’’

महाराज म्हणाले, ‘‘असं असेल तर तू लिहायला सुरुवात कर.’’ गोपाळरावांना आनंद झाला. परवानगी मिळाल्याने ते उत्साहाने घरी गेले आणि दुसऱ्या दिवशीपासून लिखाणाला सुरुवात केली.

परंतु दर दिवशी अर्धा कागद लिहिला की त्यांना ते लिखाण त्रासदायक वाटू लागे. अस्वस्थता वाढे आणि ते कागद चोळामोळा करून फेकून देत. असा प्रकार जवळजवळ १५ दिवस चालला. शेवटी ते खिन्न झाले आणि महाराजांना जाऊन सर्व सांगितले. ‘‘एकही पद लिहिले जात नाही; माझा आत्मविश्वास गेला आहे,’’ असे ते म्हणाले.

त्यावर महाराज म्हणाले, ‘‘तू तर म्हणाला होतास माझे काव्य लोकांना खूप आवडते. मग तुला काय अडचण जाते? शांतपणे लिही, वेळ लागेल तर हरकत नाही.’’

गोपाळराव कातर स्वरात म्हणाले, ‘‘मी चुकलो. मोठेपणा दाखवला गर्व दाखवला. आता हे लिखाण माझ्याकडून होईल असे वाटत नाही. आपण कृपा केली तरच हे कार्य घडेल.’’ त्यांनी महाराजांच्या पायावर डोके ठेवून शरणागती पत्करली.

महाराजांनी दिलेले गुलाबफूल आणि साधूचे आगमन

तेवढ्यात एक स्त्री महाराजांच्या दर्शनाला आली. तिने गुलाबाचे फुल महाराजांच्या डोक्यावर वाहिले. महाराजांनी ते फुल गोपाळरावांना देत म्हणाले, ‘‘हे घरी घेऊन जा. सकाळी चार वाजता लिखाणासाठी बस. एक चौरंग लिहिण्यासाठी आणि एक बाजूला आसनासाठी ठेव. ज्यांना कृपा करायची असेल ते तिथे येऊन बसतील.’’

गोपाळरावांनी सांगितल्याप्रमाणे पहाटे व्यवस्था केली. परंतु पुन्हा पहिला कागद चोळामोळा झाला. ते शांत बसले आणि प्रार्थना केली, ‘‘महाराज, कृपा करा।’’

डोळे उघडून पाहतात तर बाजूच्या चौरंगावर एक जटाधारी भगव्या वस्त्रातील साधू बसलेला दिसला! त्यांनी वंदन केले. साधू म्हणाला, ‘‘बाळ, लिहायला सुरुवात कर.’’

क्षणातच विचारांची दिशा लागली. काव्याचे झरे स्फुरू लागले. जणू साधू सांगत आहे आणि आपण लिहीत आहोत असे वाटू लागले. हा साधू लिखाण पूर्ण होईपर्यंत रोज पहाटे येऊन बसत असे. हे संपूर्ण पुस्तक त्या साधूने सांगितले तसेच लिहिले गेले.

भजनाची योजना

गोपाळरावांनी भजनाच्या पुस्तकाची योजना साधूच्या मार्गदर्शनाने अशी केली—

भजनाची ही योजना कोणत्याही वेळी वापरता येईल, मात्र रोज सूर्योदयापूर्वी काकडा आरती करण्यासाठीही पद्धत निश्चित केली. सहा गीतांचा काकडा, दोन आरत्या, एक सामान्य आरती आणि पुष्पांजली—असे त्याचे स्वरूप ठरले.

साधूने सांगितलेली गीतरचना

शुक्रवारच्या पहिल्या भजनात साधूने सांगितले—

व्यंकटनाथ महाराज हे अनंत कोटी ब्रह्मांडांचे नायक आहेत.

अशा प्रकारे प्रत्येक वाराच्या दहा गीतांमध्ये महाराजांचे सामर्थ्य, कार्य, पंथकार्य, महती आणि भजन करणाऱ्याला सहज आध्यात्मज्ञान देणारी रचना साधूने केली.

भजनांचा परिणाम आणि अनुभव

सर्व भक्तिगीते प्रासादिक आणि शास्त्रशुद्ध चालींची आहेत. बुधवारच्या भजनात फलश्रुती दिली आहे. भजनातील एकत्र आवाज मनावर त्वरेने शांतता आणतो.

भजन सुरू केल्यावर—

नाथशक्तिपीठातही उपाय करताना कधी कधी वातावरण जड वाटल्यास कोणत्याही वाराचे भजन केल्यावर वातावरण तत्काळ बदलते—हा अनुभव तीस वर्षांचा आहे.

भजने – थेट साधूने सांगितलेली

आतापर्यंतची सर्व भजने कोणी कवी किंवा शिष्याने लिहिलेली असतात. परंतु हे संपूर्ण भजनपुस्तक एका साधूने सांगितले आणि गोपाळरावांनी लिहिले. हा नाथपंथीय सद्गुरूंचा महिमा आहे—एखाद्या शक्तीला स्वतः लिहावासा वाटला आणि म्हणून तो साधू रोज पहाटे येत असे आणि पुन्हा गुप्त होत असे.

अखंड परंपरा

माझे घरी ही भजने गेल्या ५२ वर्षांपासून अखंडपणे दर गुरुवारी भक्तांसह म्हटली जातात. ‘स्वानंद’ने या भजनपुस्तकाची पहिली आवृत्ती १९५९ मध्ये प्रसिद्ध केली.