अकोल्याला दर गुरुवारी माझ्याकडे सांप्रदायिक भजन सर्व गुरुबंधू मिळून करीत असत. सद्गुरू व्यंकटनाथ महाराजांनी अकोल्याला आपल्या सर्व शिष्यांना उद्देशून म्हटले होते की “आमचा वास येथेच आहे. सर्वांनी मिळून येथे भजन करीत राहावे. पुढे हेच देवगाव समजावे.”
गुरुवारचे भजन झाल्यावर, एकदा मी व डॉ. कस्तुरे देवगावला महाराजांच्या दर्शनासाठी गेलो होतो. देवगावला महाराजांकडे तेव्हा काही शिष्य मंडळी आलेली होती. दुपारच्या वेळी आम्ही मंदिरात खालीच महाराजांजवळ बसलो होतो.
महाराज माझ्याशी बोलत होते. ते म्हणाले, “तुझा नि माझा गेल्या ४० वर्षांपासून संबंध आहे. ह्या ४० वर्षात आम्ही तुझ्या खूप परीक्षा पाहिल्यात. तू खंबीरपणे आमच्या जवळ राहिलास. कुठेही डगमगला नाहीस. आता यापुढे कशाचीच काळजी करू नकोस.”
एकदा ते मला म्हणाले, ““स्वारी आली होती”. त्यांनी आमच्या हातात एक वस्तू दिली आणि ती वस्तू तुला द्यायला सांगितली.”
एवढे बोलून स्वारी अदृश्य झाली.
ही वस्तू त्यांनी सांकेतिक रूपाने दिली आहे. ती कशी वापरायची, तिची पूजा, उपयोग कसा करायचा—हे सर्व त्यांनीच सांगितले. या वस्तूमुळे पुढे काय होणार, केव्हा काय होणार, काय करावे या गोष्टींचा अंदाज आधीच मिळेल. वेळ प्रसंगी गुरुंचे, त्यांच्या किंवा कोणत्याही शक्तीचे दर्शन ह्यातून होईल.
नाथपंथाचे सामर्थ्य एवढे अफाट की निर्जीव वस्तूमधूनही अकल्पित गोष्टी साध्य होतात.
एकदा त्यांनी स्वतः सिद्ध केलेली विभूती मला दिली व म्हणाले— “तुझ्या इच्छेला येईल त्याप्रमाणे या विभूतीचा वापर कर.”
पुढे कार्य करताना जेव्हा अडचण येईल किंवा काही समस्या सुटणार नसेल तेव्हा— - ध्यान कोणत्या अवस्थेत बसायचे - कोणत्या वेळी बसायचे - काय करायचे
हे सर्व त्यांनीच सांगितले.
ते निरनिराळ्या पद्धतीने शिकवण्याचा प्रयत्न करीत असत. मला जीवनाची वाट दाखविताना ते म्हणाले:
“बिकट वाट वहिवाट नसावी। धोपट मार्ग सोडू नको। संसारा मध्ये उगाच असा तू। भटकत भटकत फिरू नको। चल सालसपणे तू मार्गी अपुल्या। खोट्या बोला बोलू नको॥ अंगी नम्रता सदा असावी। राग कोणावर धरू नको॥”
तीन तपांपेक्षा जास्त सहवास असलेल्या मला त्यांनी कर्मसिद्धांत, जप, तप, अनुष्ठान, यज्ञकर्म, पारमार्थिक जीवन, वेद, सौरशक्ती, नक्षत्र, ग्रहज्ञान इत्यादी सर्व शिकविले. दैनंदिन आन्हिक कसे व काय करायचे हेही त्यांनीच शिकविले.
डॉ. कस्तुरे हे रामचंद्रनाथ महाराजांचे शिष्य. रामचंद्रनाथ महाराजांनी समाधीपूर्वी सांगितले होते:
“डॉ. कस्तुरेला तुझ्या गादीवर बसव.”
त्याप्रमाणेच डॉ. कस्तुरे पातुर्डा येथील गादीवर बसले आणि आजही परंपरेचे कार्य वाढवीत आहेत.
डॉ. कस्तुरे हे श्रीराम महाराजांचे शिष्य होते आणि नाथपंथीच होते. त्यांनी त्यांच्या डायरीत १९९१ साली घडलेला प्रसंग असा लिहिला—
महाराज अद्वैत स्वरूप, अनन्य भक्ती, पूर्ण शरणागती यांचे वर्णन करीत असताना, त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट झाले की— - देव आणि देवता यांच्याशी भक्ती जोडलेली नसून - गुरु=शिष्य, शिष्य=गुरु हीच खरी अनुभूती आहे.
त्यांनी सांगितले:
“सद्गुरु तुची माझी मूर्ती। निश्चयेसी जाण निश्चिती॥ अनन्य भक्ती या नाव॥”
डॉ. कस्तुरे लिहितात— “हा साक्षात्कार कोटीत एखाद्यालाच घडतो. हे शब्द नाहीत; ही जिवंत अनुभूती आहे.”
५ एप्रिल १९९१ रोजी देवगाव रंगारी येथे झालेल्या भेटीत महाराज मला म्हणाले:
“मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. मी तुझ्यातच साठवलेला आहे. तू माझ्यातच साठवलेला आहेस. जे तू बोलला ते मी बोललो. जे मी बोललो ते तू बोलला. तू चालला तर मी चाललो. दोघेही एकच आहोत.”
महाराज पुढे म्हणाले—
“माझ्यातील जागृत स्वरूपाची पूर्ण शक्ती मी तुला आज देऊन टाकली आहे. ज्ञानसागराचा पूर्ण वाटा मी तुला एकट्यालाच दिला आहे.”
हा प्रसंग नाथपंथातील दत्तक विधान प्रत्यक्ष घडल्यासारखा होता.
ह्या घटनेनंतर सुमारे दीड वर्षांनी मी पुन्हा दर्शनाला गेला तेव्हा मी भीतभीत विचारले:
“महाराज, गळ्यातील रुद्राक्षाची माळ तुम्ही देणार होता ना?”
ते म्हणाले— “किती उशीर केलास रे! आमचे सर्व रुद्राक्ष वाटून टाकले.”
थोड्या वेळाने खोलीत जाऊन ते म्हणाले— “ही घे. हीच माळ फक्त आमच्याकडे राहिली होती. ती तुझ्यासाठीच ठेवली आहे.”
त्यानंतर त्यांनी सांगितले—
“तू आणि मी एकच आहोत. तुला काहीच करायचे नाही. सगळं काही मीच तुझ्याकडून करवून घेणार आहे. कोणाचीही भीती बाळगू नको.”
महाराजांचा सहस्रचंद्रदर्शन कार्यक्रम १९८५–८६ मध्ये उत्साहात साजरा झाला. मी आणि लीलाताई जोशी, तसेच काही भक्तांनी गावोगावी कार्यासाठी प्रयत्न केले.
नंतर महाराज म्हणाले—
“तू जगाला दाखविले की आम्ही कोण आहोत. मग तू आमचे देवगाव समाधी मंदिराचे कार्य का करू शकत नाहीस? ते खूप वाढू शकते. तू ते करू शकतोस.”
मी त्यांना म्हणालो —
“जे तुमच्या मनात आहे त्या पेक्षा मोठे कार्य करीन. पण मी सांगतो त्या एक दोन व्यक्तींना ट्रस्टमधून काढावे.”
महाराज म्हणाले—
“आम्ही त्यांना काढू शकत नाही.”
मग मी त्यांना वंदन करून म्हटले—
“मग हे मला शक्य नाही. ट्रस्टीनि त्रास दिला तर मी अकोल्याहूनच कार्य करीन. पण तुम्ही जिथे मी असेन तिथे माझ्या पाठीशी उभे राहावे लागेल.”
त्यावर ते म्हणाले—
“काही भिऊ नको. काळजी करू नको. कार्य कर. आम्ही सदैव तुझ्या पाठीशी आहोत.”
मी मनोमन ठरविले की— कार्य गुरुंच्या इच्छेप्रमाणेच करायचे, कोणताही अडथळा न मानता.