पदी लागता धन्य होऊनी गेलो

गुरुचरित्र हा परमपावन आणि प्रासादिक ग्रंथ आहे. याची अनुभूती कोणीही केव्हाही घेऊ शकतो. गुरुचरित्र हा ग्रंथ ज्या गुरूंच्या भोवती विस्तारला आहे, ज्या गुरूंच्या स्मरणार्थ लिहिला आहे, त्या गुरुचरित्रामध्ये स्वतः गुरूंनी जे काही सांगितले, ते स्वतः त्यांनी—म्हणजेच ब्रह्मा–विष्णू–महेश रूपी भगवान दत्तात्रेयांनी—सांगितले आहे.

या चरित्रात अनेक कथा गुंफल्या आहेत. अनेक तत्त्वांचे विवेचन केले आहे. ज्ञान देण्याची हातोटी वेगळी आहे. जीवनाचा उद्देश, जीवनामध्ये घडणाऱ्या घटना आणि जीवाच्या जीवनाचा अंतिम उद्देश याचे विवेचन या ग्रंथात केले आहे. हा ग्रंथ ज्या काळात लिहिला गेला तो काळ अंदाजे ५००० वर्षांपूर्वीचा होता.

५००० वर्षांपूर्वी भगवान दत्तात्रेय स्वतः मनुष्यरूप घेऊन या भूमीवर अवतरले आणि केवळ भक्तिभाव वाढवण्याच्या दृष्टीने, तसेच कलियुगाच्या विपरीत परिणामांना सामोरे जाऊन आपले जीवन घडवणे—हे उद्देश या ग्रंथातून लक्षात येतात.

कल्पना करा—ब्रह्मा, विष्णू व महेश या देवता आपल्या सर्व सामर्थ्यानिशी मनुष्यरूप धारण करून जनसामान्यात राहातात; आणि त्यांचा परिचय ते असताना पेक्षा त्यांनी आपले अवतारकार्य आटोपल्यावर अधिक प्रकाशित होतो. आपल्या सारखाच दिसणाऱ्या माणसाचे असामान्यत्व मनुष्य स्वीकारत नाही—ही मानवाची मानसिकता लक्षात घेण्यासारखी आहे.

पाच हजार वर्षांपूर्वी अवतरलेले भगवान दत्तात्रेय कोणी पाहिले? त्या काळात घडलेल्या घटना कोणी पाहिल्या? गुरुचरित्रातून दिलेले ज्ञान कोणी दिले आणि कुणाला मिळाले?—असे अनेक प्रश्न मनात येऊ शकतात. हे आज शक्य आहे का? आज जर खरोखरीच असे गुरु अवतरले असते तर यांची अनुभूती मला घेता आली असती का?—असे विचार सहजपणे कोणाच्याही मनात येऊ शकतात.

मी एवढेच सांगू शकतो—तुम्ही या गुरुचरित्रात ज्या गुरूंचे चरित्र पाहिले आहे, त्या तशाच प्रकारे जनसामान्यांना जीवनाचे मार्गदर्शन करणारे आणि आपल्या अस्तित्वाच्या प्रभावाने आत्मज्ञान देऊन भक्तिभाव वाढवणारे सद्गुरु प्रत्यक्ष मी पाहिले आहेत. त्यांच्या सहवासात, सान्निध्यात जवळजवळ चाळीस वर्षे मी राहिलो. त्यांना निरनिराळ्या प्रकारे अनुभवले आहे.

हे सद्गुरु प्रत्यक्ष मनुष्यदेह धारण करून एका सामान्य कुटुंबात, एका खेड्यात सामान्य व्यक्तीसारखे राहिले. ५६ वर्षे आध्यात्मिक कार्य केले, पंथकार्य केले. आपले प्रभुत्व पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचतत्त्वांवर असल्याची ग्वाही त्यांनी आपल्या कार्यातून दिली. माणसाचे पूर्वसंचित–प्रारब्ध कसे बदलते हे त्यांनी आपल्या कार्यकाळात सहजरित्या दाखवून दिले. हे केवळ अतर्क्य आणि अशक्य वाटणारे आहे, पण ते मी आणि माझ्यासारख्या अनेकांनी अनुभवले आहे.

गुरुचरित्र हा इतिहासातला ग्रंथ आहे. समाधीस्थ सत्पुरुषांना सिद्धपुरुष म्हणून सहज मान्यता देऊन त्यांना ‘अनंतकोटी ब्रह्मांडनायक’ म्हटले जाते. अलीकडचे उदाहरण पाहा—शेगावचे गजानन महाराज. हयात असताना लोक त्यांना ‘नंगा वेडा’ म्हणायचे; आणि आज त्यांच्या स्थानाला दर्शनार्थींनी यात्रेचे स्वरूप दिले आहे. त्यांच्या जीवनकार्यकाळात किती लोक त्यांच्या सान्निध्यात राहिले?

प्रत्यक्ष जीवनात सत्पुरुषांची ओळख आणि त्यांचे सान्निध्य हे तर केवळ पूर्वसंचिताप्रमाणे प्राप्त होते. गुरुचरित्र होऊन गेले, भगवान दत्तात्रेय एकदा अवतरून गेले—आता हे पुन्हा कसे घडेल? हा प्रश्न अनेकांना भेडसावतो. परंतु ब्रह्मा–विष्णू–महेश रूपी भगवान दत्तात्रेयांचे गुरुत्व, गुरुतत्त्व हे अबाधित आणि अखंड आहे. ते स्वतः सर्व देवांना आध्यात्मिक गुरु म्हणून मार्गदर्शन करतात, तसेच भूमीवरील जनतेलाही अव्याहत, अहोरात्र, अखंडपणे मार्गदर्शन करणे हेच त्यांचे जीवनकार्य आहे.

गुरुचरित्र ही अखंड प्रवाही धारा आहे, जिचा साधकाला परिचय व्हायला हवा. गुरुचरित्रातील नामधारक जसा गुरूकडे आकर्षित झाला, तसाच नरेंद्र चौधरी उर्फ नरेंद्रनाथ महाराज हे देखील अशाच एका सद्गुरूकडे आकर्षित झाले; आणि सद्गुरूंनी पाहता पाहता त्या दगडाला देवपण बहाल केले.

५००० वर्षांपूर्वीचे गुरुचरित्र आणि विसाव्या शतकातील हे गुरुचरित्र कसे एकच आहे, हे विशद करणारी लेख मालिका श्री नरेंद्रनाथ महाराजांनी सन २०२२ मध्ये पदी लागता धन्य होऊनी गेलो या शीर्षकाखाली प्रसिद्ध केली होती. तेच लेख आता आध्यात्मिक-वाटचाल अंतर्गत विभाग निहाय दिले आहेत.

ह्या त्यांच्या लेख मालिकेला मिळालेले प्रतिसाद आपण येथे आणि काही भाग येथे वाचू शकता.