अनुक्रमणिका

कलीयुग वर्णन

कलिचा आणि ब्रह्मदेवाचा संवाद

गुरुचरित्राच्या दुसऱ्या अध्यायात कलिचा आणि ब्रह्मदेवाचा संवाद अशाप्रकारे दाखवला आहे. जे जन असती ब्रह्मज्ञानी, पुण्य करिती जाणोनि त्यांसी तुवा साह्य होऊनि वर्तत असे म्हणे ब्रह्मा. ऐकोनि ब्रह्मयाचे वचन कली म्हणतसे नमून, स्वामींनी निरोपिले जे जन तेचि माझे वैरी असती. ऐसे वैरी जेथ असती, केवी जाऊ लिये क्षिती? ऐकतां होते मज भीति, केवीं पाहूं तयांसी? पंचाशत भूमंडळांत भरतखंडी पुण्य बहुत, माते मारितील देखत, कैसा जाऊं म्हणतसे.

ऐकोनि कलीचे वचन ब्रह्मा निरोपी हांसोन, काळात्म्यातें मिळोन तुवां जायें भूमीसी. काळात्म्याचे ऐसे गुण छेदन करील धर्मवासना; पुण्यात्म्याचे अंतःकरणा उपजेल बुद्धि पापाविषयीं. कली म्हणे ब्रह्मयासी, वैरी सांगेन माझे कैसी? वसताति भूमंडळासी सांगेन स्वामी ऐक पां.

कलिचे वैरी कोण?

उपद्रविती मातें बहुत, कृपा न ये मज देखत. जे जन शिवहरि ध्यात, धर्मरत मनुष्य देखा — हेच माझे वैरी. आणिक असती माझे वैरी वास करिती गंगातीरीं, आणिक वाराणशीपुरीं जाऊनि धर्म करिती. तीर्थे हिंडती आचरण, आणिक ऐकती पुराण; जे जन करिती सदा दान तेचि माझे वैरी जाण. ज्यांचे मनीं असे शांति तेचि माझे वैरी ख्याति; अदांभिकपणे पुण्य करिती त्यांसी देखतांचि भीतसें.

नासाग्रीं दृष्टि देउनी जप करिती अनुष्ठानी, त्यांसि देखतांचि नयनीं प्राण माझा जातसे. स्त्रियापुत्रांवरी प्रीति मायापाशें आचरती, त्यांवरी माझी बहु प्रीति; परम इष्ट माझे जाणा. वेदशास्त्रांतें दूषिती, हरिहरांतें भेद पाहती; अथवा शिवविष्णु दूषिती, परम आप्त माझे जाणा. जितेंद्रिय असतील जे नर, सदा भजती हरिहर; रागद्वेषविवर्जित धीर त्यांसि देखतां मज भय.

ब्रह्मदेवाचे उत्तर

ब्रह्मा म्हणे कलियुगासी, तुझा प्रकाश बहुवसीं; तुवां जातांचि भूमीसी तुझे इच्छे रहाटती. एखादा विरळागत होईल नर पुण्यवंत, त्यातें तुवां साह्य होत. ऐकोनि वचन कली करीतसे नमन; करसंपुट जोडोन विनवीतसे परियेसा — माझा स्वभाव दुर्वृत्तीसी; केवीं साह्य होऊं धर्मासी? सांगा स्वामी उपाय, कवणे परी रहाटावें?

कलीचें वचन ऐकोनि ब्रह्मा सांगतसे विस्तारोनि: काळ कळी असती दोनी तुज साह्य होऊनी येत असती निर्गुणी; तेचि दाविती तुज मार्ग. निर्मळ असती जे जन तेचि तुझे वैरी; मळमूत्रे वेष्टिले जन तुझे इष्ट.

पुण्य–पाप आणि कलियुग

याचि कारणें पापपुण्यासी विरोध असे; अधिक होय पुण्यराशी तेचि जिंकिती. याकारणें विरळागत होतील नर पुण्यवंत; तेचि जिंकिती हे निश्चित, बहुतेक तुज वश्य होती. एखादा विवेकी जन तुझा उपद्रव साहील पूर्ण; जो न साहे तुझे दारुण तुज वश्य जाण जाहला. या कलियुगाभीतरीं जन होतील येणेपरी; जे जन साहतील तुझी क्रूरी तेचि ईश्वरी ऐक्य होती.

कलियुगातून सुटका कशी?

ब्रह्मा म्हणे — धैर्य धरोनि अंतःकरण, शुद्ध बुद्धी वर्तती जन; दोष न लागती लोभवर्जित नरांसी. जे जन भजती हरिहरांसी अथवा असती काशीवासी, गुरु सेविती निरंतरेंसी त्यांसी तुझा न लगे दोषु. मातापिता सेवकांसी अथवा ब्राह्मणासी, गायत्री कपिला धेनूसी भजणारांसी न लगे दोष.

वैष्णव अथवा शैवासी, जे सेविती नित्य तुळसीसी; आज्ञा माझी आहे — तयांसी बाधूं नको. गुरुसेवक, पुराण-श्रवण करणारे, साधनधर्मपर — त्यांच्यावर तू काही चालवू नये. सुकृती, शास्त्रपरायण, गुरूसेवी, विवेकधर्म करणारांसी तुवां बाधूं नको.

पुराणातील कलीयुग वर्णन

द्वापारयुग संपताच माझा कलियुग सुरू झाला. देवकालगणनेनुसार 1200 वर्षे म्हणजे मानवगणनेनुसार 4,32,000 वर्षे. कलियुगाचा दूत पिशाच्चासारखा, अविवेकी, नंगानाच करणारा, पापपुण्याचा विचार नसणारा, धर्माचा नाश करू पाहणारा — अशा स्वरूपात वर्णित आहे. तो निद्रा, परद्रव्य, परस्त्री यांचा दुरुपयोग करील; पक्षपात, मत्सर, ढोंगीपणा हे त्याचे आवडते गुण राहतील. अल्पमात्रे धर्म केल्यास सिद्धी मिळेल — असे या युगाचे वैशिष्ट्य आहे.

या युगात ‘वायू’ तत्त्वाचा प्रभाव असून त्याचा निजगुण ‘दया’; पण दयेला आडोसा करून अनेक विकृती जन्म घेतील. समाजरचना ढासळेल, वर्णधर्म ढासळेल, निंदक वृत्ती वाढेल. चोर, पाखंडी, स्वैराचार, राजांचे अत्याचार, ब्राह्मणांचे पतन, संन्यास्यांचा लोभ — हे सर्व वर्णित आहे.

स्त्रिया निर्लज्ज, कर्कश व धाडसी होतील; व्यापारी कपटी; सेवक-मालक निष्ठाहीन; गाय दूध देणे थांबवेल; लोक पिशाच्चासारखे दिसतील; क्षुल्लक गोष्टींसाठी सुद्धा हत्या होतील. भक्तिपथापासून लोक दूर जातील; केवळ परमार्थ विस्मरणात जाईल.

कलियुगातून मुक्तीचा मार्ग

भगवंताचे स्मरण, संकीर्तन, ध्यान, पूजन, श्रद्धा — हे सर्व जन्मजन्मांतील पापे नष्ट करतात. एखाद्याने मृत्यूवेळी भगवंताचे नाव घेतले तरी त्याची बंधने तुटतात. कलियुगातून सुटका व आत्मोन्नती साधण्यासाठी नाथपंथ ही भगवान श्रीकृष्णांनी केलेली योजना आहे; नाथपंथ हा कलियुगातील आधार आहे.