मागील पस्तीसाव्या लेखात आपण पाहिले की ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या मुखी वेद वदवले. हे करताना त्यांनी त्या रेड्याला नव्हे तर *रेड्याच्या जीवाला* मागील सात जन्मांची ओळख दिली. त्यांनी केलेली आज्ञा रेड्याला समजली आणि त्याने वेद पठण केले. यावरून स्पष्ट होते की जीवाला त्याच्या मागील जन्मांची स्मृती जागृत करण्याची क्षमता सद्गुरूकडे असते.
विदुर नावाच्या नगरीत एक यवन राजा राहत होता. तो ब्रह्मद्वेषी, महाक्रूर होता आणि ब्राह्मणांचा बुद्धिभेद करणे हेच त्याचे उद्दिष्ट होते. तो वेद पठण करवून घेई, दक्षिणा देई, परंतु मनात ब्राह्मणांचे अवमूल्यन करीत असे. अशातच दोन ब्राह्मण आले आणि म्हणाले— “आम्ही तीन वेद जाणतो, आमच्यासारखे कोणी नाही.” राजाने त्यांना वादासाठी नगरातील विद्वान ब्राह्मणांसमोर उभे केले आणि त्या दोघांनी सर्वांना पराभूत केले. राजाच्या मनीषेप्रमाणे हेच त्याला हवे होते.
या दोघांनी त्रिविक्रम मुनींच्याही कडे वादासाठी धाव घेतली. त्रिविक्रम म्हणाले की हा अहंकार गाणगापूरला श्रीगुरूकडेच नेला पाहिजे. तिघे निघाले— दोन ब्राह्मण पालखीत, आणि त्रिविक्रम पायी.
गुरूंनी त्या दोघांना समजावले — “वेदांचा दुरुपयोग, आत्मस्तुती, ब्राह्मणांचा उपमर्द हे आत्मघातकी आहे.” गुरूंनी वेदांचा मतितार्थ, व्यापकता आणि रचना सांगितली. हे वेदांचे विवेचन त्यांच्या अकांड ज्ञानाचे दर्शन होते; त्यात कोणत्याही ऋचेचा उल्लेख नव्हता— जणू वेदांची अनुक्रमणिका त्यांनी सांगितली.
परंतु ते दोघे ब्राह्मण वादासाठी हट्ट धरून बसले.
तेवढ्यात एक मागासवर्गीय माणूस जात होता. श्रीगुरूंनी त्याला बोलावून जमिनीवर सात रेषा काढायला सांगितल्या आणि भस्म लावून पहिली रेषा ओलांडण्यास सांगितले.
येथे महत्त्वाचे म्हणजे — तो *फक्त मागील जन्मच नव्हे तर पुढील जन्मांचेही वर्णन* करीत होता. हे सामर्थ्य भगवान दत्तात्रेयांचेच आहे.
यावरून सिद्ध होते की जीव कोणत्या जन्मात कोणत्या अवस्थेत असेल याचे सूत्र ब्रह्मांडनायकाकडेच असते.
हे पाहून दोन्ही विप्र भयभीत होऊन थरथर कापू लागले. श्रीगुरूंनी जाहीर केले— “तुम्ही त्रिविक्रम भारतीचा अवमान केला, अनेक ब्राह्मणांची निंदा केली; त्यामुळे तुम्हाला ब्रह्मराक्षसाचा जन्म घ्यावा लागेल. बारा वर्षांनी एक ब्राह्मण तुम्हाला मुक्त करील.” त्यांचा गर्व पूर्णपणे नष्ट झाला.
भगवान दत्तात्रेयांच्या कृपेने सद्गुरूंना देखील शिष्याच्या सर्व जन्मांची ओळख असते. याच संदर्भात श्री समर्थ सद्गुरु योगाभ्यानंद व्यंकटनाथ महाराजांनी नरेंद्रला सांगितले की— “तुझी पत्नी कुंदा या जन्मात तुझी पत्नी नव्हती होणार. परंतु आम्ही योजना बदलली.”
यानंतर एका साधकानेही जन्मपत्रिकेवरून तेच सांगितले होते— “कुंदा या जन्मात तुझी पत्नी होण्याचा योग नव्हता; तो पुढील काही जन्मांत होता.”
यावरून दिसते की ब्रह्मांडातील प्रत्येक जीवाचा सूक्ष्म अभ्यास सदैव दैवी योजनेत निश्चित असतो.
प्रत्येक जीवाचा उद्धार शाश्वतपणे निश्चित आहे. परंतु — जीव किती लवकर दुःखातून मुक्त होईल, घोर यातनांतून बाहेर पडेल, हे त्याच्या कर्मावर अवलंबून आहे.
सद्गुरू सांगतील ते कर्म करत राहणे, त्यांच्या सान्निध्यात जास्तीत जास्त जीवन व्यतीत करणे — यातच जीवाचे कल्याण आणि जीवनाची सार्थकता आहे.