| पाहतां शरीराचे मूळ | ह्या ऐसे नाही अमंगळ | रजस्वलेचा जो विटाळ | त्यामध्ये जन्म यासी |
मानवी जीवाची कहाणी प्रत्यक्षात त्याच्या पिंडाच्या गर्भधारणेपासून सुरू होते. सामान्य समजुतीनुसार प्रसूती होऊन मूल जन्माला आले की त्याचे जीवन सुरू झाले, असे मानले जाते; परंतु खरे तर जीवाचे घडण गर्भारंभाच्या क्षणापासूनच सुरू होते. जन्मत: साधारण १ ते १.५ फुटांचे असलेले बालक चंद्रकलेप्रमाणे वाढत जाऊन वयात आल्यावर साडेपाच ते सहा फूट होईपर्यंत विकसित होते. १५ ते २० वर्षांच्या कालावधीत ही वाढ अपरिमित होते; परंतु वाढण्याची प्रक्रिया कधी, कशी, कोणत्या क्षणी घडली हे मात्र दिसत नाही.
जसे झाडाची रोपे वाढताना दिसत नाहीत, पण वाढलेली दिसतात; तसेच मानवी शरीराचेही आहे. जीवनसत्त्वे दिल्यानंतर त्यांचा परिणाम कधी होतो हे दिसत नसले तरी बदल मात्र घडलेला जाणवतो. वाढ ही इतक्या सूक्ष्म पातळीवर होत असते, की ती कशी आणि केव्हा झाली हे जाणवतही नाही.
श्री संत तुकाराम महाराज म्हणतात, ‘चाले हे शरीर कोणाचिये सत्ते! कोण बोलविते हरीवीण!’ — म्हणजेच जन्म देणार्या आईवडिलांच्या पलीकडेही काही शक्ती, काही अदृश्य सत्ता (देवाची सत्ता, ब्रह्मांड) असते, जी जीवाला चालविते आणि वाढविते.
श्री समर्थ रामदास स्वामी ‘दासबोध’ मध्ये म्हणतात की, ‘पाहतां शरीराचे मूळ ह्या ऐसे नाही अमंगळ | रजस्वलेचा जो विटाळ | त्यामध्ये जन्म यासी’. मानवी जीवनाचे बीजारोपण हे स्त्रीच्या उदरात होते. स्त्री रजःस्वला होत नसेल तर बीजारोपणच होत नाही. परिणामतः त्या ठिकाणी मानवी जीवनाची निर्मिती शक्य होत नाही. ह्यातच परमेश्वराची अचंबित करणारी किमया आहे.
स्त्रीच्या शरीरातून ठराविक काळाने नैसर्गिकरीत्या बाहेर पडणारा विटाळ तिलाच पुढील गर्भधारणेसाठी उपयुक्त बनवितो, आणि याच ठिकाणी मानवी जीवाचे बीजारोपण होते. म्हणूनच भूमीची शुद्धता (स्त्रीची शुद्धता) आणि बीजाची शुद्धता (पुरुषाचे बीज) ह्यांवरच पुढे वाढणाऱ्या जीवाची शुद्धता, सात्त्विकता किंवा असात्त्विकता अवलंबून असते.
श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात: ‘शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी’. म्हणजेच मूळ बीज सात्त्विक आणि शुद्ध असेल तर त्यातून निर्माण होणारी गर्भधारणा आणि पुढे जन्मणारा जीव हाही सात्त्विक, सुयोगी आणि गोमटी स्वभावाचा असतो. ज्या आईवडिलांचे योग–भोग, गुण–दोष जे असतात त्याच धाटणीचे गुण साधारणतः बालकामध्ये स्थापन होतात.
मानवी जीवनातील योग, भोग, व्याधी, कष्ट, समाधान, चांगले–वाईट प्रारब्ध हे सर्व उभय जीवांच्या (पालकांच्या) गुणवैशिष्ट्यांनुसार आणि त्यांच्या पूर्वसंचितानुसार नव्या जीवात स्थापन होतात.
ज्योतिषशास्त्रानुसार, आईवडिलांच्या जन्मपत्रिकेत दिसणारे ग्रहयोग बालकाच्या जन्मपत्रिकेत प्रतिबिंबित होतात. नवग्रह, बारा घरे, बारा राशी, नक्षत्रे आणि त्यांच्या परस्परयोगातून जीवाचा संपूर्ण प्रारब्ध–पुरुषार्थ–कर्मफळाचा नकाशा तयार होतो. ब्रह्मांडातील जीवनाचे विविध योग, पूर्वजन्मदोष, शाप, अपमृत्यू, प्रेतपीडा हेसुद्धा ह्या ग्रहसंयोगातून समजते.