रामदास स्वामी

रामदास स्वामी, जे मारुतीचा अवतार मानले जातात, म्हणतात की जगातील प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील अन्न–पाण्याची व्यवस्था परमेश्वराने पूर्वीच केली आहे. जीवन कशा पद्धतीने व्यतीत व्हावे याचीही त्याने योजना केलेली आहे. त्यांच्या शिकवणीनुसार, नामस्मरण, भजन, पूजन व उपासना यांमध्ये जीवन ठेवले तर जीवाचा उद्धार लवकर होतो.

जगी पाहता देव हा अन्नदाता तया लागली तत्त्वतः सार चिंता तयाचे मुखी नाम घेता फुकाचे मना सांग पां रे तुझे काय जाते

परंतु माणसाला जीवनामध्ये केवळ पोटभर अन्न मिळवण्याची अभिलाषा नसते. त्याच्या अपेक्षा–अभिलाषा या कितीतरी पट जास्त असतात. फक्त अन्न मिळालं म्हणून तो समाधानी होऊन नामस्मरणात रमून बसत नाही.

तो सदैव आपले जीवन अधिकाधिक सुखी करण्यासाठी — पैसा, मान–मरातब, कीर्ती, अहम, मान्यता आणि अहंकार वाढवण्यासाठी अहोरात्र धडपडत राहतो.

केवळ ईश्वर–साधना, आराधना करून जीवन कृतार्थ करावे, ही साध्या माणसाची कल्पना नसते; ही संकल्पना केवळ साधू, संत आणि महात्म्यांची असते.

म्हणूनच माणूस काम, क्रोध, मद, मोह, लोभ, मत्सर या षडरिपूंमध्ये अडकतो आणि आपले जीवन अधिकाधिक कष्टप्रद, दुःखी, अशांत व अस्थिर करून टाकतो.

शेवटी त्यालाच उमगत नाही की— “माझे भोग असे का? माझे जीवन असे का?”

रामदास स्वामी म्हणतात:

मना त्वा चिरे पूर्वसंचीत केले तया सारिखे भोगणे प्राप्त झाले