नाथसंप्रदाय हा सर्व संप्रदायांचा गुरूसंप्रदाय असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ संशोधक प्रा. डाॅ. म. रा. जोशी यांनी केले. केवळ वारकरी संप्रदायच नव्हे तर महाराष्ट्रातील दत्तसंप्रदाय, रामदासी संप्रदाय, महानुभाव, इत्यादी सर्वच पंथ नाथसंप्रदायाला *गुरूस्थानी* मानतात. या सर्वांमध्ये गुरू–शिष्यभाव असल्यामुळे नाथसंप्रदाय अद्वितीय ठरतो.
ते नाथशक्तिपीठ परिवाराच्या वतीने आयोजित कार्याच्या द्वितपःपूर्ती व प. पू. श्री नरेंद्रनाथ महाराजांच्या सहस्रचंद्रदर्शन सोहळ्यातील संतपूजन व विशेषांक प्रकाशन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
आपला मुद्दा स्पष्ट करतांना डॉ. जोशी म्हणाले की— भक्तिसंप्रदायाचे प्रवर्तक समजले जाणारे संत नामदेव यांच्यापर्यंतचे सर्व संत नाथसंप्रदायीच होते.
नाथसंप्रदायाचे तत्त्वज्ञान हे *तंत्रप्रधान योगशास्त्राचे* आहे. येथे शिव हे शक्ति, आणि शक्ति ही शिवस्वरूप अशी उपासना आहे. गोरक्षनाथांचा सिद्ध-सिद्धांत हा ग्रंथ प्रमाण मानला, तर नाथपंथ हा अद्वैतवादी संप्रदाय आहे.
आदिनाथ हे पंथाचे गुरू, जगद्गुरू आहेत, तर मंत्रगुरू भगवान श्री दत्तात्रेय, त्यामुळे मत्सेंद्रनाथांपासून श्री नरेंद्रनाथ महाराजांपर्यंत सर्वच नाथसिद्ध हे *भगवान दत्तात्रेयांचे शिष्य* ठरतात.
नाथसंप्रदाय व योगशास्त्र यांचे अतूट नाते असून, नाथपंथाने भारताच्या भौगोलिक सीमा ओलांडून व्यापक प्रभाव निर्माण केला आहे. हे लक्षात घेतले असता नाथसंप्रदाय हा सिद्ध, व्यापक व उपयुक्त असल्याचे स्पष्ट होते.
या प्रसंगी वाशीम येथील वासुदेव आश्रमाचे पीठाधीश प. पू. श्री विजय काका पोफळी महाराज यांचे उत्सव समितीच्या वतीने श्री भाऊसाहेब मारोडकर यांनी श्रद्धापूजन केले.
पू. श्री विजय काका महाराजांनी नाथशक्तिपीठाच्या वेदप्रसार व प्रचारकार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला व पू. श्री नरेंद्रनाथ महाराजांना निरामय आयुष्यासाठी अभिष्टचिंतन केले.
कार्याच्या द्वितपःपूर्ती निमित्ताने नाथशक्तिपीठ परिवाराच्या वतीने विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. यात प. पू. श्री नरेंद्रनाथ, पद्मश्री डॉ. पठाण, डॉ. म. रा. जोशी, डॉ. शंकर जोगी, वेदमूर्ती विवेकशास्त्री गोडबोले, वेदमूर्ती डॉ. श्रीकांत शास्त्री, प्राचार्य प्रमोद डोरले, प्रा. भाऊसाहेब मेरेकर, पत्रकार श्री सुहास कुळकर्णी, डॉ. ल. का. मोहरील अशा महाराष्ट्रातील सिद्ध लेखकांचे लेख समाविष्ट आहेत.
या विशेषांकाचे संपादन ह. भ. प. श्री गजानन कुलकर्णी यांनी केले.
प्रारंभी व्यासपीठावरील मान्यवरांनी चैतन्यश्री व्यंकटनाथांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन व ऋणनिर्देश श्री गजानन कुलकर्णी यांनी केले.