नाथशक्तिपीठाचे वतीने विविध संप्रदायांच्या संत-सद्गुरूंना एकाच व्यासपीठावर आणून त्यांचे एकत्रीकरण व प्रबोधनाची संधी देणार्या उपक्रमांची आज नितांत आवश्यकता आहे. यामुळे धर्मकार्याला अधिक गतीमान करता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सद्गुरूंची तळमळ ही नेहमी साधकांची सर्वार्थाने शुद्धी व्हावी यासाठीच असते. समर्पणभावनेने सद्गुरूंजवळ जे सेवा करतात त्यांना अधिक लाभ मिळतो.
शक्तिपात संप्रदाय आणि नाथ संप्रदायाचे स्वरूप एकच आहे. नाथसंप्रदायाचे *ज्ञाननाथांनी ज्ञानेश्वरीत* या दोहोंचे साम्य व्यक्त केले आहे.
प. पू. नरेंद्रनाथ महाराजांसारख्या महापुरुषांच्या सेवा–सन्निध्याने साधना बळकट होते आणि धर्मकार्य करण्याची प्रेरणा व ऊर्जा मिळते. तसा आशीर्वाद त्यांनी मला द्यावा, असे विनम्र मागणे शक्तिपाताचार्य प. पू. श्री मोरेश्वर बुवा चर्होलीकर महाराज, मयुरेश्वर पीठ, पुणे यांनी येथे व्यक्त केले.
ते नाथशक्तिपीठाच्या वतीने आयोजित संतपूजन सोहळ्यात बोलत होते.
या प्रसंगी शक्तिपात संप्रदायाचे आद्यगुरू परमहंस परिव्राजकाचार्य श्री लोकनाथतीर्थ स्वामी महाराज यांच्या चरणपादुकांचे पूजन प. पू. श्री नरेंद्रनाथ महाराज यांच्या हस्ते झाले.
नाथशक्तिपीठाच्या वतीने उत्सव समितीचे अध्यक्ष श्री भाऊसाहेब मारोडकर, ॐ शिक्षण मंडळाचे विश्वस्त श्री अनिरुद्ध चौधरी, विदुला चौधरी यांनी प. पू. श्री मोरेश्वरबुवा चर्होलीकर महाराजांचे श्रद्धापूजन केले आणि त्यांना श्री नरेंद्रनाथ महाराजांची साहित्यसंपदा भेट दिली.
तसेच मयुरेश्वर पीठाच्या वतीने श्री चर्होलीकर महाराजांनी प. पू. श्री नरेंद्रनाथ महाराजांचे सहस्रचंद्रदर्शन व कार्याच्या द्वितपःपूर्ती निमित्ताने श्रद्धापूजन केले.
ह. भ. प. श्री रामनाथ अय्यर यांनीही श्री महाराजांना महावस्त्र अर्पण केले.
व्यासपीठावर ज्ञानमहर्षि पं. वसंतराव गाडगीळ, राष्ट्रीय कीर्तनकार ह. भ. प. प्रा. अपामार्जने विराजमान होते.
अध्यात्म हा स्पर्धेचा विषय नसून, जीवाला उन्नत करणारा व चित्त–वृत्ती–प्रवृत्ती शुद्ध करणारा संस्कार आहे. या प. पू. श्री नरेंद्रनाथ महाराजांच्या भूमिकेतून संतपूजनाचा उपक्रम आयोजित करण्यात आला.
प्रारंभी सर्व मान्यवरांनी दीपप्रज्वलन केले आणि श्री व्यंकटनाथ व लोकनाथतीर्थ स्वामी महाराजांच्या चरणपादुकांचे पूजन केले.
प्रास्ताविक व परिचय ह. भ. प. गजानन कुळकर्णी यांनी केले. वेदमूर्ती डॉ. श्रीकांतशास्त्री गदाधर यांनी वेदोक्त मंत्रजागर केला.