9-4-22 सूर्यमंडलाचा आणि ग्रहांचा खेळ - आकाशातील सूर्यमंडळ, ग्रह, नक्षत्र, तारांगण, तारे हे सतत भ्रमण करीत असतात. मुलाचा जन्म झाल्यावर जन्मपत्रिकेत नवग्रह कोणत्या ठिकाणी कोणत्या घरात आहेत, हे त्यावरून काढतात. जन्मपत्रिका ही विशिष्ट आखणीची असते. त्यात एकूण १२ घरे असतात. प्रत्येक घराला एक एक राशी, अशा एकूण १२ राशी आहेत. प्रत्येक राशीचा क्रमवार ठरलेला आहे. त्यामुळे त्या त्या १ ते १२ आकड्यांवरून कोणत्या आकड्यांचे म्हणजेच कोणत्या राशीचे ते घर आहे हे समजते.
ज्याप्रमाणे पत्रिकेत जन्मराशी दिसतात त्याप्रमाणे पंचमहाभूतांत त्या प्रत्यक्षपणे दिसतात. पंचमहाभूतांतील आकाशतत्त्वात म्हणजे आकाशात ह्या १२ राशींचे नक्षत्र आणि तारांगणांनी झालेले राशिचित्र आकाशात प्रत्यक्षपणे दिसते. मातेच्या उदरात प्रस्थापित झालेला गर्भ हळूहळू विकसित होऊन त्याची वाढ झाली की तो जन्म घेतो. ज्या दिवशी, ज्या वेळेला, ज्या ठिकाणी तो जन्माला येतो, ती त्याची जन्मवेळ, जन्मस्थान, जन्मदिवस व तारीख असे आपण नोंदवून ठेवतो. त्याच्या तपशिलावरून ज्योतिषी ह्या बालकाची जन्मपत्रिका तयार करतात.
त्याची जन्मपत्रिका ही जरी आताच्या घटनेवरून तयार केलेली असली तरी ती जन्मदिवशी असलेली ग्रहस्थिती नोंदविते. ही त्याची ग्रहस्थिती जोपर्यंत त्याचे सद्यजीवन आहे तोपर्यंत असते. ह्या त्याच्या जन्मपत्रिकेवरून त्याच्या सद्यजीवनाचा, तसेच मागील जन्माच्या त्याच्या कर्माच्या स्थितीचा उलगडा होत असतो. हे जसे खरे आहे तसेच जे ग्रह आपण आकाशात पाहतो तेच ग्रह मानवी शरीरात विद्यमान असतात. ग्रह नक्षत्रात होणारे स्थित्यंतर याचा परिणमण शरीरातील ग्रहांवर देखील होत असतो.
पांच महाभूतात होणाऱ्या स्थित्यंतराचा परिणाम प्रत्येक शरीरावर होत असतो म्हणून शरीरातील नवग्रह कसे आणि कोठे आहेत हे समजून घेऊ कोणत्याही माणसाला त्याच्या जीवनात अनुभवाला येणारे त्रासदायक योग आहेत का, ते काय असतील, ह्याचा अंदाज जन्मपत्रिकेवरून निश्चितच घेता येतो. पत्रिकेवरून कोणत्या प्रकारचे कर्मदोष आहेत हेदेखील समजू शकते. परंतु नेमके कोणते उपचारकर्म केले म्हणजे हे दोष जाऊ शकतात, हे ज्योतिषी अगर इतर कोणीही सांगू शकत नाहीत. अखंड गुरुपरंपरेने जे कार्य करणारे सद्गुरू आहेत तेच कदाचित हे सांगू शकतील.
ज्याप्रमाणे जन्मपत्रिकेतील एक-एक करीत १२ घरांना आपआपले विशेष महत्त्व आहे त्याचप्रमाणे नवग्रहांतील प्रत्येक ग्रहाचे गुणविशेष आहेत. त्या नवग्रहांतील रवी हा ग्रंहाचा राजा असून, आकाशातील सर्व ग्रह त्यांच्या अस्तंगतच भ्रमण करीत असतात. प्रत्येक ग्रह शरीरामध्ये कसा विद्यमान असतो व काय परिणाम होतो, हे येथे विशद केले आहे.
शरीरात हे ग्रहमंडळ कसे विद्यमान आहे नवग्रह जे आकाशात दिसतात. त्यांचा प्रत्येक माणसाच्या दैनंदिन जीवनावर चांगलाच प्रभाव असतो. एवढेच नाही, तर जे ग्रह आकाशात दिसतात ते सर्व ग्रह माणसाच्या शरीरामध्ये विद्यमान असतात. प्रत्येक ग्रहाचा माणसाच्या शरीरातील हाड, मांस, स्नायू, ज्ञानेंद्रिय आदी सर्वांशीच सरळ संबंध असतो व त्यांचा परिणामदेखील त्या त्या विभागांवर जीवनात होत असतो.
शरीरातील ग्रहमंडळाचा विचार केला की असे म्हणावेसे वाटते, की माणसाच्या शरीरातील अस्थींचा, हाडांचा संबंध हा रवी ग्रहाशी असतो, तर चंद्राचा संबंध हा मनाशी, रक्ताशी असतो. मज्जातंतूंचा संबंध मंगळाशी, तर पृथ्वीचा संबंध बुधाशी असतो. गुरूचा संबंध आध्यात्मिक ज्ञान, बुद्धिमत्ता, रक्तदाब, यकृत यांच्याशी असतो, तर शुक्राचा संबंध शुक्र धातूशी असतो. शरीरातील स्नायूंचा संबंध हा शनीशी असतो.
जो ग्रह बिघडला असेल त्या ग्रहाचा परिणाम शरीरातील त्या त्या भागावर होताना दिसतो. त्यामुळे ग्रहांमध्ये होणारे स्थित्यंतर किंवा ग्रहणांचा होणारा परिणाम हा शरीरातील विविध अंगांवर होतो. शरीरातील ज्या पेशींचा दोष लक्षात घेऊन त्याला असणार्या आजारांवर, रोगांवर योग्य उपाययोजना केली तर तत्काळ लागू पडते. पंचांगावरून आपल्याला शरीरातील ग्रहांमध्ये होणारे स्थित्यंतर त्याचा काल, अवधि व ग्रहांची स्थिति कळू शकते.
आकाशात होणाऱ्या ग्रहांच्या स्थित्यंतराचा परिणाम हा शरीरावर होतच असतो. त्या वरून आपल्या प्रकृतीमनाचा अंदाज आपण घेऊ शकतो. ब्रह्मांडाच्या अंतर्गत असणार्या या विविध शक्तींचा जर विचार केला, तर ब्रह्मांडाचा एक घटक असणार्या एका मानवी जीवनाचा अभ्यास आपण वेगळ्या शास्त्रीय पद्धतीने करू शकतो.
जीवनात घडणार्या विविध गोष्टींचा प्रत्यक्ष संबंध हा पूर्वसुकृताशी लावणे जेवढे कठीण वाटते तेवढेच ज्या ज्या योगांचा जीवनातील सर्व गोष्टींवर प्रभाव आहे त्या विविध योगांवरून जीवनक्रम चालू असताना त्या गोष्टींचा होणारा परिणाम आणि ग्रहांच्या माध्यमातून माणसावर दिसणारे परिणाम, ह्यावरून जे काही ग्रहमंडळ दर्शवितात हे त्याचे पूर्वसंचितच मानावे लागेल.
सद्यजीवनात घडणार्या गोष्टी आणि जन्मपत्रिका यांचा परस्पर संबंधांवरून अभ्यास जर केला तर जीवनामध्ये घडणार्या अप्रतिम गोष्टी का घडतात, याचा अंदाज ग्रहमंडळाच्या माध्यमातून घेता येऊ शकतो. आपले निष्कर्ष बरोबर आहेत की चूक आहेत, हे पाहण्यासाठी सध्याच्या जीवनातील घटनांचा महत्त्वाचा भाग आहे.
ग्रह बिघडले असताना काय केले असता बिघडलेला ग्रह दोषरहित होईल, हे अभ्यासावरून आणि अनुभवांवरून समजू शकते. ब्रह्माण्डामध्ये सूर्यमंडळाची आणि ग्रहमंडळाची जशी विविधता आणि परस्परसंबंध आहेत, त्याचप्रमाणे अनेक देवदेवतांचीदेखील आहेत. कोणत्या त्रासासाठी कोणत्या ग्रहाची व कोणत्या देवतेची उपासना करायला पाहिजे, हे सद्गुरू सांगू शकतात. तसेच कोणत्या उपासनेने जीवनक्रम हा आनंददायी ठरू शकेल ह्याचादेखील सूत्रबद्ध विचार केला आहे.
त्याप्रमाणे जर योग्य उपासना केली तर दैनंदिन जीवनातले दोष जाऊ शकतात, म्हणजे जीवनात घडणार्या घटनांचा आणि उपासनेचा प्रत्यक्ष संबंध चालू जीवनाशी आहे. जीवनामध्ये दिसणारी सुबत्ता, विवंचनारहित सुखी जीवन, जीवनातील समाधान आदी गोष्टी या पूर्वसुकृताच्या आहेत; त्या केवळ आपल्या प्राक्तनाने आपल्याला प्राप्त झालेल्या आहेत.
सर्व स्वर्गीय उपभोगीय सुखे जरी माणसाला मिळाली तरी त्याला कर्माच्या जोडाची गरज आहे. मनुष्यजन्म हा ऐश्वर्य उपभोगासाठी मिळालेला नसून, सतत अविश्रांत, अहोरात्र कर्म करीत सात्त्विक जीवनाचा आनंद घेत आत्म्याचे परमात्म्याशी मिलन करण्यासाठी मिळालेले हे जीवन आहे. नावलौकिक, कीर्ती, पैसा, प्रापंचिक सुख, व्यावसायिक सुख आदींच्या मागे लागून कर्मदोषच मागे लागणार आणि जीवन उन्नत होणार नाही.
नारदमुनींनी म्हणूनच तर वाल्या कोळ्याला नामस्मरणास बसविले आणि त्याचे जीवन अत्युन्नत करून दिले. स्वर्गोपभोगीय सुखासाठी प्रयत्न करणे यासाठी जीव जन्माला आलेला नसून ईश्वर साधनेमध्ये तन्मयतेने प्रगती करणे आणि गुरूच्या मार्गदर्शनाखाली आपला आध्यात्मिक विकास करणे, हाच खर्या जीवनाचा हेतू आहे आणि म्हणूनच आपत्तीच्या काळामध्ये योग्य कर्म केले तर मानसिक समाधान मिळू लागते.
ज्या वेळी आशा आध्यात्मिक ज्ञानाची अनुभूती येते त्या वेळी असे लक्षात येते, की व्यावहारिक, व्यावसायिक उपजीविकेसाठी मिळालेले ज्ञान हे तुच्छ असून, आध्यात्मिक ज्ञानाची व्याप्ती आणि तृप्ती ही विशाल असून, आगळी वेगळीच आहे.