अनुक्रमणिका

नवनाथ बोधांमृत

नाथपंथाचे दिव्यत्व आणि सामर्थ्य

'नवनाथ भक्तिसार' हा केवळ एक ग्रंथ नसून तो चैतन्याचा साक्षात अविष्कार आहे. भगवान मच्छिंद्रनाथांपासून प्रवाहित झालेल्या या अलौकिक परंपरेचे दर्शन घडवणारा हा ग्रंथ अती श्रेष्ठ, अद्भुत आणि मनाला अंतर्मुख करणारा आहे. सुमारे सव्वा दोनशे वर्षांपूर्वीच्या सत्य घटनांचा आधार घेतलेला हा प्रासादिक ग्रंथ आजही वाचकाला नाथपंतांच्या गूढ आणि सामर्थ्यशाली विश्वाची अनुभूती देतो.

भ्रमांचे निराकरण आणि तत्त्वप्रणाली

समाजामध्ये नाथपंथाविषयी अनेक मत-मतांतरे आणि एक प्रकारची अनाठायी भीती पसरलेली दिसते. मात्र, हा पंथ कडक किंवा भयावह नसून तो विधात्याची (ब्रह्मा, विष्णू आणि महेश) एक सुनियोजित योजना आहे. मानवाच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी स्वतः त्रिदेवांनी या पंथाची निर्मिती केली आहे. कलियुगाच्या विपरीत परिणामांपासून वाचून, भक्तीमार्गाच्या सहाय्याने आपली उन्नती कशी सा साधावी, याचे सविस्तर मार्गदर्शन या ग्रंथात केले आहे. नाथपंथ: एक वैश्विक शक्ती

नाथपंथ हा केवळ मानवी स्तरावरच नव्हे, तर ब्रह्मांडाच्या प्रत्येक स्तरावर कार्यरत आहे. स्वतः भगवान दत्तात्रेय या पंथाचे आराध्य दैवत आहेत. या पंथाच्या कार्यात देवदेवतांपासून ते यक्ष, गंधर्व आणि अदृश्य शक्तींपर्यंत सर्वच सहाय्यभूत ठरतात. दत्तसंप्रदाय आणि नाथपंथ यांच्यातील सूक्ष्म फरक स्पष्ट करतानाच, श्री दत्तात्रेयांनी हा पंथ कसा आखला आणि नवनारायणांना द्वारकेत बोलावून या कार्याची मुहूर्तमेढ कशी रोवली, याचा उलगडा येथे होतो.

अर्पण पत्रिका: सद्गुरु चरणी कृतज्ञता

हा ग्रंथ त्या महान विभूतीला समर्पित आहे, ज्यांनी माझ्यासारख्या कर्महीन व्यक्तीकडून सातत्याने कर्म करून घेतले आणि मला ज्ञानाची नवी दिशा दिली. ज्यांनी व्यवहारज्ञान आणि आध्यात्म यांची सांगड घालून दिली; भक्ती, बुद्धी, चातुर्य आणि कार्य-कारणमीमांसेचे मर्म समजावून दिले.

वेद आणि धर्मग्रंथांची ओढ निर्माण करून, नाथपंथाचा महिमा स्वतः सांगत ज्यांनी या पंथाच्या कार्यपद्धतीचे ज्ञान दिले. विभूतीची सिद्धता कशी करावी आणि तिचा लोककल्याणासाठी विनियोग केव्हा व कसा करावा, हे ज्यांनी शिकवले. मंत्र-तंत्र, ध्यानधारणा आणि उपासना यांचे गूढ ज्ञान देऊन 'जलात असोनी त्या वाचुनिया' (संसारात असूनही अलिप्त) कसे राहायचे, याचा वस्तुपाठ त्यांनी घालून दिला.

सरतेशेवटी, ज्यांनी अद्वैताची प्रचिती देताना म्हटले:

“तू चालला तर मी चाललो, तू बोलला तर मी बोललो. जे तू केले ते मी केले, जे मी केले ते तू केले. मी म्हणजे तू आणि तू म्हणजे मी आहेस!”

असे अभय देऊन ज्यांनी पुढील गुरुकार्याची आज्ञा केली आणि स्वतः दिलेल्या शब्दाप्रमाणे भगवान दत्तात्रेयांची सदेह भेट अनेक अनुयायांसमोर घडवून आणली, त्या माझ्या प्राणात सामावलेल्या सद्गुरु व्यंकटनाथ महाराजांच्या चरणकमली आणि त्यांच्या ओजस्वी-तेजस्वी कार्याला हा ग्रंथ सप्रेम समर्पित…

सद्गुरु व्यंकटनाथांचा चरणरज, नरेंद्र चौधरी ललिता पंचमी, १/१०/२०११