श्री नाथशक्तिपीठ, आकोला Header श्री नाथशक्तिपीठ, आकोला Header

भेट दिलेली पृष्ठे: गुरूंचे महात्म्य

गुरूंचे महात्म्य

गुरुचरित्र ग्रंथाचा अभ्यास केल्यास असे लक्षात येते की संपूर्ण चरित्राचा प्रमुख उद्देश गुरुभक्ती करणे आणि गुरुसेवा करणे हाच आहे. सद्य जन्मात आपल्याला परमेश्वराचे अस्तित्व आणि ईश्वरी सत्ता अनुकूल करून घ्यायची असेल तर गुरु हेच माध्यम आहे. गुरुशिवाय हा उद्देश साध्य होऊ शकत नाही. म्हणून प्रत्येकाने गुरूंचा ध्यास धरावा व गुरु लाभावेत म्हणून गुरुचरणी प्रार्थना करावी.

गुरुचरित्राच्या प्रत्येक कथेतून आपल्याला काही ना काही संदेश दिलेला आहे—कुठेतरी ज्ञान देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो संदेश काय आहे हे अभ्यासपूर्वक शोधणे आवश्यक आहे.

भगवान दत्तात्रेय सांगतात की श्रीगुरूंचा महिमा अगाध आहे. ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर—या तिन्ही देवतांनी मनुष्यरूप धारण करून केलेली लीला अगाध आहे. त्याचे वर्णन करण्याची क्षमता माझ्यात नाही. असा हा गुरुचा अवर्णनीय अवतार आहे.


गाणगापुरी येथे श्रीगुरूंचे वास्तव्य असताना अनेक लीला घडल्या. त्यांची ख्याती सर्वत्र पसरली. अनेक लोक दर्शनासाठी येऊ लागले. काहींच्या मनोकामना पूर्ण होत होत्या— - कुणी गरीब धनवान झाला, - कुणी अपत्यहीनाला पुत्रप्राप्ती झाली, - व्याधी नष्ट होऊन आरोग्य लाभले, - अंधांना नेत्र, बहिर्‍यांना श्रवणसुख मिळाले.

श्रीगुरुदर्शनाने व श्रीगुरुकृपेने हे सहज शक्य आहे.


अशाच एका घटनेंपैकी ही एक घटना —

माहूरला एक धनिक ब्राह्मण राहत होता. त्याचे नाव गोपीनाथ. त्याला पुत्रसंतती जगत नव्हती. त्यांनी श्रीदत्तांची आराधना केली. नंतर त्याला एक पुत्र झाला. त्याचे नावच त्यांनी दत्त ठेवले.

पाचव्या वर्षी मौंजी बांधली. बाराव्या वर्षी त्याचा विवाह झाला. दोघे पती–पत्नी अत्यंत प्रेमाने राहत होते.

सोळाव्या वर्षी त्या मुलाला आकस्मात रोग झाला. त्याला अन्न खाता येईना. पत्नीचे त्याच्यावर इतके प्रगाढ प्रेम की—नवर्‍याला दिलेले औषध ती स्वतः ग्रहण करीत असे.

पत्नीला आपल्या संस्कृतीत अर्धांगी म्हटले आहे. या दृष्टीने ही पातिव्रता किती सार्थ होती हे कळते. अशी तीन वर्षे गेल्यावर त्याला क्षय झाला. पतीसह पत्नीही क्षीण होत गेली. देहाला दुर्गंध येऊ लागल्याने कुणी जवळ येत नव्हते. परंतु पत्नी अखंड सेवा करीतच होती.

घरचे धनिक असल्यामुळे औषध पाण्याचा अभाव नव्हता; दैवी उपायही सतत होत होते— यज्ञ, याग, जप, तप, ब्राह्मण भोजन, देश–विदेशची औषधे—परंतु काही उपयोग होत नव्हता.

कुलगुरूंना विचारल्यावर ते म्हणाले— “आता परमेश्वरावरच भार टाका. मानवी प्रयत्नांची पराकाष्ठा झाली आहे.”

हे ऐकून त्याच्या माता–पित्याला आकाश कोसळल्यासारखे वाटले. त्यांनी आक्रोश केला— “हे दत्ता! तुझ्या कृपेने एकच मुलगा वाचला; त्याचे असे हाल पाहून आम्हीही जीव देऊ.”

त्यांचा आक्रोश ऐकून पुत्राने आपल्या पत्नीला म्हटले— “माझ्या नशिबी तुझ्यासारख्या सुशील, गुणवती पत्नीशी संसार करण्याचा एवढाच योग होता. माझ्यामुळे तुलाही बाध आली.”

हे ऐकून पत्नीला मूर्च्छा आली. काही वेळाने पतीच्या चरणी नमन करून ती म्हणाली— “असे कसे म्हणता? तुम्ही आणि मी भिन्न नाही. जिथे तुम्ही, तिथे मी. कुठेही तुम्ही असाल, मी सोबतच असेन.”

तिने सासू–सासर्‍यांना विनंती केली— “मी माझ्या पतीला काही होऊ देणार नाही. परमेश्वर माझी विनंती ऐकेल. आम्हाला गाणगापूरला पाठवा. तेथे श्री नृसिंह सरस्वती राहतात. त्यांच्या दर्शनाने अनेक व्याधी निवारण झाल्याचे ऐकले आहे.”

सर्वांनी सम्मती दिली, आशीर्वाद दिला, आणि ती आपल्या व्याधिग्रस्त पतीसह गाणगापूरला निघाली.

काही काळाने ती तेथे पोहोचली— पण प्रवास श्रमाने किंवा इतर कारणाने त्याचे प्राणोत्क्रमण झाले.

ती श्रीगुरूंची चौकशी करू लागली. लोक म्हणाले— “श्रीगुरू संगमावर गेले आहेत.”

पतीचे प्राण गेल्याचे पाहून ती आकांत करू लागली—

“देवा! गाईला गांजण्यात काय मोठेपण? रक्षणकर्ते म्हणून आलो तर असे दुःख का? दर्शनाला देऊळात जावे आणि देऊळच अंगावर पडावे काय? तहान लागली म्हणून गंगेचे पाणी प्यायला जावे आणि सुसरीने खाऊन टाकावे काय?

मी माझ्या पतीला आई–वडिलांपासून दूर आणले; ही वार्ता कळली तर तेही मरतील. मला तीन हत्या केल्याचे पाप लागेल!”

असा ती दुःखप्रलाप करत असताना तिथे एक साधू आला. त्याच्या सर्वांगावर भस्म होते. हातात त्रिशूल व रुद्राक्षमाला होती.

तो म्हणाला—

“का रडतेस? मनुष्याच्या नशिबात जे लिहिले ते घडतेच. कर्मानुसारच सर्व होते. व्यर्थ शोक करू नको. सगळेच आले तसे जाणार. हे केवळ माया–मोह आहे.

“जीवन हे पाण्यावरच्या बुडबुड्यासारखे आहे. सत्त्व–रज–तम या गुणांनुसार कर्मे घडतात. काळ हा कारण असतो. काळानुसार कर्म घडते, आणि कर्माच्या स्वाधीन देह असतो—म्हणून तो अस्थिर आहे.

पंचमहाभूतांतूनच देहाची निर्मिती झाली— त्वचा, शिरा, मांस, रक्त, मेद, मज्जा, विष्ठा, मूत्र, श्लेष्म, अस्थी— या सर्व धातूंनी बनलेला देह अपवित्रच आहे.

म्हणून शोक करू नको. त्याऐवजी तुझा उद्धार कशात आहे, याचा विचार कर.” असे ३०व्या अध्यायात** सांगितले आहे.