श्रद्धेच फळ
गुरुचरित्र अध्याय ४० : श्रद्धेची शक्ती आणि सद्गुरूंचे तत्त्व
गुरुचरित्राच्या ४० व्या अध्यायात श्रीगुरू अत्यंत महत्त्वाचे तत्त्व सांगतात — जो साधक एकनिष्ठेने गुरुची सेवा करतो, त्याच्यावर गुरुची कृपा निश्चित होते.
हे सांगताना ते एक व्यवहारातील सूत्र देतात—
“मंत्रे तीर्थे द्विजें देवे दैवज्ञे भेषजे गुरौ, या दृष्टि भावनाकुर्यात सिद्धिर्भवति तादृशी।”
म्हणजे— ज्या मंत्राबद्दल, ज्या तीर्थाबद्दल, ज्या ब्राह्मणाबद्दल, देवाबद्दल, ज्योतिषाबद्दल, वैद्याबद्दल आणि गुरुंबद्दल जशी श्रद्धा ठेवली जाते, तसंच फळ मिळतं.
आपण मंत्र म्हणत असू, तीर्थ घेत असू, धर्माचरण करत असू— या सर्व ठिकाणी विश्वास असला की परिणाम निश्चित चांगला होतो. जिथे शंका आहे, तिथे फल नाही.
गुरूंबाबतही हेच तत्त्व आहे— गुरूंनी सांगितलेल्या गोष्टीवर अविश्वास ठेवू नये, नको तिथे चिकित्सक बुद्धी लावू नये. तर्कवादी वृत्ती अध्यात्मात अडथळा ठरते.
श्रद्धा मनापासून असेल तर आत्मिक शक्ती वाढते, आणि मन सहज साध्य होतं— हे खुद्द भगवान दत्तात्रेय सांगतात.
गोष्ट – शबर आणि त्याची निष्ठा
श्रीगुरू या संदर्भात एक कथा सांगतात.
पूर्वी “पांचाल” नगरावर सिहेकेतू असा राजा राज्य करीत असे. त्याचा पुत्र धनंजय एकदा शिकार करताना दुरवरच्या निर्जन जंगलात पोहोचला.
तहान लागली होती. पाणी शोधत फिरताना एक जीर्ण–शीर्ण शिवमंदिर दिसले. भोवती विखुरलेली लिंगाकार शिळा. राजकुमार आणि त्याच्यासोबत असलेला शबर — दोघेही शिवभक्त.
शबराने एका दगडाकडे पाहून तो उचलला आणि म्हणाला—
“हे लिंग उत्तम आहे. तुम्ही माझे गुरु व्हा आणि पूजेचा विधी सांगा!”
धनंजयाने त्याला लिंगपूजेचा सर्व प्रकार सांगितला. नैवेद्यासाठी मात्र सांगितले—
“रोज स्मशानातील भस्म आणि घरातील स्वयंपाकातील पदार्थ अर्पण कर.”
शबराची नितांत गुरूभक्ती होती. गुरूंनी सांगितले तसेच करायला तो सदैव तयार.
काही दिवस सर्व छान चालले. एकेदिवशी स्मशानात भस्म मिळेनासे झाले. पंचक्रोशी फिरूनही तेच.
तो निराश होऊन घरी आला आणि पत्नीला म्हणाला—
“अर्धवट पूजा झाली. गुरूंच्या आज्ञेचे उल्लंघन करणे म्हणजे अखंड दु:ख!”
पत्नी शांतपणे म्हणाली—
“चिंता करू नका. आज नैवेद्यासाठी भस्म मी देते.”
पतीची गुरूनिष्ठा आणि पत्नीची पतीभक्ती — दोघांच्याही मनात शंका नव्हती.
शबरी म्हणाली—
“माझा देह दहन करा आणि नैवेद्याला अर्पण करा. तुमच्या कार्यात माझा देह कारणी लागणे हे माझे पुण्यच आहे.”
शबर मन कडक करून तयार झाला. पत्नीचे दहन केले. त्याने पूजा, आरती, नैवेद्य केले.
पूजा संपल्यावर पत्नीला हाक मारली—
“प्रसाद घे!”
आणि आश्चर्य — शबरी समोर उभी!
तो अचंबित—
“तू तर भस्म झाली होतीस!”
शबरी म्हणाली—
“मला काय ठाऊक? हे देवाचेच कृत्य.” श्रद्धेने महादेव प्रसन्न झाले. अशी निष्ठेचे अनंत फळ मिळते—असे श्रीगुरू सांगतात.
श्रद्धेविरुद्ध — बुद्धिवाद
आजचा मनुष्य म्हणेल—
“भस्म नाही? तर दुसरे काही अर्पण करा!”
हेच तर्क, हेच बुद्धिवाद श्रद्धेला मारक ठरतो. जुष्टतेने केलेली पूजा निष्फळ होते.
आपण देवासमोरही मोदक नसेल तर पेढ्याचा मोदक करून ठेवतो. हे उपयोजित तर्क आहे. पण आध्यात्मिक व्यवहारात जाणत्याचे वचन पाळण्यातच हित आहे.
अध्यात्मात “कसे?”, “का?” हे प्रश्न नाहीत— अंतःकरणातील निष्ठा हेच उत्तर आहे.
जो आपल्या अंतःकरणाची भाषा ऐकतो तो कधीही जीवनात चुकत नाही.
निष्ठा म्हणजे पूर्ण समर्पण
गुरू सांगतील ते— संशयाशिवाय, मत–मतांतर न करता पालन करणे.
मनात शंका ठेऊन, निरनिराळ्या प्रश्नांनी ग्रस्त होऊन गुरूसान्निध्यात राहणे म्हणजे स्वतःचीच फसगत.
गुरु नकोच वाटत असतील तर असा गुरु करणेही चुकीचे.
पूर्तीची वेळ – आणखी एक प्रसंग
एक प्रसंग व्यंकटनाथ महाराजांच्या जीवनातील—
काही शिष्य आणि गुरुबहिणीसोबत रात्री अमरावतीहून नागपूरला कारने जाताना कारंजा घाटात दरोडेखोरांनी गाडी अडवली.
सूर्या, भाले, काठ्या हातात.
ते धमकावू लागले—
“जवळचे सर्व पैसे–दागिने द्या!”
सगळे महाराजांकडे पाहू लागले.
महाराज शांतपणे म्हणाले—
“जवळ आहे ते सर्व द्या.”
गुरु आज्ञा म्हणून त्यांनी सर्व दिले.
पुढे काही अंतर गेल्यावर दुसरी टोळी गाडी थांबवते. हे खरे दरोडेखोर.
त्यांनी विचारले—
“आम्ही लुटायचा विचार केला होता, पण तुमच्याकडे काहीच नाही?” ते पुढे गेले.
थोड्या वेळाने पहिलेच दरोडेखोर परत आले— गाडी समोर थांबवली.
हात जोडून म्हणाले—
“हे पैसे–दागिने परत घ्या. हे केले नसते तर तुमचा जीव धोक्यात होता. आता पुढे काही होणार नाही. जात रहा.”
महाराजांच्या वचनावर पूर्ण विश्वास ठेवला म्हणून सर्व काही सुखरूप गेले.
ही श्रद्धेची आणि निष्ठेची शक्ती.
नाथ परंपरेचे वारस
व्यंकटनाथ महाराज हे नाथपंथातील मच्छिंद्रनाथांपासून अखंड चालत आलेल्या पंधरावे नाथ.
त्यांचे संपूर्ण जीवन जनकल्याणासाठी अर्पण.
त्यांच्याच आज्ञेने नाथ शक्तिपीठातून गेल्या ३० वर्षांपासून उज्ज्वल गुरुकार्य सुरू आहे.