जीवनात स्थित्यंतर गुरुच करतात
रामजन्मापूर्वीच रामायण लिहिले गेले. रामायण लिहायला वाल्या कोळीचा वाल्मिकी ऋषी नारदांनी बदल केला. अध्यात्मिक चरित्रातील ही एक मोठी घटना आहे—एक सामान्य जीवाच्या जीवनात ब्रह्मर्षी नारदांनी घडवलेले स्थित्यंतर.
एक सामान्य माणूस—आजच्या भाषेत जणू लुटेरा—धर-पकड, मार आणि लूट हा त्याचा जीवनक्रम. नारदांनी तो कसा बदलला हे पुढील कथानकातून लक्षात येईल.
वाल्याच्या जीवनात नारदांनी जे स्थित्यंतर घडवले, ते पंचमहाभूतांवर सत्ता असलेलेच करू शकतात. कोणत्याही जीवाच्या जन्मानंतर त्याच्या प्रारब्धात किंवा प्राक्त्यात बदल करणे सहसा शक्य नसते. जसा जीव जन्मतो, ज्या प्रारब्धाने जन्मतो—तसाच त्याचा जीवनक्रम घडत असतो.
मागील पुण्यसंचय चांगला असला, प्रारब्ध चांगले असले, तरी गतजीवनातील गोष्टींमुळे सद्यजीवन दुःखदायी होऊ शकते. परंतु सद्गुरू किंवा पंचमहाभूतांवर सत्ता असलेलेच जीवाच्या सद्य जीवनातील योग आणि भोग बदलू शकतात.
प्रभू रामचंद्रांच्या अवतारापूर्वी अनेक वर्षे आधीच वाल्मिकी ऋषींनी संपूर्ण रामायण लिहून ठेवले होते. रामजन्मानंतर आपण वाचतो तसे रामचरित्र—ते संपूर्ण वाल्मिकी ऋषींनी पूर्वीच अचूक लिहिले होते.
तो वाल्मिकी ऋषी जन्मतः तपस्वी नव्हता— तो वाल्या कोळी, एक सामान्य माणूस होता. त्याच्या चालू जीवनातील योग बदलून नारदांनी त्याला वाल्या कोळीपासून महर्षी वाल्मिकी बनवले.
म्हणजे ब्रह्मांडात घडणाऱ्या घटना पूर्वनियोजित असतात, त्यानुसारच जीवनातील योग घडतात. योग्य स्थित्यंतर करणारा भेटला तर पुढील जन्माचे भोग कमी होऊन जीव लवकर प्रगत होऊ शकतो. हे स्थित्यंतर फक्त सद्गुरू किंवा पंचमहाभूतांवर सत्ता असलेले ब्रह्मर्षीच करू शकतात.
साधारणतः प्रारब्धातील बदल हा सृष्टिनिर्मितीच्या तत्त्वाशी संबंधित असल्याने ज्यांची पंचमहाभूतांवर सत्ता आहे तेच हा बदल करू शकतात.
सर्व पंथांमध्ये असे सामर्थ्य नसते; नाथपंथ हा सृष्टिनिर्मितीच्या तत्त्वाशी नित्य जोडलेला पंथ आहे. अशा प्रकारची स्थित्यंतरे नाथपंथ करीत आला आहे आणि ही त्यांच्या पंथाची एक वैशिष्ट्यपूर्ण शक्ती आहे.
नारदांनी वाल्याच्या जीवनात बदल कसा केला— ही कथा भारताच्या धार्मिक-सांस्कृतिक इतिहासात प्रसिद्ध आहे:
वाल्मिकी ऋषी हे पूर्वाश्रमी वाल्या कोळी होते— वाटमारी, लूटमार हा त्यांचा व्यवसाय. पाप–पुण्याचा विचार न करता हा उपद्व्याप चालू होता.
ब्रह्मर्षी नारदमुनींच्या लक्षात ही गोष्ट आली. वाल्याचे प्रारब्ध चांगले, पूर्वसुकृत चांगले—मग तो जन्ममृत्यूच्या फेर्यात अशा मार्गावर का अडकला?
ह्याची जाणीव करून देण्यासाठी नारदांनी ब्राह्मणाचे रूप घेऊन त्याच्या समोर उभे राहिले.
वाल्याने त्यांना पकडले; तो ब्राह्मण म्हणाला— “तू मला मारू नको. तुला जे पाहिजे ते देईन. पण एका प्रश्नाचे उत्तर दे— तुझ्या या व्यवहारातून तुला जे पाप मिळते, त्यात तुझ्या बायकोला अर्धा हिस्सा मान्य आहे का?”
त्याने म्हटले—“मान्य आहे.”
परंतु नारदांनी सांगितले—“प्रत्यक्ष जाऊन तिलाच विचार.”
तो घरी गेला. पतीने विचारताक्षणी पत्नी म्हणाली— “ह्यांच्या कृतीतून घडणाऱ्या पापाशी माझा संबंध नाही. हे जे आणतात त्यावर मी प्रपंच चालवते.”
हे ऐकून वाल्या कोळी विचारात पडला. मन उद्विग्न झाले आणि तो नारदाकडे परत आला—
“मी काय करू? हे सर्व तर पत्नी–कुटुंबासाठी करत होतो.”
नारद म्हणाले— “‘राम राम’ जप कर. सर्व आपोआप होईल.”
पण त्याला ‘राम राम’ म्हणता येईना. मग नारद म्हणाले— “तू ‘मरा मरा’ म्हण.”
‘मरा मरा’ म्हणता म्हणता ‘राम राम’ आपोआप होऊ लागले. तो तपात इतका तल्लीन झाला की किती वर्षे गेली ते समजले नाही. तो वारुळात लुप्त झाला.
तोच वाल्या कोळी महर्षी वाल्मिकी झाला.
त्यांच्या तपश्चर्येने ते इतके सामर्थ्यवान झाले की त्यांनी प्रभू श्रीरामचंद्रांच्या जन्मापूर्वीच संपूर्ण रामायण लिहिले.
ही कथा भारतीय इतिहासाचा दाखला आहे. भारतीय संस्कृतीची परंपरा आहे. अनेक वाङ्मयांतून याचे पुरावे मिळतात.
वाल्या कोळीचे जीवन दाखवते की— ज्याच्याकडे पंचमहाभूतांवर सत्ता आहे, तोच जीवाच्या जीवनात चित्त, वृत्ती, प्रवृत्ती, आसक्ती, भोग आणि योग—हवे ते स्थित्यंतर करू शकतो.
सर्वच गुरुसंस्था हे करू शकतात असे नाही. इतिहास सांगतो की— - विष्णूने ज्ञानेश्वरांचा अवतार घेतला - ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या मुखातून वेद वदवले - प्रेताला जिवंत केले ही स्थित्यंतरे ह्याच प्रकृतीची आहेत. असे गुरु भेटले तर जीवाचा भोग कमी होऊन उद्धार लवकर होऊ शकतो. नाथपंथ हा सृष्टिनिर्मितीचा एक भाग असून अजूनही अखंड गुरु परंपरेने हे कार्य करीत आहे. जय श्रीराम — जय श्रीराम — जय श्रीराम**