श्री नाथशक्तिपीठ, आकोला Header श्री नाथशक्तिपीठ, आकोला Header

नाथ पंथाला अशक्य काहीच नाही

एकदा गोरक्षनाथ आणि शंकरांचे मानसपुत्र वीरभद्र यांच्यात युद्ध सुरू झाले. वीरभद्र देव, यक्षिणी, गण यांच्यासह युद्धात उतरला. गोरक्षनाथ मात्र एकटेच लढाईस सामोरे गेले.

राक्षसांना पुनर्जीवित करणारी अद्भुत विद्या

गोरक्षनाथांनी त्यांच्या बाजूने लढण्यासाठी पूर्वी मृत झालेल्या रावण, कुंभकर्ण, मेघनाद इत्यादी सर्व राक्षसांना पुन्हा जिवंत केले. घनघोर युद्ध सुरू झाले.

हे राक्षस पुन्हा जागे झालेले पाहून विष्णू घाबरला. तो गोरक्षनाथांना म्हणाला:

“या एकेका राक्षसाला मारण्यासाठी आम्हाला अवतार घ्यावे लागले. आता तू त्यांना परत उठवलेस. हे सर्वथा अनुचित केलेस. त्यांना पुन्हा नाहिसे कर.”

गोरक्षनाथ व महादेव यांच्यातील निर्णय

गोरक्षनाथ विष्णू आणि शंकरांना म्हणाले:

“मी या सर्व वीरांना भस्मसात तर करीन, पण त्यांच्याबरोबर वीरभद्र आणि अन्य देवसैन्यही नष्ट होईल.”

दुसरा काही उपाय न दिसल्याने नाईलाजाने शंकरांनी होकार दिला. गोरक्षनाथांनी मग सर्व सैन्य जाळून भस्मसात केले.

वीरभद्राच्या मृत्यूने शंकर व्यथित

आपला मानसपुत्र वीरभद्र गेला हे पाहून शंकर दुःखाने मुक रुदन करू लागले. ते पाहून गोरक्षनाथांनी विचार केला:

“अरेरे! काय केले मी? बद्रिकाश्रमात लहानपणी ज्यांनी माझे पालनपोषण केले त्या दयाळू शंकरांना मी आज दुःख दिले.”

गोरक्षनाथ शंकरांना म्हणाले:

“स्वामी! जर काही उपायाने तुम्ही मला वीरभद्राच्या अस्थी या राखेतून ओळखून दिल्यात तर मी संजीवनी विद्येने त्याला पुन्हा जीवंत करीन.”

वीरभद्राच्या अस्थींची ओळख

शंकर युद्धभूमी फिरू लागले. मृत वीरांची हाडे कानाशी लावून पाहू लागले. ज्या ठिकाणी वीरभद्र धारातीर्थी पडला होता त्या हाडांना कानाशी लावताच त्यातून:

“शिव… शिव…” असा नाद उमटलेला त्यांना ऐकू आला.

शंकर गोरक्षनाथांना म्हणाले:

“माझे सर्व गण शिवमय झालेले आहेत. माझ्या शिवनामापलीकडे त्यांना दुसरे नाम ठाऊक नाही. ह्याच वीरभद्राच्या अस्थी.”

पुनर्जन्म — संजीवनी विद्येची महिमा

गोरक्षनाथांनी मग वीरभद्राला पुन्हा जीवंत केले.

भक्तीचा आदर्श आणि नाथपंथाचे सामर्थ्य

भक्ती ही शिवगणांसारखी असावी. श्वासाश्वासातून, रोमारोमातून शिव हाच एक ध्यास उमटला पाहिजे. जिवंत असताना नव्हे तर मेल्यानंतरही शिवनामाची अवीट गोडी दरवळली पाहिजे.

सामर्थ्य, चातुर्य हे नाथपंथीय गुरुंसमान असावे, ज्यामुळे देवाधिदेव भगवान शंकरांनाही अशक्य तेही सहज करता यावे.


अध्यात्मिक-वाटचाल/गुरूमहिमा/नवनाथ/नाथ-पंथाला-अशक्य-काहीच-नाही.txt was सर्वात शेवटचा बदल: on 18-Dec-2025 (13:50)