श्री नाथशक्तिपीठ, आकोला Header श्री नाथशक्तिपीठ, आकोला Header

भेट दिलेली पृष्ठे: दत्त जन्म

दत्त जन्म

अनुसया मातांची सत्त्वपरीक्षा

गुरुचरित्राच्या चौथ्या अध्यायात दत्त जन्माची कहाणी वर्णिली आहे. अनुसया माता ही अति तेजस्वी पतिव्रता आहे. म्हणून तिचे तेज हरण करण्याच्या उद्देशाने, सत्त्व हरण करण्याच्या दृष्टीने, ब्रह्मा–विष्णू–महेश ब्राह्मणाचे रूप घेतात आणि तिची सत्त्वपरीक्षा पाहतात. हा प्रसंग सर्वांच्या वाचण्यातला आहे. इथे सर्वांनी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की देवी आणि देवता स्त्रीलिंगी–पुल्लिंगी ही मानवी कल्पना आहे; देवांमध्ये असला कोणताही भाव नसतो. अनेकविध ब्रह्मांडातील योजनेनुसार देवी–देवतांचे वर्णन केले आहे; माणसांमध्ये होतात तसे व्यवहार त्यांच्यात होत नाहीत.

ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे कार्य म्हणजे उत्पत्ती, स्थिती आणि लय. त्यामुळे जी कोणती व्यक्ती देवतत्त्वाजवळ येऊन प्रखर तेजाची होऊ लागते, त्या वेळेस हे त्या व्यक्तीची सत्त्वपरीक्षा घेतात. सत्त्वपरीक्षा म्हणजे नैतिक मूल्य नव्हे; तर अंतःकरण किती शुद्ध, निर्मळ, निष्कलंक आहे हे पाहणे हा उद्देश असतो. सात्त्विक, पवित्र अंतःकरण आणि प्रांजळ भक्तीभाव—यालाच देवतत्त्व म्हणतात.

चरित्रातील प्रसंगात जरी असे म्हटले आहे की “विवस्त्र होऊन आम्हाला इच्छा भोजन दे”; परंतु त्यात अशा कोणत्याही विचारांचा लवलेश नव्हता. तिचे रूप, शरीर किंवा सौंदर्य यांचा विकारयुक्त उद्देश नव्हता.

ज्ञानदेवांनी दाखवलेला दृष्टिकोन

ज्ञानेश्वरांच्या काळातील एक उदाहरण सांगतो: चांगदेव ज्या वेळी वाघावर बसून हवेतून आपल्या सामर्थ्याने ज्ञानेश्वरांच्या दर्शनाला आले, त्यावेळेला ज्ञानेश्वर आणि भावंडे गावाबाहेरच्या पडक्या भिंतीवर बसलेली होती. ज्ञानेश्वरांनी त्या भिंतीला थाप मारली आणि म्हणाले, “चल बाई, एवढा मोठा योगी आला आहे; त्याच्या दर्शनाला जाऊ.” निर्जीव वस्तूवरची ज्ञानेश्वरांची सत्ता पाहून चांगदेवांनी शरणागती पत्करली.

एकदा सर्व लोक नदीवर स्नानासाठी गेले असता मुक्ताबाईचे वस्त्र खाली पडले. चांगदेवांनी आपले डोळे हातांनी झाकले. त्यावर ज्ञानेश्वर म्हणाले, “अजून हे कच्चे मडकं आहे; शरीरभावना गेलेल्या नाहीत. हा कसा पूर्ण योगी होईल?” ज्ञानेश्वर म्हणजे स्वतः विष्णूंनी नाथपंथातील गुरुशिष्य परंपरेत गुरुंची सेवा करण्यासाठी घेतलेला ज्ञानदेवावतार होय. या विष्णूंनी एका योग्याचा स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन दाखवला होता.

दत्तावताराचे ईश्वरी रहस्य

गुरुचरित्रातील प्रसंग जरी भूमीवर घडत असला तरी तो ईश्वरी पातळीवरचा होता; तो मनुष्यदृष्टिकोनातून समजणे चुकीचे ठरेल. पुढे अनुसया मातेच्या पूर्ण स्वच्छ, निर्मळ, निष्कलंक अंतःकरणामुळे देवांना स्वतः बालकाचे रूप धारण करावे लागले.

ब्रह्मा–विष्णू–महेश ज्यांनी ब्रह्मांड निर्माण केले, त्यांना या प्रसंगाची पूर्वकल्पना नव्हती—ही कल्पना करणे हे शुद्ध मूर्खपणाचे ठरेल. तसेच अनुसया मातेचे पती अत्री मुनी यांच्या सामर्थ्याचा देवांना पत्ता नव्हता, हीदेखील चुकीची कल्पना आहे.

त्यांनी जे तत्त्व दाखवले ते हेच की मनुष्यदेह असला तरी, जेव्हा तो ईश्वरतुल्य होतो, तेव्हा देवांनाही आपले देवत्व विसरून त्याच्याशी समरस व्हावे लागते.