कर्माच्या आधारे प्रारब्ध बदलते नाथशक्तिपीठ
☼ आपले प्रारब्ध काय आहे? ☼ जीवाचा भोग, प्रारब्ध — प्रारब्ध ह्याचा अर्थ जे जन्मोजन्मीचे संचित कर्मफळ आहे ते.
गर्भस्थ पिंड आणि पूर्वसंचित
गर्भ ज्या वेळी प्रस्थापित होतो, त्याच वेळी त्या गर्भात सूक्ष्मरूपाने पिंड असतो. जे गुणदोष, सुख, शांती, समाधान, कष्टप्रद जीवन आदी योग आई-वडिलांचे असतात, तेच व तेवढेच योग बालकांचे असतात असे नाही; तर त्याचे जे जन्मोजन्मीचे संचित कर्मफळ आहे त्याप्रमाणे ते प्रस्थापित होते.
आपल्या जीवनातील आपल्या चित्तवृत्ती–प्रवृत्तीमध्ये बदल करणे हे सोपे नाही, किंबहुना ते केवळ अशक्यच आहे. आपले योग, भोग, प्रारब्ध बदलणे हे अशक्य आहे. जे योग–भोग आपल्या वाट्याला आले आहेत ते भोगावेच लागतात.
म्हणूनच आपण दैनंदिन जीवनात म्हणतो— “काय करणार, हेच तर माझं नशीब आहे. माझं नशीब बदलणं शक्य नाही. काय करणार, माझा हा जन्म असाच जाणार.”
वाल्या कोळ्याचा दैवयोग
वाल्या कोळ्याचा जीवनप्रवाह प्रारब्धाप्रमाणे सुरू झाला होता. त्रिकालज्ञानी ब्रह्मर्षी नारदमुनी मध्ये पडले आणि स्वतःहून ब्राह्मणाचा वेष घेऊन वाल्या कोळ्याला भेटले. त्याचे पूर्वसंचित लक्षात घेऊन त्याला विवेक आणि ज्ञान दिले आणि पुढील कुकर्मापासून वाचविले.
एवढेच नाही तर त्याच्यावर कृपा करून त्याला आत्मज्ञानी केले आणि अलौकिक कार्य करवून घेतले. हा त्याचा दैवयोग होता.
प्रारब्ध सहज टळत नाही
प्रत्येक जण ‘प्रारब्ध माझे सहसा टळेना’ ह्याची अनुभूती घेतो. तो आपले दुःख वा भोग दाखवत नाही; पण मनाने त्यातच गुरफटलेला असतो. यातून बाहेर पडता येत नाही. दैनंदिन जीवन त्या प्रारब्धासह सुरू होते आणि त्यानुसारच संपते.
माणसाचे आचारविचार, स्वभाव, योग, भोग—हे सर्व त्याने केलेल्या पूर्वजन्मीच्या कर्मांशी संबंधित असतात.
समर्थ रामदास स्वामी म्हणतात— “अनंत जन्मींचे पुण्य जोडे तरीच परमार्थ घडे।”
एका जन्मात संपूर्ण बदल अशक्य
ह्या एका जन्मातील कर्मांनी आपले संपूर्ण पूर्वसंचित बदलणे शक्य नाही. आचारविचार–स्वभाव बदलणे अतिशय धीम्या गतीने होते आणि अनेक जन्मांनी त्यात बदल दिसतो.
आपण कल्पना करतो—“ह्याच जन्मात सर्व बदलून टाकू”, पण ते अशक्य आहे.
स्वभाव बदलत नाही. विचार बदलत नाही. म्हणूनच जीवनात अनेक अप्रिय घटना घडतात; विकासाला मर्यादा येतात.
“जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही” हे सर्वज्ञात आहे.
पुण्यात्मा कसा घडतो?
अनेक जन्मात थोडा थोडा बदल होत होत, एक दिवस जीव पूर्णपणे — सदाचारी, सद्प्रवृत्त, सात्त्विक, आध्यात्मप्रवण होतो.
तेव्हाच तो पुण्यात्मा जन्माला येतो. नंतर जसे प्रयत्न करेल तसे त्याला ईश्वरी कृपेचा परमलाभ मिळतो.
“ह्याचि देहीं ह्याचि डोळां, झालो मी परमेश्वर वेडावेल्हाळा” — हे केवळ अशक्य.
चमत्कार करणारे आणि आध्यात्म
समाजात अनेक लोक स्वतःला आध्यात्मिक, सामर्थ्यसंपन्न भासवितात. चमत्कारही करतात. पण ते कुणालाही पूर्णतः सद्गुणी, सात्त्विक, आध्यात्मप्रवण बनवू शकत नाहीत.
मानवी जीवनात शरीर–मन कसे घडते, बिघडते, हे आपल्याला कळतही नाही. आपण आयुष्यभर मानतो की— “मी माझ्या जीवनाला आकार देतो.”
पण शरीर कोणाच्या सत्तेने चालते? कोणत्या अज्ञात प्रभावामुळे ते कार्यरत असते? याचा आपण विचारच करत नाही.
तुकाराम महाराज म्हणतात— “चाले हे शरीर कोणाचिये सत्तें, कोण बोलविते हरीविण।”
प्राचीन संस्कृतीपासून दुरावा
आजच्या प्रगत युगात आपली प्राचीन संस्कृती विसरली जात आहे. आध्यात्मिक पद्धतीने जीवन सुसह्य होऊ शकते—हे आपण विसरत आहोत.
जीव देहत्यागापर्यंत मानसिक–आत्मिक समाधानासाठी तडफडत असतो; पण ते पूर्ण न होताच आयुष्याचा अंत होतो. ही जाणीव फक्त त्या व्यक्तीला असते; इतर मात्र गुणगान करतात.
प्रारब्ध ओळखूनही उपाय न करणे
आपल्याला योग–भोगाचे अनुभव येतात. कधी कधी समजतातही. पण योग्य अर्थ लावत नाही; उपाययोजना करत नाही; किंवा काय करावे हेच कळत नाही.
शेवटी आपण म्हणतो— “हेच माझे नशीब, हेच प्रारब्ध — बदलणार नाही.”
कर्माने प्रारब्ध बदलते
आपले योग–भोग–प्रारब्ध हे कर्माच्या माध्यमातून बदलता येते. कर्महीन माणूस पतीताप्रमाणे जीवन घालवतो. परंतु ज्याला जाणीव झाली, किंवा गुरूंचे मार्गदर्शन मिळाले, त्याचे जीवन बदलते.
प्रारब्ध बदलू लागते. जीवन उन्नत होते. ही अनुभूती सर्व सद्गुरू शिष्य घेत असतात.
अनुभवाचे महत्त्व
“अनुभवाविन ज्ञान नसे हो, अनुभव हाच गुरू.” त्यास्तव योगी व्यंकटनाथा आपण नित्य स्मरूं।
“कसा सांगू मी अनुभव ज्याचा, त्याने तो घ्यावा। जन्मा येऊन शुष्क राहणे मार्ग न हा बरवा।”