श्री नाथशक्तिपीठ, आकोला Header श्री नाथशक्तिपीठ, आकोला Header

सत्कर्म केल्याने परिस्थिती सुधारते

अध्याय 42 वा अनंतव्रत महात्म्य

गुरुचरित्राच्या 42व्या अध्यायामध्ये पांडवांचे गेलेले राज्य परत मिळण्यासाठी कृष्णाने केलेल्या उपाययोजनेचे वर्णन केले आहे पांडवां सारख्या अति पराक्रमी सत्शील धर्मनिष्ठ सदाचारी सतप्रवृत्त कृष्णाचे कृपाछत्र असलेले व कृष्णाच्या आज्ञेप्रमाणे चालणारे पांडव आपलं राज्य आपल्या भोगाने आणि योगाने गमावून बसले आणि ते परत मिळवण्यासाठी कृष्णाला विनंती करू लागले. यावरून जीवनातले योग आणि भोग जीवनाला कलाटणी देऊन जीवन कसं नको नकोस करतात हे आपल्या लक्षात येईल कृष्णाने देखील पांडवांना प्राप्त परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी व्रताचरण म्हणजे कर्मच करायला सांगितलं जीवनातल्या कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी यथायोग्य कर्म करणे हाच एकमेव एक उपाय आहे हेच श्रीगुरुंनी म्हणजे भगवान दत्तात्रेयांनी कथानकाच्या सरतेशेवटी सांगितले आहे. कृष्णाने स्थापन केलेल्या नाथपंथातील अखंड परंपरेने कार्य करणारे गुरु हेच कार्य आज करीत आहेत. गुरु सांगतील ते नित्य कर्म करीत राहावे म्हणजे आपण कठीण परिस्थितीतून देखील बाहेर पडू शकतो. हाच कर्म सिद्धांत भगवान दत्तात्रेयांनी गुरुचरित्रातील 42व्याअध्यायात सांगितला आहे. श्रीगुरू सायंदेवाला म्हणाले, अनंतपूजेचे माहात्म्य काय आहे व ही अनंतव्रतपूजा पूर्वी कोणी केली होती? या व्रतपूजेचे फळ काय याविषयी मी तुला सांगतो. हे अनंतव्रत पूर्वी पंडुपुत्र युधिष्ठिराने केले होते. त्या व्रतप्रभावाने त्याला त्याचे गेलेले राज्य परत मिळाले. त्याचे असे झाले, कौरव आणि पांडव पण लावून द्यूत खेळत होते. त्या द्यूतक्रीडेत पांडवांचे सर्वस्व हरण केले व त्यांना बारा वर्षे वनवास व एक वर्ष अज्ञातवास भोगावा लागला. युधिष्ठीर अर्ध्या राज्याचा स्वामी, पण तो आपले भाऊ व द्रौपदी यांच्यासह घोर अरण्यात अनंत दुःखे भोगीत होता. पांडव वनसात असतानाही कौरव अनेक कपटकारस्थाने करून त्यांना त्रास देत होते. पांडवांचे सत्व हरण करून त्यांना त्रास देत होते. पांडवांचे सत्व हरण करण्यास कौरवांनाही पांडवांकडे पाठविले: परंतु प्रत्येक वेळी श्रीकृष्णाने त्यांचे रक्षण केले. पांडवांचे फार हाल होत आहेत हे पाहून एकदा श्रीकृष्ण त्यांना भेटावयास गेला. श्रीकृष्णाला पाहताच युधिष्ठिराने त्याला लोटांगण घातले. त्याची यथासांग पूजा केली. मग त्याने हात जोडून श्रीकृष्णाला प्रार्थना केली - हे भक्तवत्सला, कृष्णनाथा, तुझा जयजयकार असो. हे कृष्णा, तूच या विश्वाचे उत्पत्ती-स्थिती-लय यास कारण आहेस. तूच ब्रम्हा-विष्णु-महेश आहेस. दृष्ट-दुर्जनांचा नाश व संतसज्जनांचे रक्षण यासाठीच तू अवतार घेतोस. पांडव माझे प्राण आहेत असे तू सर्वांना सांगतोस, मग आमची उपेक्षा का करतोस? तुझ्याशिवाय आम्हाला कुणाचा आधार आहे सांग. तुझे आमच्यावर कृपाछत्र असताना आम्हाला ही दुःखे का बरे भोगावी लागत आहेत? आम्ही काय केले असता आम्हाला आमचे गेलेले राज्य परत मिळेल? सर्व पांडवांनी व द्रौपदीने हात जोडून श्रीकृष्णाला हेच विचारले. त्यावेळी श्रीकृष्ण पांडवांना म्हणाला, तुमचे गेलेले वैभव परत मिळविण्यासाठी मी तुम्हाला एक व्रत सांगतो. ते व्रत केले असता तुमचे गतवैभव तुम्हाला लवकर प्राप्त होईल. सर्व व्रतांमध्ये अनंतव्रत अतयंत श्रेष्ठ व प्रभावी आहे. ते व्रत तुम्ही करा म्हणजे तुमचे राज्य तुम्हाला लवकर प्राप्त होईल. तो अनंत म्हणजे शेषशायी विष्णू तेच माझे मूळ रुप आहे. मीच तो नारायण. दृष्टांचे निर्दालन करून भूभार हलका करण्यासाठीच मी वसुदेवकुळात श्रीकृष्ण म्हणून अवतार घेतला. मीच जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी त्रैलोक्याला व्यापून राहिलो आहे. मीच सर्वकाही आहे. मीच तो अनंत नारायण चराचर विश्वाला व्यापून राहिलो आहे. त्या अनंताची, म्हणजे माझीच तुम्ही यथासांग पूजा करा. ते व्रत केले असता तुमचे गतवैभव तुम्हाला लवकर प्राप्त होईल. श्रीगुरू नृसिंहसरस्वती शिष्यांना म्हणाले, श्रीकृष्णाच्या सांगण्या नुसार पांडवांनी वनवासात असताना अनंतचतुर्दशीचे व्रत केले त्यामुळे त्यांना गेलेले राज्य पुन्हा प्राप्त झाले. हे व्रत सर्व स्त्री-पुरुषांनी करावे. त्यामुळे चारी पुरुषार्थाची प्राप्ती होते. यासाठी गुरु सांगतील ते नित्य कर्म करीत राहावे.


अध्यात्मिक-वाटचाल/शिकवणूक/सत्कर्म-केल्याने-परिस्थिती-सुधारते.txt was सर्वात शेवटचा बदल: on 18-Dec-2025 (13:50)