इच्छा भोजन
इच्छा भोजनाला विशेष अर्थ आहे. सामान्यत: जो अर्थ निघतो त्याप्रमाणे हा शब्दप्रयोग वापरला जात नाही. विशेष म्हणजे इच्छाभोजनात भोजनाला काहीच अर्थ नसतो. परीक्षा घेणाऱ्या शक्ती आपल्या मनाला येईल त्या अटी सांगून ते आपल्या श्रद्धेची, आत्मविश्वासाची, निष्ठेची परीक्षा घेत असतात. परीक्षा ही ज्याला काही सामर्थ्य प्राप्त झाल आहे किंवा जो गुरुपदी पोहोचला आहे त्याची परीक्षा होते. शिष्याची, भक्तांची किंवा सामान्य माणसाची इच्छाभोजन परीक्षा होत नसते. इच्छाभोजन ही फार कठीण, कडक अशी परीक्षा आहे.
भगवान दत्तात्रेयांचे गुरुत्व–गुरुतत्व हे अबाधित अखंड आहे. ते स्वतः सर्व देवांना 'आध्यात्मिक गुरु' म्हणून मार्गदर्शन करीत असतात. तसेच भूमीवरील जनतेला अव्याहत, अहोरात्र, अखंडपणे मार्गदर्शन करणे हेच त्यांचं जीवनकार्य आहे. गुरुचरित्र हे अखंडपणे अस्तित्वात असणारी एक धारा आहे. जिचा साधकाला परिचय व्हायला हवा हे आम्ही पहिल्या लेखातच सांगितले होते.
गुरुचरित्रात घडलेल्या घटना जशाच्या तशा पुन्हा घडतील, पुन्हा कॉपी-पेस्ट होतील ही कल्पना करणे चुकीचे आहे. युगे लोटली तरी गुरूंच्या प्रभावाचा झरा हा अखंड राहणार आहे. घडणाऱ्या घटनांमधून गुरु आपलं अस्तित्व, आपला प्रभाव, आपल्या सामर्थ्याची ओळख सतत देत असतात. हे आपण लक्षात घेणे आवश्यक आहे.
गुरु ज्ञानाची किंवा भौतिक गोष्टींची परीक्षा घेत नसतात तर ते नेहमी सत्त्व, शुद्ध अंतःकरण, शुद्ध आचार–विचार, शुद्ध भावना यांची परीक्षा घेतात. हे लक्षात घेतले तर आपली अध्यात्मिक प्रगती होऊ शकते. *“मी गुरु आहे, मी दत्त आहे”* अशी ओळख कधीच कोणी दिली नाही व देणारही नाही. ही ओळख साधकाने आपल्या अंतर्मनाने, अनुभूतीने, विवेकाने करून घ्यायची असते.
देवाचा ठराविक साचा नसून तो ज्याला त्याला त्याच्या भावनेप्रमाणे दिसतो व तपासून पाहतो. गुरु म्हणून कार्य करणारे सद्गुरु हे देखील भगवान दत्तात्रेयांचे प्रतिनिधी म्हणूनच कार्य करीत असतात. आपल्या सद्गुरूमध्ये दत्ताचा साक्षात्कार शिष्याला सहज, लीलया होऊ शकतो. सद्गुरु देखील वेळोवेळी भगवान दत्तात्रेयांच्या संकेताप्रमाणे कार्य करीत असतात. भगवान दत्तात्रेयांचे आणि सद्गुरूंचे हितगुज हे नेहमीच सुरू असते.
देवगावला एकदा एक प्रसंग घडला. व्यंकटनाथ महाराज म्हणजे माझे गुरु यांचे निजस्थान, राहते ठिकाण हे देवगाव रंगारीला आहे. त्यांच्या घरी वार्षिक कार्यक्रमाला शिष्य मंडळी यायची आणि सर्व मिळून उत्सव साजरा करायचे.
अशाच एका उत्सवाला जवळजवळ १५० मंडळी जमली असताना तिथे तीन साधू आले. ते भक्त मंडळींना विचारू लागले की, “बंकटलाल महाराज यहाँ रहते हैं क्या?” सर्वांनी *हो* म्हणून सांगितलं. ते म्हणाले, “उनको नीचे बुलाओ!”
एवढ्यात महाराज स्वतःहून खाली आले. त्यांना हात जोडून नमस्कार केला आणि म्हणाले, “क्या आज्ञा आहे?” त्यावर ते म्हणाले, “हमने सुना है की आप इच्छाभोजन देते हो। हमको आपसे इच्छाभोजन चाहिये। क्या आप इच्छाभोजन देंगे?”
क्षणाचाही विलंब न करता महाराज म्हणाले, “आप बोलो, आपकी इच्छानुसार हम आपको भोजन देंगे.”
त्या तीन साधूंनी सर्वांसमोर सांगितले की, “हमें बकरू चाहिये.”
हा सगळा प्रसंग माध्यान्हाला घराच्या समोरच्या खुल्या भागात होत होता. महाराज त्यांना म्हणाले, “आपसे प्रार्थना है की आप पीछे के हिस्से में आइये.”
महाराजांच्या घरातील सर्वांनी कडक विरोध केला आणि शिष्य मंडळीदेखील घाबरली. ते तीनही साधू घराच्या मागच्या बाजूने आले. महाराज त्यांच्या स्वागतासाठी मागच्या बाजूला गेले. तोच घरातील सर्व मंडळींनी दार आतून बंद केले. आजवर या पवित्र वास्तूत असा अपप्रकार कधी घडला नव्हता. नाथ घराण्यामध्ये असे कधी झाले नाही.
आज हे बकरी कापणार आणि ती शिजवून त्या तीन साधूंना आजच्या मंगल प्रसंगी जेऊ घालणार — हे घरातील कुणालाही आवडले नाही. म्हणून त्यांनी महाराजांना घराच्या बाहेरच काढले असे केले. महाराजांनीदेखील ते दार त्यांच्या कडून बंद केले म्हणजे कोणी येण्या-जाण्याचा प्रश्नच नव्हता.
महाराजांनी त्या साधूंना नमस्कार केला आणि म्हणाले, “आपकी आज्ञा जैसी हो, वैसा ही हम करेंगे.”
त्यांच्या सांगण्यावरून बकरीचे पिल्लू, ते कापण्यासाठी लागणारे साहित्य, मोठाले पातेले, पाणी वगैरे जमा केले. त्यांनी एक एक सूचना दिली. एक मोठं अॅल्युमिनियमचं भांडं चुलीवर ठेवलं. मोठा जाळ लावला. त्या पातेल्यात पाणी भरले आणि झाकण ठेवले.
इकडे बकरीचे पिल्लू आणायला सांगितलं. जो विळा आणला होता, त्याने एका झटक्यात त्या पिल्लाची मान कापायला सांगितली. महाराजांनी वीरासन घेतले, तिघांनाही नमस्कार केला. बकरीच्या तोंडाला धरले आणि गुरूंचे स्मरण करून त्या विळ्याने एका झटक्यात मान आणि धड वेगळे केले.
हा सर्व प्रकार शिष्य मंडळी आणि घरातील मंडळी गच्चीवरून पाहत होते.
त्या तीन साधूंनी सांगितल्याप्रमाणे बकरीच्या पिल्लाची सर्व हाडं काढून एका कोपऱ्यात टाकली. मांसाचे बारीक तुकडे करून उकळत्या पाण्यात टाकले.
बराच वेळ महाराज आणि ते तिघे एकमेकांकडे पाहत बसले.
काही वेळानंतर त्या पातेल्यातून घमघमाट सुगंध बाहेर आला — सत्यनारायणाच्या प्रसादाचा!
गच्चीतल्या सर्व लोकांनी तिथे येण्याचा प्रयत्न केला, पण कुणीही तिथे येऊ शकले नाही.
झाकण काढले तर पातेल्यात सत्यनारायणाचा प्रसाद भरलेला!
तो प्रसाद त्या तीन ब्राह्मण साधूंनी व महाराजांनी मिळून खाल्ला.
सर्व प्रसाद खाण झाल्यावर एका साधूने पातेल्यात पाणी टाकले, धुतले आणि ते पाणी प्यायला.
हे झाल्यावर महाराज त्या तिघांच्याही पाया पडले — आणि पाहता पाहता ते तिघे अदृश्य झाले!
तिकडे कोपऱ्यात टाकलेली हाडं आणि कातड्यांतून बकरीचे पिल्लू “बँ बँ” करत धावत गेले.
ज्यांची ब्रह्मांडावर सत्ता आहे, पंचमहाभूतांवर सत्ता आहे, जे स्वतः केंव्हाही पाहिजे ते रूप घेऊ शकतात, कुठेही प्रगट होऊ शकतात व अदृश्य होऊ शकतात — त्यांना हे शक्य आहे का हा विचार देखील मनात आणण्याचे कारण नाही. ते काहीही करू शकतात, करीत आले आहेत आणि करीत राहतील. संपूर्ण ब्रह्मांड त्यांचंच आहे.
अशा तऱ्हेने त्या तिघांनी महाराजांची परीक्षा घेतली आणि अंतर्धान पावले.
ही घटना याच विसाव्या शतकात घडली आहे. म्हणूनच “गुरुचरित्र हा अखंड प्रवाह आहे.”
गुरु आपलं कार्य आजही त्याच पद्धतीने करीत आहेत. आपण हे सर्व विवेकाने समजून घेण्याची गरज आहे.
याप्रमाणे पंधरावे नाथ म्हणून कार्य करणाऱ्या व्यंकटनाथांची इच्छाभोजन परीक्षा भगवान दत्तात्रेयांनी घेतली. या परीक्षेवरून भगवान दत्तात्रेय आणि सद्गुरु — दोघांचे एकमेकांशी असलेले संबंध, एकमेकांना ओळखण्याची क्षमता, कार्याची ओळख तसेच या अघटित घटनेने उपस्थित सर्वांना मिळालेल्या विचारांची दिशा आणि येणाऱ्या पिढींना अध्यात्माची ओळख देणे — हे सर्व उद्देश्य एका परीक्षेने स्पष्ट झाले.
आणि सद्गुरूवरची श्रद्धा–विश्वास द्विगुणित झाला.