उदर व्यथा गेली
गुरुचरित्राच्या तेराव्या अध्यायात सांगितले आहे की एका विप्राला उदर व्यथा होती. तो प्राणांतिक वेदनेने लोळत पडला होता. आपले शरीर अन्नमय कोष आहे. अन्नमय जीवन आहे आणि तेच अन्न आपल्या प्राणाचे वैरी झाले आहे, मग वाचून काय उपयोग — *गंगेत प्राण द्यावा* असा विचार तो विप्र करीत असता श्री गुरूंनी त्याला पाहिले.
त्या ब्राम्हणाचा पश्चात्ताप पाहून श्रीगुरु विचारू लागले —
“अरे बाबा, प्राणत्याग हे महापाप आहे. हे माहिती असूनही तू का करतोस? त्यापेक्षा आम्ही औषध देतो ते घे.”
श्री गुरूंच्या आश्वासनाने त्या व्याधिग्रस्त विप्राचे चित्त स्थिर झाले. श्री गुरु म्हणाले:
“या ब्राम्हणाला जठर व्यथा आहे. त्यामुळे तो प्राणत्यागाच्या विचारात आहे. त्याच्या व्याधीवर आम्ही औषध देतो. सायनदेवा, त्याला तुझ्या घरी नेऊन मिष्ठानाचे जेवण दे. तो जेवण करताच व्याधीमुक्त होईल.”
सायंदेवाला त्या विप्राची व्यथा माहित असल्यामुळे तो घाबरून गेला. तो म्हणाला — *“याला जेऊ घातल्यावर तो मरेल, त्याचा हत्यारा होण्याचे पाप माझ्या शिरी पडेल.”*
श्री गुरु म्हणाले:
“अरे, घाबरू नकोस. याला वडे, अनारसे, दुधाचे पक्वान्न — हेच त्याचे औषध आहे. ते जेवताच त्याची व्याधी नष्ट होईल. शंका करू नकोस.”
सायंदेव म्हणाला — *“आपली आज्ञा शिरसावंद्य.”*
सिद्ध म्हणाले की, हे सर्व घडत असताना आम्ही सर्व गुरुजवळच होतो.
—
सायंदेव आणि त्याची पत्नी जाखाई यांनी भोजनाची तयारी केली. गुरुपूजेनंतर त्या जठर व्यथेच्या ब्राम्हणाने श्री गुरुचे चरणतीर्थ प्राशन केले. नंतर सर्वांनी यथेच्छ भोजन केले.
श्री गुरु कृपेने त्या विप्रानेही पोटभर जेवण केले आणि तो बरा झाला.
—
देवगाव रंगारीतील घटना
असाच प्रसंग देवगाव रंगारीला व्यंकटनाथ महाराजांच्या घरी झाला.
चंद्रपूरची पाच–सहा मंडळी कुटुंबातील एका सदस्याला घेऊन आली. त्याला प्रचंड उदर व्यथा होती. कोणत्याही डॉक्टरचे औषध लागू पडत नव्हते. तो प्राणांतिक वेदना सहन करत होता.
वैद्य, ज्योतिषी, मांत्रिक इत्यादी सर्वांचे उपाय करून झाले. सर्वांनी सांगितले — “हा बरा होणार नाही. लवकरच मरण पावेल.”
—
ही मंडळी व्यंकटनाथ महाराजांची अनुग्रहित शिष्य मंडळी होती. त्यांनी विचार केला:
“इकडे तिकडे मृत्यू येण्यापेक्षा गुरूंच्या चरणी जाऊ. तेथे जे काही होणार असेल ते होऊ दे. हेच आपले प्रारब्ध.”
सर्वजण देवगावला आले.
महाराजांनी विचारले:
“का रे, सगळे कसे काय आले? आणि त्याची तब्येत कशी आहे?”
ते म्हणाले:
*“आपल्या चरणी आलो. येथे राहून त्याच्या जीवाला आराम पडेल या कल्पनेने आलो.”*
पण ते बोलणे संपत नाही तोच त्या आजारी व्यक्तीची बायको रडू लागली. ती महाराजांच्या चरणी शरण गेली आणि म्हणाली:
“महाराज, डॉक्टर, वैद्य, ज्योतिषी सर्व जण सांगतात — यांचे आयुष्य उरले नाही. म्हणून आम्ही आपल्या चरणी आलो.”
—
बराच वेळ चर्चा झाली. सर्वांनी आपला शोक व्यक्त केला.
महाराज म्हणाले:
“उद्या सकाळी आम्ही याला औषध देऊ. ते त्याला द्या — बरा होईल.”
सगळ्यांना हायसे झाले.
—
महाराजांनी तयार केलेले औषध
रात्री महाराजांनी दुधात आणि थोड्याशा ताकात दोन भाकरी बारीक कुस्करून झाकून ठेवल्या.
सकाळी सुमारास दहा वाजता — त्याला तार सुटली होती. सर्वजण घाबरले होते.
महाराज म्हणाले:
“हे पूर्ण औषध त्याला खायला द्या — तो बरा होईल.”
त्यावर त्याची पत्नी रडू लागली:
“महाराज, त्याला का मारता? त्याने असे अन्न कधीच खाल्ले नाही. हे खाता क्षणी तो मरेल!”
महाराज म्हणाले:
“आम्ही हे औषध केले आहे — त्याला दे.”
—
इतरांनी गुरुंवर विश्वास ठेवून ते औषध त्याला खाऊ घातले. ते खाता क्षणी तो निपचित पडला, जणू बेशुद्ध.
सर्व मंडळी ओरडू लागली. जागवताही येत नव्हते.
“हा गेला” अशी पक्की समजूत झाली.
—
पाच–सहा तासांनी तो स्वतःहून शुद्धीवर आला आणि म्हणाला:
“मला भूक लागली आहे — जेवायला द्या. माझी व्यथा गेली. पोट दुखत नाही.”
—
त्यानंतर सर्वांनी गुरुंचे पूजन केले. आपल्या गैरसमजांची खंत व्यक्त केली. शरणागती पत्करून आशीर्वाद घेतले.
—
सार
गुरूंनी दिलेले “औषध” प्रत्यक्षात औषध नव्हते. सामान्यतः फेकून देण्यासारखे अन्न — पण गुरुंच्या शक्तीने त्यात असा गुणधर्म निर्माण झाला की त्या रोग्यावर त्याचा परिणाम झाला.
गुरुचरित्रात घडलेले जसेच्या तसेच देवगावला घडले.
दोन्ही ठिकाणी औषध वेगळे होते, पण गुरुंचे पंचतत्त्वावर, शरीरावर, सृष्टीतील सर्व वस्तूंच्या गुणधर्मांवर प्रभुत्व स्पष्ट झाले.
वस्तूंचे गुणधर्म बदलून हवे ते परिणाम घडवणे — हे फक्त भगवान दत्तात्रेय आणि सद्गुरूंच्या अधीन आहे.