श्री नाथशक्तिपीठ, आकोला Header श्री नाथशक्तिपीठ, आकोला Header

अन्नपूर्णा गुरूंच्या आधीन

गुरुचरित्राच्या 38 व्या अध्यायात सांगितले आहे की श्री गुरूंना दक्षिणा देण्यासाठी भक्तांनी द्रव्य आणले त्याचा स्वीकार न करता *समाराधना करा* असे श्री गुरु म्हणाले. याच पद्धतीने गाणगापूरला रोज समाराधना होत असे. श्री गुरूंचे अनेक भक्त होते, अनेक शिष्य होते. त्या सर्वांचे भोजन नित्य होई. त्यास *समाराधना* असे नाव होते.

एके दिवशी एक क्षीण ब्राम्हण आला. त्याच्याकडे एक गाठोडे होते. त्यात दाळ, तांदूळ, कणिक वगैरे स्वयंपाकाचे साहित्य होते. त्याची इच्छा श्री गुरूंना जेऊ घालण्याची होती. श्री गुरूंना साष्टांग नमस्कार करून त्याने तशी विनंती केली; पण इतर ब्राम्हण म्हणाले, *आज समाराधना होत आहे. जेवायला चला.* भक्तांनी बोलावले म्हणून तोही जेवावयास गेला.

जेवून आला. रात्री उशीला गाठोडे घेऊन झोपी गेला. असे अनेक दिवस गेले. त्याची समाराधना होईना. सर्वजण त्याची चेष्टा करू लागले.

असे तीन महिने गेले.

एकदा श्री गुरूंनी लोकांनी केलेली त्या ब्राम्हणाची चेष्टा ऐकली. त्यांनी त्या ब्राह्मणाला बोलावले व म्हणाले, आज तू भिक्षा कर.

त्या भक्ताला परमानंद झाला. त्याने तयारी केली. तूप, भाजी वगैरे आवश्यक सामग्री आणली व स्वयंपाकास सुरुवात केली.

इकडे ते सर्व भक्त, शिष्य काळजीत पडले. *या ब्राम्हणाजवळ तीन माणसापुरतेच अन्न आहे. आता आपणाला घरी जेवावे लागेल.* श्री गुरु त्यांना म्हणाले, *घरी जाऊ नका. आज इथेच जेवायचे. हा ब्राम्हण समाराधना करणार आहे.*

सर्वजण आनंदले. संगमावर स्नानास गेले.

ह्या ब्राह्मणाच्या मनात कसलाच किंतु नव्हता. श्री गुरूंनी आज्ञा केली तेच आपल्याला तारून नेतील — हीच श्रद्धा-भक्ती फळाला येत असते. आपले कर्म प्रामाणिकपणे करून जो परमेश्वरावर विश्वास ठेवतो त्याच्या साह्याला देव धावून येत असतो.

पांडव वनवासात असताना दुर्वासांचा भोजन प्रसंग द्रौपदीला असाच तारून नेणारा ठरला.

ह्या ब्राम्हणाने केलेला स्वयंपाक इतक्या जणांना एक-एक शीत सुद्धा पुरला नसता; पण तो ब्राम्हण श्री गुरूंवर पूर्ण विश्वास ठेवून, ते जे सांगतील ते शिरसावंद्य मानून आचरणात आणीत होता.

श्री गुरूंनी सर्वांना बोलावं म्हटल्यानंतर त्याने सर्वांना बोलावले. *कुटुंब आमंत्रण दे* म्हणताच *सकुटुंब या* म्हणाला.

त्या ब्राम्हणास श्री गुरु म्हणाले, स्वयंपाक आमच्याजवळ आण. हे वस्त्र त्यावर झाक. नंतर श्री गुरूंनी कमंडलूतील पाण्याने अन्नावर प्रोक्षण केले व सांगितले: *आता हे वस्त्र काढू नकोस. जसजसे अन्न लागेल तसतसे नेऊन वाढ!*

शिष्यांना म्हणाले: *या ब्राम्हणाला मदत करा.*

सर्वजण उठले. पाने मांडू लागले. कुणी अन्न वाढू लागले. परोपरीची पक्वान्ने त्या वस्त्राखालून काढून वाढू लागली. तूप जितके वाढले तितके पुन्हा भरत होते. अन्नाची तीच स्थिती होती.

सर्वजण जेवून तृप्त झाले. गावातील सर्व लोक जेवून गेले. एकही माणूस उपाशी नव्हता. गावात दवंडी पिटून भुकेल्याने जेवावे असे सांगितले.

अशा तर्‍हेने सर्व भक्त आणि ब्राम्हणच नव्हे तर गावातील सर्व जाती-जमातीचे लोक जेवून तृप्त झाले.

मग त्या ब्राम्हणाला जेवून घे असे श्री गुरु म्हणाले. त्याने जेवण केले व शिल्लक अन्न वस्त्र काढून पाहिले तर जितके केले होते तितकेच शिल्लक होते.

त्याने श्री गुरूंना निवेदन केले. ते म्हणाले, *घेऊन जा! आणि जलात टाका. जलचरांनाही अन्न मिळू द्या!*

हे सर्व पाहिल्यावर सर्व लोक तटस्थ झाले. अन्नपूर्णेची प्रार्थना श्री गुरूंनी केली असेल, असे म्हणू लागले.


डिगोले महाराजांच्या समाधी मंदिरात अन्नछत्र

एकदा यवतमाळहून ढिगोले महाराजांचे शिष्य नाथशक्तिपीठात आले. त्यांनी मला (नरेंद्रनाथ महाराजांना) सांगितले—

“आमच्या गुरूंनी स्वप्नात येऊन सांगितले की यंदाच्या महाशिवरात्रीला महारूद्राचे हवन तुमच्या हस्ते करायचे.”

त्यांनी पुढे सांगितले—

“यावर्षी नेहमीपेक्षा खूप जास्त लोक आले आहेत. आमच्याकडे साधन–सामग्री फार कमी आहे. प्रत्येकाला प्रसाद मिळावा ही आमच्या गुरूंची शिरस्ता आहे. कृपा करा. आम्ही फक्त १४–१५ हजार लोकांसाठीच अन्न शिजविले आहे; पण येणारे याहून खूपच अधिक असतील.”

गोपालकालादेखील तेवढ्याच साहित्याचा केला होता. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी एक मोठे पातेले गोपालकाला माझ्याकडे आणले आणि लाऊडस्पीकरवर जाहीर केले—

“ज्याच्याकडे गोपालकाला असेल, तोच भोजनाचा प्रसाद घेईल.”

परंतु पातेले अर्धे झाल्यावर हे सांगितल्यामुळे, उरलेला काला सर्वांना पुरणे आवश्यक झाले—पण काला तेवढा नव्हता.

प्रसाद वितरण संपले. आयोजक म्हणाले—

“१७–१८ हजारांवर आलेले सर्व लोक जेवून गेले.”

काल्याच्या पातेल्याचे झाकण उघडले— ते अर्ध्यापेक्षा जास्त भरलेले होते!

पाकगृहात जाऊन इतर भांड्यांवरील झाकणे काढली. सर्व भांडी अन्नाने पूर्ण भरलेली—जणू आत्ताच शिजविल्याप्रमाणे.

आयोजकांनी विचारले—“महाराज, आता काय करावे?” मी सांगितले—“आजूबाजूच्या गावात हे अन्न वाटून द्या.”

त्यानुसार ट्रॅक्टरमध्ये भांडी भरून सर्व गावांत फिरून आले. पण परत येताना—

भांडी जशीच्या तशी भरलेली!

पुन्हा विचारले—“आता काय?” मी सांगितले—“जवळच्या नदीत सोडा.”

दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वांनी नदीपात्र पाहिले— पाणी नेहमीपेक्षा स्वच्छ! तेलकट अन्न—कोठे गेले? कुणालाही कळले नाही.

हवन कार्यक्रम अत्यंत उत्तम झाला. सर्वांनाच जाणवत होते— हवनकुंडात देवता प्रत्यक्ष उपस्थित होत्या. आणि अन्नपूर्णेने नाथांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पाडला.


अध्यात्मिक-वाटचाल/गुरूमहिमा/माधवनाथ-व्यंकटनाथ/अन्नपूर्णा-गुरूंच्या-आधीन.txt was सर्वात शेवटचा बदल: on 18-Dec-2025 (13:50)