श्री नाथशक्तिपीठ, आकोला Header श्री नाथशक्तिपीठ, आकोला Header

भेट दिलेली पृष्ठे: किती उशीर केलास रे

किती उशीर केलास रे

स्वामी विवेकानंद ज्या वेळेस प्रथम रामकृष्ण परमहंस यांना भेटले त्यावेळेस देखील झाले असे की, रामकृष्ण परमहंस विवेकानंदांना म्हणाले, “बाळ किती उशीर केलास भेटीला!” खरंतर विवेकानंदांचा शोध सुरू होता की देव कोणी प्रत्यक्ष पाहिला आहे का? त्यावर रामकृष्ण परमहंस त्यांना म्हणाले, “जेवढा स्पष्टपणे मी तुला पाहत आहे त्यापेक्षा जास्त स्पष्ट मी देव पाहिला आहे.” आणि तिथून विवेकानंदांच्या आध्यात्मिक जीवनाला सुरुवात झाली.

माझ्याबाबतही असेच काहीसे घडले. परंतु माझा प्रवास आक्रमक होता आणि मी विरुद्ध बाजूला जाऊन शोध घेत होतो. अंतर्मनातून माझा शोध हा सद्गुरूंची भेट कशी आणि केव्हा होईल हाच होता.

व्यंकटनाथ महाराजांनी ज्या वेळेला मला म्हटले, “किती उशीर केला”, त्यावेळी मी विचारांच्या दुसऱ्या टोकाला गेलो आणि विपरीत अर्थ काढून गुरूंचा शोध घेऊ लागलो. जसे ब्रह्मर्षी नारदांनी वाल्या कोळीच्या डोक्यातील राग-विचार काढून टाकले, त्याला साधनेला लावले, तसेच व्यंकटनाथ महाराजांनी हळूहळू माझ्या मनातील राग व विचार शांत केले व मला साधनेची जाणीव देऊन भक्तिमार्गाला लावले.

प्रत्यक्ष प्रसंग कसा घडला तो लक्षात घेण्यासारखा आहे. व्यंकटनाथ महाराजांच्या प्रत्यक्ष दर्शनाला आम्ही ९-१० विद्यार्थी गेलो होतो. परीक्षा पास होत शिक्षण संपवायचे हेच आमचे धोरण. परीक्षेत पास होण्यासाठी गंधाच्या गोळ्या मिळाल्या तर देवच पावला! त्या गंधाच्या गोळ्या मिळविण्यासाठी महाराजांकडे जायचे आणि त्या मागायच्या, असे आम्ही ठरविले.

जीवनात मी ह्यापूर्वी कोणत्याही महाराजांचे वा सत्पुरुषांचे दर्शन घेतले नव्हते. कोणत्याही महाराजांच्या सान्निध्यात मी कधी आलो नव्हतो. माझे विचार, माझी मते — त्यांच्यामध्येच मी वावरत होतो.

उद्धवचा जूना संबंध महाराजांशी असल्याने आम्ही सगळ्यांनी त्यालाच म्हटले, “तू आमचा लीडर. तू जसा वंदन करशील, तसे आम्ही करू. तू गंधाच्या गोळ्या माग.”

आम्ही महाराजांच्या खोलीच्या दरवाज्यात पाऊल ठेवताच ते म्हणाले, “काय, परीक्षा जवळ आली काय? गंधाच्या गोळ्यांसाठी आले काय?” हे ऐकून आम्ही हसलो. आमच्या मनातील उद्देश त्यांनी ओळखला हे जाणवले.

पण माझी बुद्धी लगेच सक्रिय झाली. मी मित्राला विचारले — “तू यांना सांगितले होते काय?” तो नाही म्हणाला.

मित्राने पायावर डोकं ठेवून नमस्कार केला, त्याप्रमाणे आम्ही सर्वांनी केला. मी ज्या वेळी नमस्कार केला त्यावेळी त्यांनी सहजतेने माझ्याकडे पाहिले आणि सरळ विचारले — “बाळ, तुझं नाव काय?” मी म्हटलं — “चौधरी.” ते म्हणाले — “ते आम्हाला माहीत आहे. तुझे पहिले नाव काय?” मी म्हटलं — “नरेंद्र.” ते पुन्हा म्हणाले — “ते आम्हाला माहीत आहे… किती उशीर केलास रे!”

जणू ते माझ्या भेटीची वाट पाहत होते आणि मीच खूप उशीर केला. हे ऐकताच माझ्या डोक्यात तडाखा बसल्यासारखे झाले.

खोलीत मीच प्रथमच त्यांना पाहिले होते.

ते तेजस्वी दिसत होते, सिंहासनावर रेलून बसले होते, चेहरा गूढ, स्थिर, सर्वांवर नियंत्रण असल्यासारखी मुद्रा. पण माझ्यामधील संशय संपत नव्हता. मी मित्राच्या कानातच कुजबुजलो — “हा माणूस आपल्याला बनवतोय रे!”

तेवढ्यात महाराजांनी मंद स्मित केले आणि म्हणाले, “या, मी तुम्हाला गंधाच्या गोळ्या देतो. तुम्ही मोजा. मग नमस्कार करा. तुमच्या परीक्षेचा निकाल मी त्या क्षणी कानात सांगेन.”

माझी वेळ आली. मी त्यांच्यासमोर गेलो. मी त्यांना सांगितले— “५६ गोळ्या भरल्या.” त्यांनी डोळे मिटले. मी पायावर डोकं ठेवले.

आणि माझ्या कानात अत्यंत स्पष्ट आवाज आला — “तू बी.कॉम. सेकंड क्लासमध्ये पास होशील.”

मी चकित झालो. माझ्या जवळ कोणीच नव्हते. ते स्थिर बसलेले. कुठे तोंड हलले नव्हते. पण आवाज माझ्या कानात स्पष्ट पोहोचला होता. ते डोळे उघडून म्हणाले — “आम्हीच तुझ्या कानात बोललो.”

या सर्व प्रकाराने माझ्या मनात संपूर्ण गोंधळच निर्माण झाला. विश्वास बसण्यापेक्षा संशयच प्रबळ झाला — “हे काहीतरी खेळ आहे!”

खोलीच्या बाहेर पडून मी अगदी मोठ्याने म्हणालो — “काय बनवलं या म्हातार्‍याने! कशाचे योगी, कशाचे नाथपंथी!”

माझं बोलणं त्यांना स्पष्ट ऐकू जात होतं.

ते म्हणाले होते — “बाळ, उद्या सकाळी आठ वाजता ये. मी वाट पाहतो.”

मनातून मी ठरवले होते — “मी जाणारच नाही.”

परंतु दुसऱ्या दिवशी पहाटे, नकळत, मनातील राग निवळला… आणि मी त्यांच्या खोलीत पोहोचलो. ते मला पाहताच हसले आणि म्हणाले — “ये, मी तुझीच वाट पाहत होतो. तू तर येणार नव्हतास ना रे? मग काय झालं?”

जणू त्यांना सगळंच माहीत होतं.

त्या दिवसापासून मी रोजच त्यांच्या जवळ जाऊ लागलो. रोजच ते मला वेगवेगळ्या गोष्टी सांगत माझ्या विचारांना दिशा देत होते. माझ्यातील राग शांत होऊ लागला. आकर्षण वाढू लागले.

त्यांच्या प्रतिमेने माझ्या मनात कायमचे घर केले.

बी.कॉम.ची परीक्षा आली, आणि खरेच — मी त्यांनी सांगितल्याप्रमाणे सेकंड क्लासमध्ये पास झालो.

ते सांगत असताना तर प्रश्नपत्रिका देखील तयार नव्हती.

या योगायोगाने माझा विश्वास वाढला — पण ताठरपणा अजूनही काहीसा होता. अंतर्मनाची पूर्ण खात्री अजून व्हायची होती.


अध्यात्मिक-वाटचाल/गुरूमहिमा/माधवनाथ-व्यंकटनाथ/किती-उशीर-केलास-रे.txt was सर्वात शेवटचा बदल: on 18-Dec-2025 (13:50)