श्री नाथशक्तिपीठ, आकोला Header श्री नाथशक्तिपीठ, आकोला Header

भेट दिलेली पृष्ठे: दोन योग्यांची लक्षवेधी गोष्ट

दोन योग्यांची लक्षवेधी गोष्ट

अंदाजे 1985 ची ती घटना असेल. एक दिवस सकाळी एक गृहस्थ नरेंद्राच्या घरी आले आणि बाहेरच्या खोलीतून त्यांनी मोठमोठ्याने हाक मारली. बापूसाहेब, थोडा आवधी जाऊन पुन्हा हाक मारली, वहिनी मी आलो आहे आवाज पूर्णतः अपरिचित होता.

कोण आहे म्हणून पाहण्यासाठी नरेंद्र बाहेरच्या खोलीत गेला. तो गृहस्थ अंदाजे नरेंद्रपेक्षा वयाने थोडे लहान होता. त्यांनी नरेंद्रला पाहिले आणि म्हणाले, बापूसाहेब ओळखले का? कांही केल्या ही व्यक्ती आपल्या ओळखीची आहे असे मला वाटतच नव्हते.

त्यांना बसायला सांगितले. बसत बसत ते म्हणाले, तुम्ही मला ओळखणार नाही, पण मी तुम्हाला ओळखले. म्हटले आपले नाव काय? तर म्हणाले डॉ. रमेश कस्तुरे. कुठे असता? ते म्हणाले मी अकोल्याला असतो.

ते म्हणाले, जाऊ द्या, तुम्ही मला ओळखणार नाही; *मीच ओळख देतो*. आता मी जे तुमच्याकडे आलो आहे ते व्यंकटनाथ महाराजांची आज्ञा म्हणून आलो. काही दिवसांपूर्वी मी देवगाव ला गेलो होतो. त्यांनी मला तुम्हाला सदेह दाखवले आणि तुमची ओळख पटली. त्यांनी तुमचा पत्ता दिला आणि तुम्हाला भेटण्यास सांगितले.

नरेंद्र म्हणून कुतूहलाने व उत्सुकतेने त्यांच्याशी बोलू लागला. त्यावर त्यांनी मजेशीर गोष्ट सांगितली.

ते म्हणाले, *मी पातुर्ड्याला दवाखाना चालवितो.* प्रचंड गर्दी माझ्या दवाखान्यात असायची. अचूक निदान, अचूक औषधोपचार आणि सर्वच काही अल्पशा खर्चात. त्यामुळे माझ्याकडे खूप गर्दी रहायची.

देवाधर्मावर, साधू संतांवर *माझा कधीच विश्वास नव्हता*. आमच्या भागात रामचंद्रनाथ महाराज यांचा मठ आहे. तेही योगी पुरुष, पण मी कधी त्यांच्या दर्शनाला गेलो नाही.

एक दिवस पेशंट घाईने आले आणि म्हणाले की, गावच्या पातुर्ड्याच्या वेशीपर्यंत गरम पाणी वाहत येत आहे. तीन–चार किमीस दूरवर असलेल्या मठातून हे पाणी उतरत आहे. लोक रामचंद्र महाराजांना आंघोळ घालत आहेत.

मशिनचे पाणी गार असूनही महाराजांच्या अंगावरून वाहत येणारे पाणी *कढत* होत गेले.

विश्वास न बसल्याने मी स्वतः पहावयास गेलो. आणि खरोखरच — पाणी अतिशय गरम होते.

डॉ. कस्तुरे थेट आंघोळीच्या ठिकाणापर्यंत गेले. जसे तेथे गेले तसे रामचंद्रनाथ महाराजांनी आंघोळ थांबवून एका खोलीत जाऊन दरवाजा बंद केला. शिष्याने सांगितले की डॉ. कस्तुरे आले आहेत. महाराज म्हणाले:

“सर्वांना परत जायला सांग. मी दार उघडत नाही.”

भेट न होता कस्तुरे परत गेले.

नंतर हळूहळू रामचंद्र महाराजांचा आणि त्यांचा जवळचा संबंध झाला. एकेदिवशी महाराज म्हणाले:

“व्यंकटनाथ महाराजांनी आमच्या कार्याचा पुढचा भार तुझ्यावर सोपवण्याची आज्ञा केली आहे.”

असे म्हणताच — अत्यंत जुन्या काळातील व्यंकटनाथ महाराज, त्यांच्या त्या वेळच्या पोशाखात डॉ. कस्तुरेंना *दिसले*. त्यांनी नरेंद्रला केलेले वर्णन अगदी खरे आणि तंतोतंत जुळणारे होते.

प्रत्यक्ष त्यांची भेट कधी झाली नव्हती तरीही ही अनुभूती झाली.

रामचंद्रनाथ महाराजांनी आधीच सांगितले होते की:

“आजपासून सव्वा महिन्यानंतर मी समाधी घेईन. आणि पुढील कार्य हा डॉ. कस्तुरे करेल.”

पूर्णत: व्यवहारात बुडालेल्या, देवधर्मावर विश्वास नसलेल्या व्यक्तीला सव्वा महिन्यात आध्यात्मिकदृष्ट्या तयार करणे, ही कठीण जबाबदारी त्यांनी पार पाडली.

ज्या गृहस्थाला आध्यात्म माहित नव्हते, देव धर्म माहित नव्हते, व्यावसायिक जीवनात गुरफटलेला होता, तो सव्वा महिन्यात गुरुपदी जाण्यास तयार झाला.

व्यंकटनाथ महाराजांनी अशी आज्ञा का केली? — हा प्रश्न डॉक्टरांना पडला. परंतु ते पंधरावे नाथ होते आणि अखंड परंपरेचा विचार करून त्यांनी निर्णय दिला होता.

डॉ. कस्तुरे यांच्या आईलाही व्यंकटनाथ महाराजांचा अनुग्रह होता.

रामचंद्रनाथ महाराज हे देखील नाथपंथी अवलिया. मनात येईल तेंव्हा *हजार बिड्या* ओढायचे, आणि उष्णता कमी करण्यासाठी दहा फूट हवेत आडवे झोपायचे — कोणताही आधार नसताना.

अशा अवलियाला व्यंकटनाथ महाराजांनी स्वतः आज्ञा केली होती की डॉक्टर कस्तुरे यांनी परंपरेचे पुढील कार्य करावे.

रामचंद्रनाथ महाराज व व्यंकटनाथ महाराज — या दोन योग्यांची ही गोष्ट डॉक्टर कस्तुरेंनी गादीवर बसल्यानंतर सांगितली.

व्यंकटनाथ महाराजांचे कार्यक्षेत्र वेगळे असले तरी, परंपरेची योजना लक्षात घेऊन त्यांनी हा निर्णय सांगितला.

डॉक्टर कस्तुरे यांचा आध्यात्माशी काहीही संबंध नव्हता, परंतु गुरूंची आज्ञा म्हणून रामचंद्रनाथ महाराजांनी त्यांच्यामध्ये सर्व स्थित्यंतरे घडवून आणली. डॉक्टरांनी व्यवसाय सोडला आणि गुरूंचे कार्य पुढे चालवू लागले.

शिष्यांमध्ये सर्व प्रकारचे स्थित्यंतर घडवून त्याला गुरुपदी बसवणे — हे अवघड कार्य रामचंद्रनाथ महाराजांनी पूर्ण केले.

संजीवनी समाधी घेण्यापूर्वी रामचंद्रनाथ महाराजांनी कस्तुरे यांना गादीवर बसवले आणि स्वत: संजीवनी समाधी घेतली.


अध्यात्मिक-वाटचाल/गुरूमहिमा/माधवनाथ-व्यंकटनाथ/दोन-योग्यांची-लक्षवेधी-गोष्ट.txt was सर्वात शेवटचा बदल: on 31-Jan-2026 (21:38)