श्री नाथशक्तिपीठ, आकोला Header श्री नाथशक्तिपीठ, आकोला Header

गुरुंच्या कार्याच्या मर्यादा

शिष्यांनी किंवा भक्तांनी संतांच श्रेष्ठत्व दाखविणे अथवा त्याच मूल्यांकन करणे हे सर्वथा चुकीचे आहे. सृष्टी निर्मिती झाल्यावर ब्रह्मांड कार्याचे तीन भाग पाडले गेले — उत्पत्ती, स्थिती आणि लय. या कार्याची विभागणी ब्रम्हा, विष्णू आणि महेश यांच्या मध्ये झाली. प्रत्येकाला स्वतंत्र कार्य दिले गेले आणि एकमेकांच्या कार्यात कोणालाही हस्तक्षेप करता येत नाही अशाप्रमाणे कार्याची वाटणी झाली.

त्याच प्रमाणे, प्रत्येक देवांना विशिष्ट मर्यादेचे कार्य दिले गेले. कोणीही दुसऱ्याच्या कार्यभागात ढवळाढवळ करीत नाही. हीच ब्रह्मांड रचनेची योजना आहे. जसे शक्ती, युक्ती, बुद्धी, चातुर्य हे कार्य हनुमंताकडे दिले, तसेच विद्या कार्यात निर्विघ्नता वगैरे कार्य गणपतीकडे दिले.

याचा अर्थ इतर देवांना हे कार्य करता येत नाही असे नसून या कार्याच्या मर्यादा आहेत. सामर्थ्याच्या नाहीत. त्याचप्रमाणे संत-महानतांच्या कार्यांना देखील मर्यादा आहेत. त्या मर्यादा त्यांच्या पंथपरंपरेच्या कार्याला अनुसरून टाकलेल्या आहेत.

जसे नाथपंथामध्ये पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पंचमहाभूतांच्या परिणामांमध्ये कलियुगात फरक करण्याचे किंवा पूर्वसंचित, प्रारब्धामध्ये बदल करण्याचे कार्य नाथपंथाकडे आहे. याचा अर्थ इतर संतांचे ते सामर्थ्य नाही असा नसून या कार्याच्या मर्यादा आहेत.

हे विवेकाने समजून आपल्या आपल्या गुरु भक्‍तीत राहावे. गुरु हे गुरुच असतात. “माझे गुरु दुसऱ्यापेक्षा श्रेष्ठ आहेत किंवा पॉवरफुल आहेत” असे म्हणणे चुकीचे आहे. “अमुक एक गुरु आमच्या गुरूंपेक्षा कमी प्रतीचे आहेत” ही भाषा शिष्यांनी अथवा भक्तांनी वापरणे सर्वथा चुकीचे आहे.

मुळात गुरु जे कार्य करतात ते त्यांच्या गुरूंनी सांगितलेल्या कार्यक्षेत्रात, कार्यकक्षेत करीत असतात. ते आपल्या गुरुंची आज्ञा पाळत असतात. शिष्यांचे किंवा भक्तांचे कार्य हा त्यांचा मूळ उद्देश नसतो.

ज्या पंथाचे ते कार्यकर्ते असतात त्या पंथाचे जे उद्देश असतील ते राबविण्याचे कार्य गुरुसंस्था करत असते. शिष्यांचे आणि भक्तांचे कार्य ते करित असतातच, परंतु शिष्यांना व भक्तांना असे वाटत असते की ते केवळ आपल्या उद्धारासाठी गुरुपदी बसले आहेत. गुरूपदाचा एवढा सीमित अर्थ नाही.

गुरू हे भगवान दत्तात्रेयांचे स्वरूप आहे. त्यामुळे गुरु हे लक्षांत ठेऊनच कार्य करीत असतात. नाथपंथ कार्य हे कलियुगातील कार्य असून चेतन-अचेतन गोष्टींसाठी असते. सर्व प्राणिमात्रांसाठी असते.

गुरूंचे कोणत्याही कारणांनी मूल्यांकन करणे हे शिष्याला अथवा भक्तांना शोभत नाही. शिष्यांनी व भक्तांनी निसंदेहपणे आपल्या गुरुंची सेवा करावी व गुरूंनी सांगितलेल्या उपासनेत मग्न रहावे. गुरूंचे मूल्यांकन करण्याची योग्यता शिष्यामधे वा भक्तांमध्ये नसते आणि असे केल्याने ते आपले मन कमकुवत करीत असतात, त्यामुळे त्यांची आध्यात्मिक उन्नती व प्रगती होऊ शकत नाही.

गुरूंच्या अशा प्रकारच्या मूल्यांकनाचा त्यांच्या गुरुकार्यावर काहीच परिणाम होत नाही. त्यांचे गुरुकार्य गुरूंच्या आज्ञेप्रमाणे सुरूच असते. शिवाय अशा मूल्यांकनामुळे परंपरेच्या सामर्थ्याचे कृपाशीर्वाद त्यांना लाभतच नाहीत.


व्यंकटनाथ महाराजांनी जन्मापूर्वी जन्मपत्रिका दिली

चंद्रपूरचे एक जोडपे महाराजांकडे आले. तो म्हणाला, “महाराज, मला मुलीच आहेत. आता मुलगा व्हावा अशी इच्छा आहे. बायकोला दिवस आहेत व लवकरच प्रसूती होणार आहे.”

महाराजांनी काही न बोलता एका कागदावर पत्रिका काढली व त्याच्या हातात दिली — होणाऱ्या मुलीची ती पत्रिका होती.

त्यावेळी त्याने वडिलांना कळविले की चौथी मुलगी झाली. ती तार वाचून त्याचे वडील आले व बाहेरूनच महाराजांना नमस्कार केला. महाराजांनी दूरून नमस्काराचे कारण विचारले.

तो म्हणाला, “महाराज, मला चौथी नात झाली. त्याची वृध्दी आहे. म्हणून मी आत येऊ शकत नाही.”

महाराज म्हणाले, “अरे, तुझी सून येथेच बसली आहे.” तिला पाहून सासऱ्याला आश्चर्य वाटले. त्यांनी मुलाला हा काय प्रकार आहे असे विचारले. त्याने मुलीची कुंडली दाखविली.

त्याची बायको महाराजांनी दिलेल्या तारखेला डॉक्टरकडे गेली व म्हणाली, “आज माझी प्रसुती आहे.” त्यावर डॉक्टरने तिला तपासले व सांगितले की अजून खूप वेळ आहे. तिने डॉक्टरचे ऐकलेच नाही व ऑपरेशन टेबलवर जाऊन झोपली.

त्या डॉक्टरला वाटले ही वेडी झाली; त्यांनी दुर्लक्ष केले. महाराजांनी सांगितल्याप्रमाणे त्यावेळीच प्रसूती झाली. डॉक्टरांची तारांबळ उडाली.

डॉक्टरांनी विचारले, “तुला कसे माहीत होते तुझी प्रसुती होणार आहे?” त्यावर तिने महाराजांनी बाळाच्या जन्मापूर्वीच तिची कुंडली मांडून दिल्याचे सांगितले. त्यावर त्या डॉक्टरलाही मोठे आश्चर्य वाटले.


व्यंकटनाथ महाराजांनी जन्मापूर्वीच मुलीची पत्रिका दिली याचा अर्थ—

* ज्या वेळेला ती जन्माला येईल त्यावेळी कोणते ग्रह कुठे असतील, * त्यांचा परस्पर संबंध काय, * पूर्वसंचित काय, * सद्य जीवनातील योग काय,

हे सर्व त्या पत्रिकेतून समजते.

जन्मापूर्वी अशी पत्रिका तयार करणे म्हणजे तिचे प्रारब्ध, जीवनातील योग, भोग, आयुर्मर्यादा — थोडक्यात *जन्मापासून मृत्यूपर्यंतचे सर्व ज्ञान* असल्याशिवाय शक्य नाही.

हे कार्य नाथपंथाचे असल्यामुळे त्यांनी अशी पत्रिका जन्मापूर्वी तयार करून दिली.


अध्यात्मिक-वाटचाल/गुरूमहिमा/माधवनाथ-व्यंकटनाथ/गुरुंच्या-कार्याच्या-मर्यादा.txt was सर्वात शेवटचा बदल: on 01-Jan-2026 (12:34)