नरेंद्रची मानसिक अवस्था
श्री गुरु दत्त अवतारी श्री समर्थ योगाभ्यानंद व्यंकटनाथ महाराज हे औरंगाबाद जिल्ह्यातील देवगाव रंगारी या एका खेड्यात रहात होते. योगी, अंतर्ज्ञानी, वैद्य, ज्योतिषी, सिद्ध, सात्विक पुरुष – अशी त्यांची ख्याती चारही दिशेला होती. देशातल्या निरनिराळ्या भागातून दुरून लोक त्यांच्या दर्शनासाठी, तसेच जीवनातील विविध समस्या—पुत्र, लग्न, धनसंपत्ती, विद्याभ्यास, रोग, आणि इतर भोग/योग बदलण्यासाठी—देवगाव रंगारी येथे जात असत.
—
मी – नरेंद्र चौधरी, त्या वेळी १७–१८ वर्षांचा महाविद्यालयीन विद्यार्थी, विचारांनी ग्रस्त आणि त्रस्त होतो.
माझ्या मनात सतत एकच विचार घोळत असे:
*“संत-महात्मे होऊन गेले… आता या युगात खरे साधुसंत कुठून येणार?”*
अलीकडच्या काळातील रामकृष्ण परमहंस आणि विवेकानंद यांच्या बद्दल मला प्रचंड आकर्षण होते— इतके की सर्व सोडून विवेकानंदांच्या आश्रमात जाऊन उर्वरित जीवन घालवावे असे विचार मला पोखरत होते.
*रामकृष्ण–विवेकानंद ही जोडी सोडली तर आता मला जीवनाला मार्गदर्शन करणारे संत कोठे मिळणार?* या प्रश्नांनी माझे मन सतत कुरतडत असे.
घरातील प्रचलित पूजा-अर्चा, देवकर्म — हे मला मान्य नव्हते. “असे करून देव कुठे भेटणार?” असा माझा हट्ट.
हल्लीच्या जगातले संत महात्मे हे लुटेरे, स्वार्थी, लोकांना फसवणारे — असा माझा दुराग्रह होता. आणि म्हणून माझ्या मनात प्रश्न:
*“इतके अवतार, इतके संत होऊन गेले… तरी ईश्वरसाधनेसाठी काही व्यवस्था का दिसत नाही?”*
—
महाविद्यालयीन शिक्षणासाठी मी नागपूर येथे वाणिज्य शाखेत होतो. ही शाखा माझ्या मनाविरुद्ध घेतली गेल्याने मी अधिकच व्यथित असायचो.
रोज सकाळी कॉलेजला जाणे, उरलेला वेळ मित्रांसोबत टवाळक्या करण्यात घालवणे— हा माझा नित्यक्रम.
माझे मूळ विचार पूर्णतः नास्तिकवादी. मी किंवा माझी भावंडे—कोणीही देवधर्म, पूजा-अर्चा, साधना काही करत नव्हतो. जणू हा संस्कार आमच्या पिंडातच नव्हता.
देवाला कुणी पाहिले नाही, ऐकले नाही, बोलले नाही— मग त्याचे वर्चस्व का मानायचे? हा विचार माझ्यावर पक्केपणाने बसलेला होता.
समाजातील तथाकथित संत-महंत— लुबाडणारे, ढोंगी, स्वार्थी— असे माझे ठाम मत.
फक्त रामकृष्ण परमहंस आणि विवेकानंद — हेच खरे साधक, बाकी कुणी संत म्हणण्याजोगे नाहीत— असे मी ठाम मानत होतो.
म्हणूनच माझा जीवनदृष्टिकोन पूर्णतः बुद्धीपुढे शरण गेलेला.
देव कधी भेटणार नाही. देवधर्माच्या गोष्टी या स्वार्थी लोकांसाठी. आणि म्हणून त्यांच्यापासून दूर राहणे — हेच माझे धोरण.
—
विद्यार्थीदशा असल्याने सकाळी अभ्यास झाला तर झाला, नाहीतर उनाडक्या.
कॉलेजमध्ये पहिल्या पिरेडला रोलकॉल द्यायचा, “यस सर” म्हणायचे आणि सरांचे लक्ष नसताना खिडकीतून उडी मारून मित्रांसोबत भटकायला जायचे.
जेवण खानावळीत— तेही मित्रांसोबत— गप्पा, हशा, आणि बेफिकीर जीवन.
—
सर्व मित्र विद्यार्थी होते. नॉनव्हेज, ड्रिंक्स कोणी घेत नव्हते. पण एकदा सर्वांनी ठरवले:
*“इतर लोक खातात, ते वाईट नाहीत.
मग आपण का खाऊ नये?”*
घरी कळू द्यायचे नाही — म्हणून सर्वजण तयार झाले.
एक मित्र तयार नव्हता — पण त्याला मारून-मुटकून खायला लावले. मौज, शौक असा प्रकार.
अधूनमधून असे खाणे सुरू झाले.
—
नाथपंथात माणिक शेतकऱ्याला काहीच नसताना गोरक्षनाथांनी अडभंगनाथ बनविले. त्याचप्रमाणे— माझ्यामध्ये कोणतेही गुण नसताना, मी कुणाला मानत नव्हतो (गुरूंना तर अजिबात नाही!) अशा मला—
स्वामी मच्छिंद्रनाथांपासूनच्या अखंड गुरु-शिष्य परंपरेत कार्य करणारे पंधरावे नाथ – व्यंकटनाथ महाराज — कसे माझ्यात स्थित्यंतर घडवतात, कसे मला नरेंद्रनाथ म्हणून गुरुपदी बसवतात— हेच तर या कथानकाचे सार आहे.
मानसिक, शारीरिक, प्रारब्धाचे भोग बदलून, मोहमाया दूर करून, नराचा नारायण करणे — हेच गुरुचरित्राचे गमक आहे.