श्री नाथशक्तिपीठ, आकोला Header श्री नाथशक्तिपीठ, आकोला Header

भेट दिलेली पृष्ठे: माधवनाथांना बालाजीचा संकेत

माधवनाथांना बालाजीचा संकेत

चित्रकूट कार्यस्थळाच्या स्थानांतरणासाठी बालाजींचा आदेश. भगवान विष्णू भूमीवर कार्य करीत असलेल्या मानवरूपी सद्गुरूला प्रत्यक्ष येऊन मार्गदर्शन करू शकतात ही कल्पना पटण्यासारखी तरी आहे का? देवता आणि मानव यांचा प्रत्यक्ष संबंध कधी येऊ शकतो का? मानवाने योजलेल्या कल्पनेमध्ये परमेश्वराचा हात असू शकतो का? या कल्पना हे विचार भन्नाट नाही का वाटत? परंतु सर्व नियोजन भगवंताच असतं, ते आपण घटनांवरून समजून घेण्याची गरज आहे. आजही देवाचा आणि पृथ्वीवर वावरणाऱ्या सद्गुरूंचा प्रत्यक्ष संबंध आणि प्रत्यक्ष व्यवहार होत असतो हे आपल्या लक्षात येईल.

चित्रकूटाचा त्याग करण्यापूर्वी माधवनाथ महाराजांनी आपल्या काही शिष्यांना आपण चित्रकूट सोडून जात असल्याचे सांगितले. त्यांना त्यांच्या भवितव्याचे आश्वासन दिले आणि अकस्मात एका दिवशी रात्री त्यांनी अंगावरच्या कपड्यानिशी चित्रकूटाचा त्याग केला. त्याग करताना त्यांनी स्पष्टपणे सांगितले की ज्या तऱ्हेने त्यांचे गुरुबंधू आणि आधीच्या नाथांचे भक्त त्यांच्याशी वागले, जे करवीर पीठाचे पारंपारिक स्थान महात्म्य त्यांनी घालवले, जो स्वार्थ आणि मोह पूर्वीच्या लोकांनी तेथील शक्तीपीठाचा व्यक्तिगत फायदा घेण्यासाठी उपयोग केला, जी पंथ कार्याबद्दल त्यांनी अनास्था दाखवली, ते लक्षात घेऊन ते म्हणाले—

“आम्ही आता चित्रकूट सोडून चाललो. पुन्हा आयुष्यात येथे पाऊल ठेवणार नाही. येथून नाथ परंपरेचं कार्य भविष्यात कधीच होणार नाही. आम्ही जेथे उभे राहू, तेथे मंदिर उभे करू; तेथून नाथपंथाच्या परंपरेचे पुढचे कार्य करू.

इतके अनेक वर्ष अनेक नाथांनी चित्रकूटहून नाथपंथाचे कार्य केलं, त्या भूमीचं भाग्य एका क्षणात पालटलं. ज्या भूमीवर गिरीच्या बालाजीने आपल्या एका भक्ताला, जो अडीच तपे गिरीला साधना करत होता, त्याला नाथपंथाचे कार्य सावरण्यासाठी चित्रकूटला पाठवलं होतं, त्या चित्रकूटाचं महात्म्य माधवनाथांनी क्षणार्धात नष्ट केलं. केवढं हे नाथांचं सामर्थ्य!

अशा तऱ्हेने चित्रकूट ही शापित भूमी झाली. पण चित्रकूटात जिथे नाथांची शस्त्रे, अस्त्रे, वल्कले, विभूती आदी परंपरेने सुरक्षित ठेवली होती, तेवढा भाग आहे तसा सुरक्षित ठेवून तो पुढची योजना झाल्यावर आम्ही आकाशमार्गाने येथे येऊन रातोरात घेऊन जाऊ; कोणाला ते कळणारदेखील नाही, असे बोलून त्यांनी पुढील मार्गासाठी प्रयाण केले. हे सामर्थ्य केवळ नाथांचंच.

आता कुठे जायचे हा विचार आला, त्यावेळेस त्यांनी ठरवले की गिरीला बालाजींच्या दर्शनासाठी जावे आणि ते सांगतील ते करावे. येथे एक गोष्ट लक्षात घ्या—नवनाथ देखील असेच आकाशाखाली आणि पृथ्वीवर कुठेही वावरत होते. कुठे घर बांधलं आणि तिथे राहिले असं त्यांनी केलं नाही. सदैव ते देशाटन करून लोकांच्या समस्यांचं निवारण करायचे; तीर्थयात्रा करायचे. अशाच प्रकारे अंगावरच्या कपड्यानिशी माधवनाथ निघाले. कोणाचा आधार घेऊन ते कुठे राहिले नाहीत. सर्व ब्रह्मांड आपलंच आहे, पाहिजे तेव्हा, पाहिजे त्या क्षणाला, पाहिजे ते करता येते — हे सामर्थ्य असल्यामुळे त्यांना कशाचीच काळजी नव्हती.

नाथ पंथाच्या परंपरेनुसार नाथ ज्या वेळेला कोणत्याही मंदिरात जातात, त्यावेळेला ज्या देवतेचे मंदिर असेल ती देवता प्रत्यक्ष सदेह नाथांच्या भेटीसाठी समोर येते. भगवान कृष्णाने सर्व देवांना दिलेला हा आदेश आहे. माधवनाथांचे परमगुरु विठ्ठलनाथ महाराज यांनी गिरीला ३० वर्षे साधना केल्यानंतर प्रत्यक्ष बालाजींच्या आज्ञेवरून त्यांना चित्रकूटला पाठविले होते. हे लक्षात घेऊन की काय, माधवनाथ महाराज बालासाहेबांच्या दर्शनासाठी गिरीला निघाले.

म्हणजे कल्पना करा की चित्रकूटहून गिरीला बालाजींच्या मंदिरात केवळ दर्शनासाठी पायी जायचं — यातून माधवनाथांना काय साधणार होतं? गिरीला बालासाहेबांचे देऊळ आहे, पण तेच त्यांचं निजस्थान आहे — या भूमिकेतून त्यांच्या भेटीसाठी चित्रकुटहून सर्वस्वाचा त्याग करून निघाले होते. राहण्याची, खाण्यापिण्याची, प्रवासाची कुठलीही सोय नाही — ते फक्त पायी चालत निघाले. योगमार्गाने ते एका क्षणात पोहोचले असते, पण त्यांनी ते केलं नाही. कारण—

योगशक्तीचा उपयोग स्वार्थासाठी कधीच केला जात नाही.

देऊळातील मूर्तीशी बोलणे ही सामान्य जनांची कल्पना आहे; पण माधवनाथ महाराज जे निघाले होते, ते पाषाणाच्या मूर्तीशी बोलायला निघाले नव्हते — ते प्रत्यक्ष बालाजींची भेट होणार म्हणून चालत होते.

अंतर्मनाच्या कलाप्रमाणे, देशाटन करीत, साधनारत मनस्थितीत ते गिरीला पोहोचले. ते जेव्हा गड चढत होते, आणि मंदिराच्या जवळ — साधारण अकराव्या पायरीवर — पोहोचले, तेव्हा अचानक एक अलौकिक घटना घडली.

माधवनाथांच्या मागून एक पांढऱ्या घोड्यावर बसलेले, पांढरे शुभ्र वस्त्र परिधान केलेले, तेजस्वी स्वरूपाचे एक सत्पुरुष अचानक समोर आले. त्यांनी आपल्या झोळीतून प्रभावळीसहित पंचायतन बाहेर काढले आणि माधवनाथांच्या हातात दिले व म्हणाले—

“बच्चा, बालाजी क्या और दत्त क्या — दोनों एक ही है. इसकी स्थापना करना.”

इतके बोलून तो सत्पुरुष घोड्यासह अदृश्य झाला.

बालाजी म्हणजे विष्णू, आणि विष्णूच दत्त — हे स्पष्ट करण्यासाठीच हा सूक्ष्म संकेत होता. स्वतः बालाजींनीच पुढील कार्याचे संकेत दिले: मूर्ती स्वतःच्या हाताने दिली, आदेश दिला, आणि निघून गेले.

नंतर बराच वेळ संवाद झाला — पण तो संवाद माणसांसारखा नव्हता. देव आणि सद्गुरू यांच्यातील संभाषण हे नेत्रसंवादाने, संकेतांनी, सूक्ष्म भाषेत होतं — जे इतरांना कळत नाही.

ही मूर्ती कुठे स्थापायची, कशी स्थापायची, कोणत्या उद्देशासाठी स्थापायची — या सर्व गोष्टींचे संकेत दिले गेले.

येथे लक्षात घेण्यासारखे आहे की विठ्ठलनाथ महाराजांना जसे गिरीहून, बालाजींच्या आज्ञेवरून चित्रकूटला पाठवले गेले होते, तसेच आता माधवनाथांना चित्रकूट सोडून नवीन कार्यस्थळ उभारण्याची आज्ञा मिळाली होती.

देवाचं आणि सद्गुरूंचं संभाषण सतत चालू असतं. त्यामुळे पुढे काय करायचं हा प्रश्न लागत नाही. गुरुकार्याच्या दिशेने पावलं आपोआप पडतात.

अंतरात्म्याच्या मार्गदर्शनाप्रमाणे माधवनाथ पुन्हा भ्रमण करीत घृष्णेश्वर येथे ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेत गेले, आणि वेळगंगेचा शोध घेत-घेत ते देवगाव रंगारी येथे पोहोचले. तिथे त्यांनी समोर एक उकिरडा पाहिला — आणि त्यांच्या मनात एकच विचार आला—

“यही हमारा मंदिर है.”

चित्रकूटचा त्याग करताना त्यांच्या तोंडून निघालेले वाक्य — “मी खडकावर उभा राहिलो तर तिथे मंदिर निर्माण करीन” — याची आठवण झाली.

अशा प्रकारे बालाजींच्या संकेताने, अंतर्मनातील मार्गदर्शनाने, नाथपंथाच्या पुढील कार्याचे केंद्र — चित्रकूटहून देवगाव रंगारी येथे — निश्चित झाले.

नाथपंथाचे स्वामी भगवान दत्तात्रेय — आणि दत्तांचा अवतार म्हणजेच विष्णू — यांच्या इच्छेने हे स्थानांतरण घडले.

चित्रकूट ते देवगाव रंगारी हा जवळजवळ ९०० किमीचा प्रवास — संपूर्णपणे ईश्वरी मार्गदर्शनाखाली झाला.

अशा तऱ्हेने चित्रकूटचे पारंपारिक स्थान बालाजींच्या संकेताप्रमाणे बदलून देवगाव रंगारी येथे येणार हे निश्चित झाले. पुढे ते स्थान करवीरपीठासारखे कसे घडले हे आपण पुढील भागात पाहू.


अध्यात्मिक-वाटचाल/गुरूमहिमा/माधवनाथ-व्यंकटनाथ/माधवनाथांना-बालाजी-चा-संकेत.txt was सर्वात शेवटचा बदल: on 18-Dec-2025 (13:50)